Saturday, October 30, 2010
Thursday, October 21, 2010
अशोक हांडे आणि त्यांचा ‘मराठी बाणा’
पाच वर्षे झाली अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ पाहून त्यापूर्वी त्यांनी मंचावर सादर केलेल्या कार्यक्रमांपैकी एकही कार्यक्रम पाहण्याचा योग आला नव्हता. मंगलगाणी-दंगलगाणी, आजादी-पचास, गाने-सुहाने, अमृत-लता, माणिक-मोती, गंगा-जमुना वगैरे वगैरे विषयी फक्त ऐकून होतो. ‘मराठी बाणा’चा बहुधा तो पहिला-दुसराच प्रयोग असावा पुण्यातला. ‘७० एमएम पडद्यावरील १२५ कलाकारांचा भव्यदिव्य प्रयोग’ अशी बाणाची जाहिरात पाहिली होतीच. पडदा वर गेला आणि मराठमोळं कौलारू घरांचं टुमदार गाव दिसलं, पाहातच राहिलो. पण तेवढय़ात सुरू झाली अभंग-भूपाळी ‘उठी उठी गोपाला’. ती संपताच अशोक हांडय़ांचं चपळ निवेदन. महाराष्ट्राच्या संत, पंत आणि तंत कवींचा दाखला देत, लोकगीत, लोकनृत्य आणि लोकवाद्यांचा वारसा सांगत भूपाळी आणि काकड आरतीचा उल्लेख करीत शेतावर जायची सकाळची लगबग; अशी काही दृक् -श्राव्य करून सोडली की, टाळ्यांचा नुसता कडकडाट! पहाटंच्या पाऱ्यामंदी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी हा, रूप पाहाता लोचनी, विठुचा गजर.. या गायनाने अर्थ उमगला ‘गीतं वाद्यंच नृत्यंच त्रयं संगीत मुच्यते’ या भरतमुनींच्या वाक्याचा! शेतावर जाण्याची धांदल संपते न संपते तोच सुगीची भलरीगीतं सुरू. झुंजू-मुंजू पहाट झाली, केलं सुगीनं समद्यांचं भलरंऽ टाळ्यांच्या पुनश्च कडकडाटात भलरी-गीतं संपतात तोच शेळ्यामेंढय़ांमागे फिरणाऱ्या धनगरांची ‘गजे’ नृत्यगीतं सुरू. गजेनृत्याचा फेर धरीत भैरूबाच्या नावानं चांगभलं- बिरुबाच्या नावानं चांगभलं आणि सुंबरान मांडलं गा सुंबरानं मांडलं. गजे फेर नाचून होतो न होतो तोच आदिवासी संस्कृतीचा वारसा लाभलेल्या मराठी मातीची आठवण करून देऊन सुरू होतं ठाकर-संगीत. ‘जैत रे जैत’ मधल्या धुंदबेधुंद लोकनृत्याचं सादरीकरण. गोऱ्या देहावरती कांती, गडद जांभळं, आम्ही ठाकर ठाकर आणि लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला, ही महानोर फेम ठाकरगीतं एकापाठोपाठ नाचली जातात. मग पुन्हा हांडय़ांचं निवेदन. मराठी माणूस श्रमाची उपासना करणारा आहे. मराठी स्त्री तर श्रमशक्तीचं प्रतीकच आहे. अरे संसार संसार म्हणजे आधी हाताला चटके तेव्हा कुठे भाकर.. हे ती जाणून आहे. दळण-कांडण, पाणी शेंदणं, चूल आणि मूल करता करता ती म्हणते- माळ्याच्या मळ्यामंदी, शेत बघा आलंय कापणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलेला भूगोल आणि महाराष्ट्रानं घडविलेला इतिहास यातून मराठी माणूस घडलाय. निसर्गसुंदर कोकण भूमीचं असंच आहे. कोकणी माणसं कशी? तर अशी- गोमू माहेरला जाते, एकवीरा आई तू डोंगरावरी, वल्हव रे नाखवा, मी हाय कोली, कशी झोकात चालली, हीच काय गो, हेऽरा हेराऽरा! अशी एकाहून एक सरस कोकणी गीतं, कोळी गीतं अपरांत भूमीचं दर्शन घडवितात. मराठी माणसाचं जीवन कष्टप्रद, त्याची विश्रांती तरी कशी? दिवसभर राबराबून रात्रभर भजन करणे हाच त्यांचा विरंगुळा. पांडुरंग चरणी, कांदामुळा भाजी, देवा तुझा मी सोनार, दळिता कांडिता अशी भजनं करीत करीत सकल भक्तमंडळी भक्तिरसात न्हाऊन जात. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची’ झाल्यावर बहुजनात रूढ ते भारूड सादर झालं. ‘बुरगुंडा होईल गऽ बया तुला बुरगुंडा होईल’. वीस मिनिटे सगळ्या प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट! भजन, कीर्तन, लोकरंजनातून लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन. मराठी माणूस जसा आनंद घेतो तसा आनंद देतो, लुटतो. सणासुदीला याचा अनुभव आला नाही तरच नवल. गोविंदा रेऽ गोपाळा, गणपतीबाप्पा मोरयाची मिरवणूक, आरती, लेझीम, दहिहंडी आणि मग मध्यंतरापूर्वीचं दीपोत्सव नृत्य- लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनियाऽ कसं दृश्य ते! टाळ्यांच्या गजरात मध्यांतर होतो. विशेष म्हणजे मध्यांतराची ती दहा मिनिटे कशी ताजी ताजी वाटतात. मध्यांतरानंतर पुन्हा एकदा पडदा वर. लगेच सुरू होतात विवाह सोहळ्याची संगीत-रंगीत दृश्यं. ‘गीतंवाद्यंच नृत्यंच’चा मनोहारी अनुभव. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमापासून तिची सासरी पाठवणी करेपर्यंतची दृश्यं आणि वातावरण. ‘प्रथम तुज पाहता’, ‘काय बाय सांगू’, ‘लगीन माझं ठरलं’, ‘या गो दांडय़ावरून’, ‘रुणझुण वाजंत्री वाजती’, ‘सप्तपदी मी रोज चालते.’ अशी विवाह सोहळ्याची गाणी. प्रेक्षकांना वाटतं आपण त्या सोहळ्याचे वऱ्हाडीच आहोत. मुलगी सासरी जाते. कुठलं रोप कुठे लावलं जातं! मग तिथली हवा, तिथलं पाणी, अन्न सेऊन रुजतं, वाढतं, रमतं. मंगळागौरीच्या दृश्यातून स्त्रियांच्या गाण्याबजावण्याला आणि नृत्याला नुसता बहर येतो. घागर घुमू दे घुमू दे, नाच गं घुमा, पिंगा ग पोरी पिंगा, आंबा पिकतो, हादगा, फू बाई फुगडी.. एक ना दोन. गाण्यावर गाणी, नाचावर नाच. आणि मग मराठी संस्कृतीचं, लोकसंस्कृतीचं अस्सल प्रतिबिंब दिसू लागतं यात्रेजत्रेतून. सांस्कृतिक देवाणघेवाणीचं मोबाईल स्थान म्हणजे जत्रा. जत्रेला जायचं ते बैलगाडीतून! हौशाची हौस, नवशाचा नवस आणि एखादा गौशा जातो उगी कुठं एखादं सावज सापडतंय का ते पाहण्यासाठी! ‘जिवाशिवाची बैलजोड’, ‘नाकात वाकडा, नथीचा आकडा’ ही गाणी झाल्यावर मग तमाशातील लावण्या. प्रथम होतो ढोलकीचा तोडा. ‘बारीक और बारीक’ वाजवताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. मग ‘या भावजी, बसा रावजी’, ‘पतंग उडवित होते’, ‘खेळताना रंग बाई होळीचा’ अशा एकचढ एक लावण्यांचा फड. मग स्मरण केलं जातं महाराष्ट्राला लाभलेल्या कुलदैवतांच्या अधिष्ठानाचं. गणगणपती, जेजुरीचा खंडेराया, देवीचा गोंधळ, जोगवा.. आणखी बरंच. आणि शेवटी, जुनं गेलं अन् नवंही मनाजोगतं आलं नाही, या परिस्थितीचा उपरोध, टीका. ऐंशी वर्षांची असून म्हातारी.. हिल हिलपोरी हिला, ऐका दाजीबा.. अशा गाण्यांतून. आणि मग लक्षात येऊ लागते अशोक हांडे यांची या कार्यक्रमामागे असलेली विचारधारा. तीनशे वर्षांची सांस्कृतिक गुलामगिरी दूर करण्यासाठी उदय पावले छत्रपती शिवराय. त्यांनी मराठीला कणा दिला, मोडेन पण वाकणार नाही असा ‘बाणा’ दिला. तेव्हा, स्वातंत्र्यवीर सावरकरांची शिवस्तुती. ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजाऽ ’ आज मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला आलेली मरगळ दूर करण्यासाठी पुन्हा एकदा शिवाजी अवतार झाला पाहिजे. समर्थवाणी प्रकटली पाहिजे.. कारण मराठीचं, महाराष्ट्राचं पुढं पडणारं पाऊल पुढेच पडलं पाहिजे. आणि मग ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हे भरतवाक्य म्हणत म्हणत ‘चौरंग’चे १२५ कलाकार असतील तशा वेशभूषेत १००० प्रेक्षकांसमोर हात जोडून उभे राहतात. प्रेक्षकांना अभिवादन करतात.. टाळ्यांचा दीर्घ प्रचंड कडकडाट होतो. अशोक हांडे बोलतात.. ‘हा खेळ केवळ आम्हा मंचावरील १२५ कलाकारांचाच नसून, तुम्हाआम्हांसकट अकराशे पंचवीस जणांचा एकत्रित खेळ आहे.. मराठी बाणा! आता प्रेक्षक टाळ्यांचा गजर करीत कलाकारांना, हांडे यांना खडी ताजीम देतात! गेली पाच वर्षे मराठी बाणानं मराठी मनावर मोहिनी घातली आहे; नव्हे गारूड केलं आहे. पाच वर्षांत हजार प्रयोग. बहुधा सगळे हाऊसफुल्ल! लाखो प्रेक्षकांनी मराठी बाणाचा प्रयोग पाहिला. कित्येकांनी पुन्हापुन्हा पाहिला. प्रत्येक प्रयोग तितकाच नेटका, चपखल, देखणा, दृष्टी आणि श्रवणाला संतुष्ट करणारा. दृक् -श्राव्य माध्यमाचा दिमाख दाखविणारा. कान आणि डोळे या अवयवांवरून जेवढे म्हणून वाक् प्रचार निर्माण झाले आहेत त्या सगळ्यांचा भाषिक आणि कलात्मक आनंद देणारा. कर्णसंपुटे तुष्टावणे, कान भरून ऐकणे, कान फुंकणे, कान भरणे, कानात वारे भरणे इत्यादी. डोळ्यांच्या बाबतीत तर, डोळे भरून पाहणे, डोळ्यांचे पारणे फिटणे, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच पुढचा प्रसंग दिसणे, डोळे भरून येणे, दोन्ही डोळ्यांची मुरवत राखणे इ.इ. मी तीस-पस्तीस वेळा तरी मराठी बाणा पाहिला असेल. एकाही प्रयोगात कधी काही खुट्ट झालंय असं आठवत नाही. शिस्त आणि परिपूर्णता जशीच्या तशी. ‘वन्समोर’ही जिथल्या तिथे! ‘मराठी बाणा’ चे लेखन, संकल्पना, दिग्दर्शन, कलादिग्दर्शन, निर्मिती आणि निवेदन सबकुछ अशोक हांडे असा मामला. प्रयोग पाहताना हे सतत जाणवतं. बाणातील अशोक हांडे यांची मिरासदारी फार मोठी आहे. लोकसाहित्य, लोककला, लोकनृत्य, लोकगीतं आणि लोकसंगीताचा आधुनिक संगीताशी त्यांनी नेमका मेळ घातलाय. गीतं पारंपरिक आणि मराठी सिनेमातीलदेखील आहेत. प्रकाश योजना, ध्वनी संकल्पना अत्याधुनिक आहे. गानवृंद आणि वाद्यवृंद संपूर्ण कार्यक्रम जिवंत आणि ताजा ठेवण्यात पूर्ण यशस्वी झाला आहे. नृत्य, समूहनृत्य कलाकार बहारदार आहेत. मराठी लोकसंस्कृतीचा ‘ताणा-बाणा’ असा काही विणला गेलाय की त्याचा भरजरी शालूच रंगमंचावर भिरकावला गेलाय असं वाटतं. अतिशय गतिमान प्रसंग, नृत्य, गायन, नेपथ्य आणि प्रकाश योजनेमुळे दृश्यांवर नजर ठरत नाही. टाळ्या वाजवायलाही उसंत मिळत नाही. लोकसंस्कृती आणि लोकसंगीताचं स्मरणरंजन होतं आणि असं वाटतं की या सगळ्यांचं पुनरुज्जीवन व्हायला हवं! अशोक हांडे मराठी बाणाचे बहुरूपी सर्वेसर्वा आहेत यात शंका नाही. ते सूत्रधार आहेत. सुंदर कळसूत्री बाहुल्याबाहुले नाचविणारे सूत्रधार! कधी ते वाटतात संस्कृत नाटकातील विदूषक, तर कधी तमाशातील ‘सोंगाडय़ा’, कधी डफावर थाप मारणारे शाहीर, कधी कीर्तनकार तर कधी परमार्थाचे निरूपक. खरं तर ते आहेत- एक शहाणा निवेदक. बाणातील त्यांचं निवेदनच बहुरूपी आहे. बाणेदार आहे, ठाशीव आहे, भरीव आहे. एकूण प्रयोगावर त्यांची पकड एखाद्या सर्कशीतील रिंगमास्टरसारखी देखील वाटते. त्याशिवाय एवढा शिस्तबद्ध कार्यक्रम होणे नाही. अशोक हांडे हा एक मोठा आशावादी कलाकार आहे. लयाला जाऊ पाहणाऱ्या लोकसंस्कृतीचा अभिमान पुनश्च निर्माण करता येईल, केला पाहिजे असं त्यांना वाटतं. ते मराठी आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. महाराष्ट्र सर्वार्थाने श्रीमंत होता. स्वाभिमानी होता. कणखर आणि चिवट होता. मोडेल पण वाकणार नाही असा त्याचा बाणा होता. देशासाठी जीव देणारा होता.प्राण तळहाती घेऊन लढणारा होता. थोडासा तापट तसा काहीसा हिरवटही होता. जो महाराष्ट्रावर लोभकरील त्याच्यासाठी पायतळी जीव अंथरण्याइतका भोळाभाबडाही होता. आतिथ्यशील तसा गिरिशिखरांच्या देवतांसारखाही. संतांच्या कारुण्यमयतेसारखा मऊ, तसा शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखा संहारक! अशोक हांडे यांना असंही वाटतंय की मराठीचा ‘बुरुज बाणा’ ढासळतो आहे. तो सावरायचा असेल तर लोककला, लोकसाहित्यासारखं दुसरं बुलंद माध्यम नाही. आपल्या भव्यदिव्य इतिहासाचं, संस्कृतीचं, नृत्यवादनगायनादि संपन्न वारशाचं दर्शन ‘मराठी बाणा’तून त्यांना घडवायचं आहे. खऱ्या मराठी बाणाच्या शोधात इथेतिथे भटकणाऱ्या मराठी माणसाला त्याची अस्मिता दाखविण्याचा प्रांजळ प्रयत्न ते करीत आहेत अशी त्यांची धारणा आहे, विचारधारा आहे. मराठी संस्कृती किती विविध, विपुल आणि अविनाशी आहे हे त्यांना त्यांच्या ‘मराठी बाणा’तून दाखवायचंय. मराठी बाणाचा शब्दब्रह्म, नादब्रह्म आणि प्रकाशब्रह्म त्यासाठी आहे- चैतन्य सर्व भूतानां । विवृत्त जगदात्त्मना । नादब्रह्म तदानंदम् । अद्वितीयम् उपासते ।। |
Subscribe to:
Posts (Atom)