Friday, November 4, 2011

कोनाडे

माझ्या माहेराच्या घरात नाना प्रकारचे कोनाडे मी पाहिलेले आठवताहेत. ओटीवरचे सर्व कोनाडे अत्यंत आकर्षक महिरपी असलेले. एकमेकासमोर. सारख्या अंतराने असे हे कोनाडे ओटीची शोभा वाढवायचे. एका कोनाडय़ात लाल रुमालात दासबोधाची एक पोथी बांधलेली मला अजून आठवते. एका कोनाडय़ात कायम एक लख्ख घासलेली समई असायची. विजेचे दिवे नव्हते. रात्री ती उजळायची. तिच्या हलत्या वाती भिंतीवर उमटायच्या. त्या पाहताना मनात कधी भीती उमटायची. पण आजोबा जागीच खाकरले की भीती पळायची. पुढच्या पडवीत एक मोठा लोटा पुरून एक कोनाडा केलेला होता. त्यामध्ये कायम तांदूळ भरलेले असायचे. कुणी झोळी घेऊन दाराशी थांबले की आमच्या बाळमुठी त्यामधून भरून त्या झोळीत रित्या व्हायच्या. आणखी एक गम्मतशीर कोनाडा आठवतो. तो साखरी आगरचा- माझ्या आजोळचा. तिथे खूप मोठे अंगण होते ते वरच्या घरी. ‘वरचे घर’ म्हणजे मूळ आजोळचे घर. त्या अंगणाला चिरेबंदी अशा बाजू भिंती होत्या. अंगणात खाली उतरत यायचे. या जांभ्या दगडाच्या भिंतीत एक करवंटीचा कोनाडा होता (म्हणजे नारळाची करवंटी पुरून केलेला) तो सदैव भाताचे तूस जाळून तयार केलेल्या रांगोळीने भरलेला असायचा. अंगणी सारवली की लगेच रांगोळी घालता यावी म्हणून. बाईला जसे कुंकू तशी सारवल्या अंगणात रांगोळी. रांगोळी नसेल तर, अंगण बोडके का? म्हणून आजोबांचा स्वर चढायचा.
एप्रिलला नातवंडांच्या परीक्षा संपल्या, की सर्व नातवंडांना घेऊन कोकणात अवतरते. मोठे घर. घरामागे माडांची गर्द राई. त्यामागे स्वच्छ, सुंदर, उसळणारा समुद्र, मला सारखा खुणावत असतो. घरापुढे-मागे सारवलेली स्वच्छ अंगणे. मुलांना शहरात ब्लॉक नामक खुराडय़ात असे मोकळं ढाकळं हुंदडायला मुळात मिळत नाही. लहान मुलांनी वारा प्यायलेल्या वासरासारखं हुंदडावं बालपणी. म्हणजे मुले छान वाढतात. मनानेही मुक्त मोकळी राहतात. चैत्र-वैशाखाचे दिवस म्हणजे कोकणचा मेवा लुटण्याचे दिवस. काजू, करवंदे, आंबे, फणस, रातांबे, तोरणे असा भरपूर मेवा मुक्तपणाने मुले खाऊ शकतात. फणसबाळे सांभाळीत दारात फणस सेवेला उभे. मुलांना कोकणात यायला नाही आवडले, तरी नातवंडांना आवडते, नातवंडांना जे आवडते ते मुलांची विशेष पर्वा न करता करणे हा आजीचा धर्म मी पुरेपूर सांभाळते. हे एवढं रामायण सांगायचे कारण म्हणजे आता शहरात न भेटणारी पण अजून या मातीत (भिंतीत म्हणा ना!) असणारी एक गम्मतशीर गोष्ट किंवा रचना तुम्हाला भेटवायची आहे! त्याचे असे झाले.
सायंकाळी अंगणाच्या पाठवणीवर (पायरीवर) मी बसले होते. इतक्यात पेपर आला. येथे तो सायंकाळी येतो. (क्वचित दुपारी) माझ्या नातीला मृदुलाला सांगितले- ‘मुदूऽ, माझा चष्मा आण. त्या ओटीवरच्या कोनाडय़ात ठेवलाय.’
‘कोनाडा म्हणजे?’ तिने विचारले.
मी हात कोनाडय़ाच्या दिशेने केला.
मी मागे हात करीत म्हटले, ‘अगं, तो काय समोर-’
‘हो! ते ‘आपोआप कपाट’ होय?’
‘आपोआप कपाट’ हा पाच वर्षांच्या नातीचा नवीन शब्द मला आवडला. घरं बांधताना भिंतीतच तयार झालेला तो कोनाडा म्हणून ‘आपोआप कपाट’. तिला कपाट वाटले कारण कोनाडय़ामध्ये एक फळी टाकलेली होती. त्यामुळे तिच्या दृष्टीने ते कपाट.
मृदुलाच्या त्या बोलण्यातून मला पाहिलेले अनेक प्रकारचे कोनाडे आठवू लागले. माझ्या माहेराच्या घरात नाना प्रकारचे कोनाडे मी पाहिलेले आठवताहेत. ओटीवरचे सर्व कोनाडे अत्यंत आकर्षक महिरपी असलेले. एकमेकासमोर. सारख्या अंतराने असे हे कोनाडे ओटीची शोभा वाढवायचे. एका कोनाडय़ात लाल रुमालात दासबोधाची एक पोथी बांधलेली मला अजून आठवते. एका कोनाडय़ात कायम एक लख्ख घासलेली समई असायची. विजेचे दिवे नव्हते. रात्री ती उजळायची. तिच्या हलत्या वाती भिंतीवर उमटायच्या. त्या पाहताना मनात कधी भीती उमटायची. पण आजोबा जागीच खाकरले की भीती पळायची. पुढच्या पडवीत एक मोठा लोटा पुरून एक कोनाडा केलेला होता. त्यामध्ये कायम तांदूळ भरलेले असायचे. कुणी झोळी घेऊन दाराशी थांबले की आमच्या बाळमुठी त्यामधून भरून त्या झोळीत रित्या व्हायच्या. आणखी एक गम्मतशीर कोनाडा आठवतो. तो साखरी आगरचा- माझ्या आजोळचा. तिथे खूप मोठे अंगण होते ते वरच्या घरी. ‘वरचे घर’ म्हणजे मूळ आजोळचे घर. त्या अंगणाला चिरेबंदी अशा बाजू भिंती होत्या. अंगणात खाली उतरत यायचे. या जांभ्या दगडाच्या भिंतीत एक करवंटीचा कोनाडा होता (म्हणजे नारळाची करवंटी पुरून केलेला) तो सदैव भाताचे तूस जाळून तयार केलेल्या रांगोळीने भरलेला असायचा. अंगणी सारवली की लगेच रांगोळी घालता यावी म्हणून. बाईला जसे कुंकू तशी सारवल्या अंगणात रांगोळी. रांगोळी नसेल तर, अंगण बोडके का? म्हणून आजोबांचा स्वर चढायचा.
१९४४ साली गुहागरला प्लेग झाला. तेव्हा सारी मंडळी घरे सोडून समुद्रालगत ‘कावण’ काढून राहायला गेली. ‘कावण’ म्हणजे ऐसपैस झोपडी. दोन-चार खोल्या असलेली. तेव्हा म्हणे खूप माणसांनी घराच्या कोनाडय़ात दागिन्याचे डबे ठेवून कोनाडे चक्क लिंपून टाकले. वरून भिंती आल्यावर कळणार तरी कसे? पण या कोनाडे लिंपण्यावरून एक कथा नेहमी आजी सांगायची. आजी आमची महा गोष्टीवेल्हाळ!
एकदा असेच घर सोडून जाताना एका माणसाने दागिन्यांचा डबा कोनाडय़ात पुरून भिंत लिंपली. तर खूण म्हणून एक खुंटी लावली. त्याच्या वर पूजेचा मुकटा ठेवला. घरात कुण्णा कुण्णाला सांगितले नाही. गावी सारी माणसे गेली. तिथेच त्याला ‘लकवा आला.’ वाणी गेली. हातपाय लोळागोळा. त्याला घरी आणले. ओटीवर बाजेवर हा माणूस. सारखे हात माजघरात altआणि डोळे  माजघरात. पण कुणाला त्याची नेत्रपल्लवी आणि हस्तपल्लवी कळली नाही. दागिने कोनाडय़ाने गडप केले. गुप्त धन असेच सापडत असावे. अशी ही गम्मत!
आमच्या गुहागरच्या या घरात एक सुंदर कोनाडा आहे. तो येऊनच पाहायला हवा असा देखणा. त्याचे नाव ‘देवाचा कोनाडा’. पश्चिमाभिमुख अशा या कोनाडय़ात देव विराजमान आहेत. आजही! खाली बसून पूजा करता येईल इतक्या उंचीवर म्हणजे जमिनीपासून फूट सव्वाफूट उंचीवर हा कोनाडा आहे. पुढच्या वरील भागात सागवानी लाकडाची सुंदर महिरप आणि महिरपीला खालच्या दोन बाजूला ऐटबाज पोपट, शंभर वर्षे होऊन गेली, तरी या कोरीवकामाला ढक नाही इतका हा कोनाडा सुंदर आहे.
या निमित्ताने आणखी एक कोनाडा आठवला. हा कोनाडा माझ्या काकांच्या घरी माडीवरच्या जिन्याकडे जाताना वरच्या भिंतीत आहे. चांगला ऐसपैस कमानी कोनाडा. माझी चुलत बहीण रुसली की ती या कोनाडय़ात जाऊन बसायची. ती कोनाडय़ात बसली की आजी म्हणायची, ‘अगो ऽ बाई, मंथरा अवतरली कोनाडय़ात. आता काय रामाचे सिंहासन मागेल. ते द्यायला हवे!’
तिची बाबापुता चालायची. तिथे सहज हात कुणाचाच पुरायचा नाही. पठ्ठी अशी बहाद्दर. तिला जे हवे ते मिळाल्यावाचून कोनाडा सोडायची नाही. तिचे लग्न गुहागरला झाले. मधेच ती दिसेना. आजी म्हणाली,
‘अगो ऽ गौरीहार घेऊन कोनाडय़ात नाही ना बसली ही?’ माजघरभर हशा उसळला. पण सासरच्या एकाही माणसाला त्याचा अर्थ उमजला नाही.
पुण्याला लग्न होऊन आल्यावर मी एका वाडय़ात गेले. या वाडय़ाच्या दिंडीदरवाजाच्या आतल्या बाजूला असाच प्रचंड कमानी कोनाडा. पहारेकरी चक्क रात्री तिथे झोपायचा. मी प्रवास खूप केला. देवालयामध्ये मी खूप सुंदर सुंदर कोनाडे पाहिले. एका शंकराचे देवळातले कोनाडे मला अजूनही विसरता येत नाहीत. प्रवासात त्रिपुरी पौर्णिमा आली. त्या शिवालयाच्या आवारभिंतीला असेच हजारो छोटे छोटे कोनाडे. पणती बसेल एवढे. त्या प्रत्येक कोनाडय़ात दिवे लावलेले आणि समोर त्रिपुर उजळलेले ते प्रकाशरूप, आजही माझ्या डोळ्यात आहे. गुहागरला आमच्या व्याडेश्वराचे मंदिर अष्टकोनी आहे. या दगडी भिंतीमध्ये प्रत्येक भिंतीत असेच अजस्त्र कोनाडे आहे. पैलू पाडावे असे ते कोनाडे अत्यंत देखणे आहेत.
आमच्या घरी लहानपणी प्रत्येक भावंडांना एकेक स्वतंत्र कोनाडा होता. भिंत सारवली की चुन्याचे वर लिहिलेले. ‘सदाशिवचा कोनाडा’ ‘कमलचा कोनाडा’ माझे माहेरचे नाव कमल. बालपणीची एक गम्मत आठवली. कमरेच्या वर असलेल्या जागी भिंतीत एक कोनाडा होता. त्यामध्ये फणीकरंडय़ाची पेटी असायची. या पेटीत दोन-तीन फण्या (तेव्हा कंगवा नव्हता.) कुंकवाचा चांदीचा करंडा आणि काजळाची चांदीची डबी असायची. पेटी उचलून चटईवर बसून वेणीफणी, कुंकू वगैरे शृंगार करायचा. (शृंगार एवढाच होता) एकदा ती पेटी माझ्या हातून पडली. आरसा फुटला. वडलांनी एक नवीन आरसा आणला आणि तो कोनाडय़ातच कायमचा बसवला. फणी करंडय़ाची पेटी कायमची माळ्यावर गेली. आता जाता-येता कोनाडय़ातल्या आरशात डोकवायची सोय झाली. मी सारखी पाहायची. माझी आजी भारी हुशार आणिaltमिस्किल. म्हणाली-
‘सारखं काय पाहातेस? पाहून काय कळतंय का? काही सुचतंय का?’
‘आता आरशात पाहून काय डोंबल सुचणार?’ मी म्हटले.
तशी माझ्या डोक्यावर टप्पू मारून म्हणाली, ‘ये इकडे’.
आम्ही दोघी आरशापुढे उभ्या. ती बाजूला गेली.
‘आता काय झालं?’
‘काय म्हणजे? आरसा स्वच्छ झाला.’ मी म्हटले.
तशी म्हणाली, ‘तेच सांगत्येय तुला. मन आरशासारखं हवे. कुणी पुढं उभं राहिलं की उमटायला हवे. घटना संपली की स्वच्छ! परत नवीन प्रतिबिंब-अनुभव घ्यायला मन स्वच्छ!’ तेव्हा अर्थ कळला नव्हता. आज वाटते आजी किती महान होती! आणि ते कोनाडेही! स्वच्छ! सताड! सदैव उघडे!
(डॉ. लीला दीक्षित लिखित आणि दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘मोकळं आभाळ’ या पुस्तकातून साभार)