‘छोटी सी कहानी से बारिशों की पानी से सारी वादी भर गयी..’ गुलजारांचा ‘इजाजत’ हा एक अलवार, भावगर्भित ‘काव्यपट’! त्यातील हे एक गीत! या चित्रपटाची सुरुवात बेभान कोसळणाऱ्या पावसात विरणाऱ्या डोंगर, दऱ्या आणि झाडे यांच्या दृश्याने होते. पाश्र्वभूमीवर आशाताईंच्या आवाजातील चिंब गाणे.. ‘छोटीसी कहानी से’.. रंग-रूपाचे सारे भेद मिटवून टाकणारा, साऱ्या सृष्टीला अंतर्बाह्य़ भिजवून, तिला नवनीत करणारा पाऊस गुलजारांच्या गीतांतून नित्य भेटत राहतो. मुळात गुलजार हे भावकवी! मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म भाव-भावना व्यक्त करताना ते निसर्गघटकांचा प्रतिमा व प्रतीके म्हणून आपसूकच वापर करतात. दूर जाणाऱ्या वाटा, वळणे, झाडांच्या निष्पर्ण फांद्या, एकाकी डोंगरमाथा, सुकलेले पिवळे पान, त्याचा तुटून, गळून पडल्याचा आवाज, दऱ्या-खोऱ्यांत गुंजणारी शून्य शांतता, पिवळसर ग्लान चंद्र.. असे सारे काही त्यांच्या कवितांमध्ये, गाण्यांमध्ये डोकावत असते. त्यातही प्रामुख्याने येतो तो म्हणजे पाऊस. पाऊस! कधी बेभान कोसळणारा. कधी सरत्या थेंबांचा. गुलजारांचा पाऊस ‘माणूसपण’ लेवून येतो. मानवी मनाचे असतात तसे त्याचेही विभ्रम असतात. गुलजारांचा पाऊस एखाद्या कवीच्या हळव्या मूड्ससारखाच. हा पाऊस कधी आर्त, वाट पाहावयास लावणारा, कधी भर पावसात तन-मनाची होरपळ करणारा, कधी सारे भेद, सारे अंतर मिटवून अंतर्बाह्य़ भिजवून टाकणारा. मनाची ओल आणि मनाचा शुष्कपणा गुलजारांच्या गीतांतील पावसात प्रतीत होत जातो. त्यांच्या गीतांतील भाव मनाच्या सरोवरात अर्थाच्या थेंबांप्रमाणे पडतात आणि मग तरंगावर तरंग उमटत जातात अन् आपल्या भावविश्वाचा सारा तळ ढवळून निघतो. गुलजारांचा पाऊस स-रूप आहे. रंग, रूप, नादासकट तो गीतातून प्रकट होत जातो.. ‘शाखों पे पत्ते थे पत्तों पे बूंदे थी बूंदों में पानी था..’ अशी शब्दप्रतिमा समोर उभी राहत असतानाच पावसाचा अन् नायिकेचा मूड लेवून पुढली ओळ येते.. ‘पानी में आंसू थे..’ दाटल्या आभाळात वीज चमकून जावी तशी मनात कसलीशी एक कळ उमटते. अर्थात, गुलजारांचा पाऊस संवेदना ल्यालेला. नायिकेच्या मनात दडलेलं बाल्य पुढच्या ओळीत उमटून जातं.. ‘रुकती है, थमती है, कभी बरसती है बादल पे पांव रखे, बारिश मचलती है’ पावसाचे सगुण रूप दाखविताना गुलजार दुसऱ्या एका गाण्यात म्हणतात- ‘मोती मोती बिखर रहा है गगन पानी पानी है, सब पिघलने दो मेंहा बरसने लगा है आज की रात आज की रात मेंहा बरसने दो..’ सारे काही शुष्क, कोरडे असते. मातीच्या तळव्याला भेगा पडतात. कोरडे डोळे कोरडय़ा आभाळाकडे लागतात, तेव्हा गुलजार पावसाची आळवणी करतात.. ‘अल्ला मेघ दे, पानी दे पानी दे, गुडधानी दे..’ तरी पाऊस कोसळत नाही, तेव्हा जगण्याची सामूहिक तहान गुलजार मांडून जातात.. ‘मछली मर गई नदिया सुखी नदिया सुखी फ़ाके पड गए फ़ाके पड गए बुढिया भूखी कौन बचाए बादल आए..’ मानवी नाते हा गुलजारांना भावणारा, खुणावणारा, खरं तर झपाटून टाकणारा विषय! मानवी मनाचे असे नाते त्याच्या साऱ्या गहिऱ्या छटांसह त्यांच्या गीतांतून, कवितांमधून प्रतिबिंबित होत असते. मानवी मन तरी किती सूक्ष्म; चिमटीत मावणार नाही इतके. आणि विशाल तर इतके, की काळाच्याही बाहुपाशात मावू नये. मानवी मनाची आंदोलने व्यक्त करण्यासाठी कुठल्याही कवीला अलवार असा पाऊस हवाच असतो. मानवी मनाच्या असतात तशाच पावसाच्याही छटा असतातच.. असंख्य, अनंत! गुलजारांच्या नायिकेचे भावविश्व, तिचे मन कायमच पावसाच्या खेळाशी बांधले गेलेले आहे. तो तिचा सखा आहे, तसाच वैरीही! तिचे भावविश्व उलगडताना कवी पावसाच्या प्रतिमांचा सहज वापर करून जातो. ‘झिर झिर बरसे सावनी अखियाँ साँवरिया घर आ..’ पावसाने यावे. नक्की यावे, पण एकटय़ाने येऊ नये. सोबत प्रियकरालाही घेऊन यावे. पाऊस आला, पण ‘तो’ नसेल तर पावसाच्या येण्याला अर्थ तो काय? ‘तेरे संग सब रंग बसंती तुझ बिन सब सुखा..’ येथे पाऊस कोसळतोय अन् जीवलग कुठेतरी दूर दूर. तेव्हा ती म्हणते- ‘इक घन बरसे, इक मन प्यासा इक मन प्यासा, इक मन तरसे..’ इथला पाऊस त्याच्या गावी जावा अन् त्याने तिच्या मनाची तगमग जीवलगाला सांगावी म्हणून ती म्हणते- ‘पलकों पर इक बूँद सजाए बैठी हूँ सावन ले जाए जाए, पी के देश में बरसें इक मन प्यासा, इक मन तरसे..’ तसे पाहिले तर मनाचे अन् आभाळाचे नाते अनोखे! दोघेही वेळी-अवेळी दाटून येतात अन् वेळी-अवेळी बरसतात. पावसाच्या रूपात गुलजार अगदी सहजच प्रणयाचे संसूचन करून जातात.. ‘पत्ते-पत्ते पर बूँदे बरसेगी डाली-डाली पर झुमेगा सावन प्यासें होंठो को चूमेगी बारिश आज आंखों में फूलेगा सावन’ पावसात त्या दोघांचे एकाच छत्रीत भटकणे त्या वेळी कितीही सुखावून गेलेले असले तरी आज दुरावलेल्या विरही अवस्थेत मात्र त्याची आठवण उदास करून जाते.. ‘एक अकेली छतरी में जब आधे-आधे भीग रहे थे आधे सूखे, आधे गीले सूखा तो मैं ले आई थी गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..’ जीव पिळवटून टाकणारी अशीही वाटणी! भिजलेले अंग कधीच कोरडे होऊन जाते, पण भिजल्या मनाचे काय? पाऊस अन् विरहाचा पारंपरिक संबंध गुलजारांच्या गीतांतून ठायी ठायी येतो.. ‘अब के ना सावन बरसे अब के बरस तो बरसेगी अंखियाँ..’ किंवा ‘सावन में बरखा सताए पल पल, छिन छिन बरसे तेरे लिए मन तरसे..’ अर्थात जेव्हा पाऊस नसतो, तेव्हाही आसवे असतात. आकाश दाटून येवो- ना येवो; मन कळत-नकळत दाटून येते. डोळे पाझरू लागतात. ‘दो नैनों मैं आँसू भरे है निंदिया कैसे समाए..’ गुलजारांच्या गाण्यांमध्ये नॉस्टेल्जिक मूड असतोच. खोल दऱ्यांतील पावसाळी धुक्यासारखा! ‘पानी-पानी इन पहाडों की ढलानों से उतर जाना धुआँ-धुआँ कुछ वादियाँ भी आएँगी, गुजर जाना इक गाँव आएगा, मेरा घर आएगा जा मेरे घर जा, नींदे खाली कर जा पानी, पानी रे..’ कधी आकाश भरून येते, पण बरसून मोकळे होत नाही. तसेच कधी कधी मनाचे होते. एक अपरंपार सैरभैरपण वाऱ्यासारखे मनात घोंघावत राहते. ‘दिल हुम हुम करें घबराए घन धम धम करे डर जाए इक बूँद कभी पानी की मोरी अँखियों से बरसाए..’ अन् अवचित जर जीवलग आला, तर सारे काही तरारून येते, मोहरून उठते.. ‘तेरी झोरी डारूँ सब सूखे पात जो आए तेरा छूआ लागे मोरी सूखी डाल हरियाए..’ असा हा पाऊस आणि गुलजारांची पाऊस-गीते! अंतरीचा भाव व्यक्त करतानाच अंतरीचा ठाव घेणारी! असं एखादं गाणं कानी पडलं की, ‘बारिशों की पानी से’ मनाची ‘सारी वादी’ भरून जाते. मन अंतर्बाह्य़ भिजून चिंब होते. मग खिडकीबाहेर पाऊस बरसो वा न बरसो.. |
Monday, August 6, 2012
इक बूँद कभी पानी की..
पाऊस
पाऊस |
अरुणा ढेरे ,रविवार,५ ऑगस्ट २०१२
वेडावल्यागत धिंगाणा घालणारा पिसाट पाऊस.. दाही दिशा झडीनं गारठून, हुडहुडत पाय पोटाशी घेत आक्रसलेल्या.. धरतीच्या अंगात जणू देवचार संचारलेला.. ती अनिवार, अर्निबध स्वत:शीच घुमतेय.. कोसळत्या पाऊसधारांचा धुकट, तलम पडदा सर्वागी लपेटून मिचमिच्या डोळ्यांनी झाडं, रान, वाटा तृप्तीनं जडावल्यात.. पण पोटपाणी कुणाला चुकलंय, म्हणताना गुरांना घेऊन रानाची वाट धरलेला एकट गुराखी.. कच्च ओलाचिंब.. डोईवर कांबळ्याची खोळ.. या पाऊसखाईत गुरं राखायचं म्हणजे..! वाटेवरच्या खळाळ पाण्यात तडतडणाऱ्या सरींच्या अगणित भिंगऱ्यांनी सूरमयी लयीत ताल धरलेला.. मनही ओलंचिंब.. रुंजी घालणाऱ्या अलवार, ओलेत्या आठवणींनी.. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या या ओल्याकंच चित्रासारखं. पाऊस सुरू व्हायचा तेव्हा शाळाही नुकती सुरू झालेली असायची. नवा वर्ग, नव्या बाई हव्या तर असायच्या; पण हवा असायचा मन ओढून घेणारा पाऊसही. अंगणातल्या मातीवर थेंबांचे गोल उमटत राहायचे. मग हळूहळू सगळं तुडुंब तळंच व्हायचं. कडेनं लावलेल्या हजारी मोगऱ्याच्या रुंद पानांवर आणि जाईच्या लांबसर कळ्यांवर पाऊस सडसडत राहायचा. शाळा सुटून छत्रीतून अर्धे भिजत घरी येईतो संध्याकाळ झालेली असायची. नदी घरामागेच. तिचं पाणी दिवसागणिक वाढत असायचं. हळूहळू घरी यायचं ते पुराचं पाणी पाहतच. दोन्हीकडच्या घाटांवरून पाणी थेट वाडय़ाच्या दारापर्यंत यायचं. मग रात्री उशिरापर्यंत घरी जुन्या आठवणी काढत मोठी माणसं जागत, गप्पा करत असायची. आठवणी गावाकडच्या पावसाच्या, पावसात चुकलेल्या गुरांच्या, हलाखीच्या दिवसांत तग धरून राहिल्याच्या, गमावलेल्या माणसांच्या असण्याच्या-नसण्याच्या, पानशेतनं गिळून टाकलेल्या चार काडय़ांच्या संसाराच्या.. कधीतरी ते बोलणं ऐकता ऐकताच झोप लागायची. आणि पहाटे पहाटे बाहेरच्या पावसाची लय धरून आई-आत्यांच्या दळणाच्या ओव्या ऐकत जाग यायची तेव्हा त्या गाण्याला जी एक उदास करणारी गलबल असायची, तिचा अर्थ कळतो आहेसं वाटायचं. पूर पाहायला जाऊ नये असं तेव्हा त्या दोघी आम्हाला सारखं बजावत असायच्या. ‘अगं, बाई आहे ती नदी म्हणजे! नाही जाऊ पाण्याच्या पहिल्या भराच्या वेळी..’ त्या म्हणायच्या. झाडं झराडती, इजा कराडती धरणीबाई गं, आला आला तुझा पती अशी ओवी मी पुढे.. पुष्कळ पुढे ऐकली, तेव्हा त्या वेळी आई-आत्यांच्या तोंडची नदीची ओवी मला सहज उमगली. त्यांच्यासाठी धरणीबाई आणि नदीबाई- दोन्ही बायकाच आणि एकरूपच. त्या म्हणायच्या- नदीला आला पूर, नका जाऊ पाह्य़ा तिच्या गं शेजेवर आलासे मेघराया जमिनीला काय किंवा नदीला काय, पावसाची कशी विलक्षण ओढ जडली आहे, हे कळायला मधे बरीच र्वष गेली. त्या वर्षांवर पाऊस बरसत राहिला होता. म्हणून पुष्कळ काही कविता म्हणून उगवूनही येत राहिलं. ० एकदा मी आणि शांताबाई शेळके- आम्ही चिपळूणला निघालो होतो. ऑगस्टमधली व्याख्यानमाला. पाऊस सगळ्या वाटेवर गडद भरून राहिलेला. आम्हाला ‘मेघदूता’ची आठवण झाली. बारहमासा, चौमासासारख्या पारंपरिक गाण्याच्या प्रकाराला कवीनं- एखाद्या अभिजात प्रतिभावंत कवीनं स्पर्श केला की काय अनोखं निर्माण होऊ शकतं ते ‘मेघदूता’त पाहावं. शांताबाईंचा काळ ‘मेघदूता’च्या प्रेमात पडलेल्या कवींचा. तोपर्यंत बोरकर, कुसुमाग्रज, बापट- कितीकांनी ‘मेघदूता’ला मराठीत आणलेलं. पुढे शांताबाईंनीही आणलंच. आम्ही साऱ्या प्रवासभर ‘मेघदूत’ आठवत, म्हणत गेलो. धूर, पाणी, वीज आणि वारा यांनी बनलेला तो- म्हटलं तर अर्थहीन आकार! आणि कालिदासानं आपल्या प्रतिभास्पर्शानं त्याला दिलेलं चैतन्यमय रूप- कविता म्हणजे तरी दुसरं काय असतं? वेगवेगळ्या पोतांचे, जातींचे, आकार-प्रकारांचे निर्जीव शब्द आणि कवीनं रसद्रव्यांनी भरून त्या शब्दांना आणलेलं जिवंतपण.. त्यांच्यातून उगवून आणलेले चैतन्याचे कोंब! त्या पावसानं ओथंबलेल्या ओल्या प्रवासात मला कवितेचं जणू रूपरहस्यच कळून आलं. परत येताना वरंधा घाटात पाऊस इतका बेभान कोसळत होता, की थांबलोच. डोंगरकडय़ांवरून प्रचंड गर्जना करत पाण्याचे लोट खाली धावत निघालेले. दरीत ढगांची गर्दी. वर मुजोर पावसाचे सपकारे. त्या पावसाचा आवेग जबरदस्त होता. खिळवून टाकणारी ती उग्रता अवाक् करणारी होती. विजेची एक रेघ अशी लखलखून उमटली, की अर्थशून्यतेचा प्रचंड गोल तडकला आणि पंचमहाभूतांच्या शक्तीचं अद्भुत एखाद्या दिव्य भासासारखं दिसून गेलं. ० आंध्रात होतो. वडिलांच्या संशोधनाच्या निमित्तानं प्रवास करत होतो. एका अपरिचित घाटमाथ्यावर पोचलो आणि पाऊस असा कोसळला, की मागचे-पुढचे रस्ते त्यानं बंदच करून टाकले. त्या रात्री एका अनोळखी घरात- पुरुषमाणूस बाहेरगावी असतानाही आम्हाला रात्रभराचा आसरा मिळाला. साधं, गरम कढीभाताचं जेवण मिळालं. आम्हाला त्यांची भाषा अवगत नव्हती आणि आमची भाषा त्या घरातल्या म्हातारीला आणि तिच्या जवळच्या तरुण मुलीला समजत नव्हती. पण तसं तरी कसं म्हणावं? बाहेर तुफान कोसळणाऱ्या पावसानं आमची असहायता (पान १ वरून) त्यांना समजावली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पाणी ओसरलेलं पाहून आम्ही पुढे निघालो तेव्हा किंचित भुरभुरत्या पावसात त्या घरातली म्हातारी आम्हाला हसतमुखानं निरोप देत दाराशी आली होती. सत्य कवितेबाहेर पडलं होतं आणि आमच्यासाठी हात हलवून आशीर्वाद देत होतं. ० एका भल्याथोरल्या उद्यानातून फिरत होते. कितीतरी प्राणी आणि पक्षी पिंजऱ्यांमधून ठेवलेले. पाऊस येणार असं वाटत होतं; पण आला नव्हता. सगळीकडून निळसर अंधाराचा झाकोळ आलेला. सूर्य हिऱ्यांच्या करंडय़ात ठेवल्यासारखा आणि त्याच्या उजेडाला सगळीकडून मेघांचा सावळा संभार रोखून धरत असलेला. अचानक समोर आला तो पिंजऱ्यातला पांढरा मोर. आपलं एकूण एक पीस फुलवून तो धुंद थरथरत होता. सगळ्या पिसाऱ्यात एक नाजूक लहर सळसळत असल्यासारखं वाटत होतं. तरलता ही खरं तर सारखी निसटणारी गोष्ट; पण त्या क्षणी तिथे ती त्या मोराच्या अवघ्या देहात उमटून होती. पाहताना डोळ्यांत एकदम पाणीच आलं. वाटलं, की भोवतालाच्या बंधनांचा, कुरूपतेचा, दुखाचा, निर्थकतेचा, जडतेचा विसर पाडणारी एखादी उत्कट हाक असते. कवीला ती ऐकू यावी लागते. मग बाकी सगळं नाहीसं होऊ शकतं. उरतो तो फक्त ओथंबलेपणा, ती हाक आणि ती तरलतेची थरथर. जीवनाचा अर्थ फक्त ‘असणे’ एवढा थोडाच आहे? ० पाऊस आता आवडीनिवडीच्या पलीकडेच असतो. ज्याच्यावाचून जगण्याला जगणं म्हणता येत नाही, असा. ज्याच्यावाचून संपूर्ण होण्याचं स्वप्न पाहता येत नाही, असा. कथेतल्या, कादंबरीतल्या, कवितेतल्या, ज्या ज्या प्राण्या-पाखरांना आणि माणसांना मी मनात थांबवून ठेवते, त्यांना सगळ्यांना पाऊसकाळात मनाबाहेर येऊन भिजू देते. त्यातलंच कुणी कधी काळाची झाकली मूठ उघडतं. आत गारेसारखं गेलेलं आयुष्य असतं. बघता बघता तेही विरघळतं. पण तो क्षणात नाहीसा होणारा शुभ्रपणा अगदी शांत करून जातो. कधीतरी आपण उभे असतो ताम्हिणी घाटात किंवा कासच्या पठारावर, किंवा नीलगिरीच्या, विंध्याच्या, हिमालयाच्या एखाद्या डोंगरमाथ्यावर आणि पाऊस भरून येतो. मनाच्या ओसाडपणावर बारीक तुषारांचा वर्षांव होतो. काहीच नवं उगवणार नाही असं वाटत असताना खडकासारख्या अचलपणातून काहीतरी पाझरत येतं. सुखाचं अगदी कोवळं पान कुठेतरी हललंसं वाटतं. वाटतं, की जगण्यावर आसक्तीचे, संबंधांचे, आपुलकीचे, मोहांचे लहान लहान फुलोर येतात म्हणून तर जीवशक्ती अमर आहे याची कृतज्ञता वाटते. पाऊस पडत राहतो. वाटतं की, बाहेर कुठेतरी कुणाच्या तरी मनात हा नक्की वाजत असणार. ह्य़ाचं न येणं आणि ह्य़ाचं येणं, ह्य़ाचं मोडणं आणि घडवणं या सगळ्यानं कुणाकुणाच्या आत.. अगदी आतमध्ये काहीतरी उलथापालथ होत असणार. चिखलानं भरलेल्या पायांनी हा कुणाच्या तरी काळजांवरून चालत जाणार आणि नव्या गाण्याचे, चित्रांचे, कवितांचे कळभरले आवाज तिथून उमटत राहणार. ते आवाज ऐकू यावेत यासाठी म्हातारा काळ तर नेहमीच उत्सुक असणार आहे.. |
पाऊस पानोपानी.....
पाऊस पानोपानी
यंदा पावसानं दिलेल्या प्रदीर्घ ओढीनं समस्त जीवसृष्टीच्या डोळ्यांत पाणी आलंय. अजूनही त्याचा रुसवा गेलेला नाही. उन्हानं करपलेल्या काळ्या आईच्या सांत्वनासाठी नुकताच तो येऊन गेला खरा. तसा अधूनमधून तो आशेची किरणं दाखवतोयही; पण त्याच्या मनी काय आहे कुणास ठाऊक! अशी सारी उदासवाणी परिस्थिती भोवती असताही ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाऊसकवितांच्या आवाहनास मात्र कविजनांनी कवितांचा उदंड पाऊस पाडून आम्हास अक्षरश: ओलंचिंब केलं. साधारण दीड ते दोन हजार कविता प्रतिसादादाखल आमच्याकडे आल्या.
आधीच घोषित केल्यानुसार ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी चिकित्सक चाळणी लावून त्यातल्या निवडक कविता आमच्या स्वाधीन केल्या. या निवडक कविता ‘पाऊस पानोपानी’ या विशेषांकात आम्ही प्रसिद्ध करीत आहोत..
माझा पाऊस
पाऊस सगळय़ांचाच असतो
सगळय़ांनी तो भोगलेलाही असतो.
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस
कधीतरी भोगलेला आहे
झेललेलाही आहे.
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण.
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही,
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा.
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे..
मला फक्त
दिसायचा
तिच्या डोळय़ांतील
पाऊस.
तोच पाऊस
मला आठवतो.
तोच पाऊस
मला माहीत आहे.
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेश
अश्रू, हंबरडा
आणि
मूक विलाप..
माझ्या आईचा.
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याच्या अर्थहीन
थेंबांचा आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा..
- एहतेश्याम देशमुख,
मेहरुण, जळगाव
कास्तकाराचा पाऊस
आम्हास कास्तकाराईच्या डोक्स्यावर
तुहय़ा मेहेरबानीची चुंबर देजो, बस्स!
सप्पा अन्न धान्य पिकवाचा
जिम्मा पेलून घेऊ बाप्पा
मंग कायले अमेरिकेचा
लाल मिलो मांगवा लागते?
तूच रुसलास त गडय़ा
कर्जाचा डोंगर आन
नापिकीच्या हालतीने
फासीच घेवा लागल
तू करतेस धिंगाना आन
आमचा होते सत्यानास
तू करतेस मिजास आन
आमचा सुपडा साफ
जिंदगीनीची ऐसी तैसी पायन्यापरीस
मरावा नाई त का करावा?
या बहय़ताड जमान्यात
सबसिडीवर भेटते कार
दुष्काळीचा सातबारा देवाले
पटवारी मांगते रुपये हजार
तिगस्ता तुहय़ा मस्तीन सोयाबीन गेला
गुदस्ता एका पान्यान सप्पा धान मेला
अमदा तरी सरम ठेवजो
मनाजोगता वक्तावर येजो
तू तोंड कारा करून, आमच्या
जिंदगीले चुना नको लावजो
- राजन जयस्वाल,
नागभीड, चंद्रपूर
खेळ..
आठवणी कोसळत राहतात
मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या
प्रत्येक थेंबासोबत
भूतकाळाच्या ढिगाऱ्यावर.
त्यातून पुन्हा उगवतात
नव्या आठवणींचे कोंब.
पाऊस थांबत नाही
भूतकाळाचा ढिगारा जमीनदोस्त होतो
नव्या आठवणींना उगवण्यासाठी.
मी पाहात राहतो
प्रारब्धाचे खेळ..
घराच्या पत्र्यावर तडतडणाऱ्या
संगीत पावसाच्या साक्षीने.
- संजय जाधव,
देवपूर, धुळे.
सुखांतिका
निवळत गेला उन्हात हलक्या पाऊस वेडापिसा
उमटून गेला मातीवरती त्याचा हिरवा ठसा
दरीतले बेधुंद धुकेही भोवळ येऊन पडे
पंख भिजवुनी एकल पक्षी मोहिनीतला उडे
नभी कुंचले फिरवत उडते पावसातली परी
निळे रुपेरी मेघ निघाले काळ्या वाटेवरी
आभाळाने सुखान्तिकेचा मजकूर लिहिला नवा
मऊ अभ्रकी थरांत झिरपे ओथंबून गारवा
घनात फुलवून गूढ पिसारे मोर नाचले तिथे
रत्न उमलले शून्यामधुनी अशी झळाळी फुटे
अजून पडतो मनात पाऊस, तुला ठाउके नाही
थेंबाथेंबामधुनी हलकी करवत फिरवत राही
- जयश्री हरि जोशी, विक्रोळी (प.)
पाऊसवेणा
थंड तुषार अंगावर झेलत
कार्यालयाच्या काच तुटलेल्या खिडकीतून
मी अनुभवतो पाऊस
शिरशिरत, शहारत, रोमांचित होत
कितीतरी वर्षांनंतर..
पाऊस म्हणावं तसा वागतच नाही हल्ली
आभाळ भरून आलं
की मी बापाला विचारतो मोबाइलवर-
‘तिकडे पाऊस आहे का?’
‘नाही. कडक ऊन पडलंय..’
बापाचा निर्जीव सूर.
माझी उदासी मग अधिकच गडद
गच्च आभाळ भरून दाटलेल्या काळोखागत
हुरहुर लावणारी, अस्वस्थ करून टाकणारी
काळजीनं काजळी धरल्यागत बापाचा चेहरा
डोळय़ांत उतरत जातो, नि डोळे बाप होऊन जातात..
तजवीज करून पेरणीसाठी जुळवलेले बी-बियाणे
दिवस दिवस कार उन्हात लायनीत थांबून
मोठय़ा कष्टानं मिळवलेली खताची पोती
अलीकडे प्रकृती बरी नसतानाही
कृशतेच्या खुणा अंगावर लेवूनही
शेतीची तळमळ मुळीच कमी होत नाही
बापाची..
बाप..
आयुष्यभर कष्टून, झिजून
उभारत राहिला आमच्या सुखाचा खोपा..
अन् आम्ही मात्र खोप्याच्या काडय़ा हिसकावून
बांधलीत सिमेंटची घरं
शहरात..
कुठं स्लॅबमधून ठिबकलं तर
सीलिंगचा शो जाईल याची असते आम्हाला काळजी
अन्
पाऊस नाही म्हणून
बाप पोळतो आहे उन्हाच्या जाळानं
याचा मागमूसही नसतो..
‘पाऊस पडतोय इकडे.. खूप चांगला..’
बापाचा मोबाइलवरचा आवाज
आनंदाच्या कंपनांसह थेट माझ्या काळजात..
तुषारांहून अधिक रोमांचतो मी
माझ्या डोळय़ांतलं तेज लपवता येत नाही मला
वाळून कोळ होत आलेली माती
पावसाच्या धारांनी सुखावली असेल..
भेगांच्या जखमा बुजताना
कृतार्थ होत असेल.
जमीन ओलांडून पाण्याचा लोट
मन्याडीच्या दिशेने आतून धावत असेल..
वाहणं विसरून गेलेली मन्याड
आर्त-विव्हळ वाहण्यासाठी स्वागतात असेल.
अन् पाऊस उतरतो डोळय़ांत
माझ्याही नकळत..
- व्यंकटेश चौधरी,
नांदेड
काठी ढगाला डसू दे
गावात घुसावेत हजार दरोडेखोर तसा धाक होता पावसाचा..
काळेभोर ढग अंधार करायचे गावावर तेव्हा
घरांच्या अंगांवर उभा राही काटा.
झोप मरायची. स्वप्नं करपायची. संसार रस्त्यांवर यायचा.
चूल बंद व्हायची.
नवऱ्यानं झोडपून काढावं असा जेव्हा कोसळे पाऊस तेव्हा-
झोपडय़ात नांदणारी तांदळाबाई पावसाच्या नावे
टबाटबा बोंबलायची-
‘‘आरं दुस्मना, जगू देतू का नाय?
पीठमीठ चिखल झाला
झोपडय़ात पाण्याचा डव्ह झाला
भाकरीची दुरडी गेली वाव्हून
सापइच्चू आथरुणात आले मेले
आरं बाबा, घरच झालं हीर..’’
बैलांच्या खुरांजवळच्या जखमा सडत
वासरूलेकरं नाल्याच्या पुरात जिरतमरत
आंग झाकाय धडुतं नसं आणि पोट विझवायला अन्न!
पाऊस यायचा लक्ष तोंडांचा राकीस बनून.
मरणमार पाऊस झाला की :
शाळा बंद. मास्तरचं तोंड न पाहण्याचा आनंद मुलांवर उमटे.
बंबाट पाऊस झाला की :
पाखरांची हिरवीजांभळी मस्ती आभाळाला सजवायची.
बंदुकांतल्या गोळय़ा बरसाव्यात असा यायचा पाऊस तेव्हा
झाडांचं हिरवं साम्राज्य गुणाकारानं हिरवं व्हायचं..
आता पोट फाटावे असे आभाळ का फाटत नाही?
धोंडा माती यांना ओली लिपी तो का देत नाही?
मातीखाली बिया टोचणाऱ्या हातांना तो बळ का देत नाही?
माळरान उलथू दे. झाडपान झडू दे. काळप्रेत सडू दे.
आंधळी रात्र मरू दे. बैलशिंग ढगाला टोचू दे.
कुणब्याची काठी आभाळाला डसू दे. कायबी होऊं दे..
पण पावसा, हत्ती पिसाळल्यागत तू ये..
- केशव सखाराम देशमुख, नांदेड
पाऊस
तू तिथे डोंगराच्या कुशीत, ढगांच्या गोधडीत
स्वत:ला लपेटून पहुडलेला
आणि मी इथे कासावीस
उघडय़ा मोकाट वाऱ्याने गुदमरलेला
तू तिथे पानाफुलांच्या कानाशी
हुळहुळत त्यांना खेळवणारा
आणि मी इथे वैशाखाच्या उष्ण झळांशी
भर दुपारी झटपटणारा
तू तिथे एकेक गुपित उलगडत
पालटून टाकतोस रंग सारा
मी इथे जपत राहतो, लपत राहतो
बंद कुपीत झाकत स्वत:ला
मला भिजवण्याचा जिवापाड आटापिटा
व्यर्थ जातोच हे माहीत असताना
असा का वागतोस माहीत नाही
हे तुझं चिडवणं, खिजवणं
की अजून काही? माहीत नाही.
की पोटच्या सगळय़ा मायेनिशी माझ्यावर बरसल्यावर
माझ्या शुष्क डोळय़ांतलं आटलेलं पाणी
स्वत:च्या डोळय़ांत शोधतोस?
माहीत नाही.
- सोनल कर्णिक-वायकुळ,
दहिसर.
पाऊस : आठवणींचा
पावसात एक बरं असतं
भिजून घेता येतं
भिजता भिजता आतून आतून
रडून घेता येतं
कोसळता सरी ओठांवरती
अधीर होते मन
थेंबाथेंबातून साजरा होतो
आठवणींचा सण
ओल्या मातीत आठवणींच्या मग रुजून येता येतं..
भिजता भिजता..
आठवत राहतात तिलाही मग
हुळहुळणारे गाल
टिचभर छत्री टपटपणारी
अन् भिजलेला रुमाल
चिंबओल्या रुमालानं तिच्या डोकं पुसून घेता येतं..
भिजता भिजता..
आसू, हासू, आशा, हुरहुर
पावसाला सारं कळतं
मेंदीभरल्या तळहातावर
पावसाचं तळं जळतं
विरहाची काडी सुलगावून त्यात जळून घेता येतं..
भिजता भिजता..
सरतो पाऊस, फिटते धुके
वास्तवाचे पडते ऊन
मन म्हणते- चल रे गडय़ा,
आपल्या घरी आपणहून
पागोळय़ांचे बनून थेंब रेंगाळत राहता येतं
भिजता भिजता आतून आतून रडून घेता येतं..
पावसात एक बरं असतं..
- मिर्झा अन्वर अहमद,
शहापूर.
संध्याकाळचा पाऊस
ढगांनी गच्च दाटलेलं निळसर राखाडी आकाश
क्षितिजाच्या समांतर रेषेवर ऋतुलहरीनुसार कलंडताना
सांध्यसूक्ताचा आरंभ करत कोसळू लागतो अपरंपार पाऊस
आठवणींचे नितळकाच संदर्भ घेऊन
शरीराच्या सतारीवर मेघमल्हाराची बंदिश छेडताना
उमलवतो पाऊस इंद्रियांच्या निबीड अरण्यातले स्पर्शपिसारे
नि निनादतात तिच्या गळय़ातून पाझरलेल्या आरोह-अवरोहांचे सूर
त्वचेच्या प्रत्येक ओल्याशार रंध्रातले पर्जन्यगीत होऊन
संध्याकाळच्या झिरमिरत्या काळोखात
समजूतदार पुराणपुरुषांसारखी मातीत पाय गच्च रोवलेली झाडं
सजवून घेतात फांद्यावर ‘तिच्या’ आठवणींच्या लक्षावधी काजव्यांची पालखी
पावसाचं सांजस्वगत माझ्यासमोर हळुवार गुणगुणताना..
‘तिच्या’ मुलखातून ऐकू येतात
विरहव्याकुळ रानमोरांचे आर्त पुकारे दहा दिशा सांजवताना
नि पावसाची द्रुतलय अधिकच जोर धरू लागते
माझ्या मेंदूच्या पेशींमधल्या अवकाशात ‘तिच्या’ आठवणींचे ढग
गच्च दाटून येतानाच्या प्रत्येक संध्याकाळी..!
- विनय पाटील
भरपावसातलं अजिंठा..
चिंब भिजलेले अजिंठय़ाचे डोंगर
धुंवाधार पाऊस
प्रचंड गारठा
अन् त्यात गोठलेलं अजिंठा..
डोंगरमाथ्यावर
धबधब्यांची दुधाळ कारंजी
भिजलेली झाडं
त्यावर गारठून थिजलेली माकडं
पाखरांच्या पंखांवरही
शेवाळ साठलेलं..
कुणीसं धावत पुढे आलं
स्वत: पावसात भिजत
आपली छत्री मला देत म्हणालं-
असा धुंवाधार पाऊस
कैक वर्षांत झाला नव्हता
छत्री घ्या नि निवांत फिरा अजिंठा
फक्त वीस रुपये द्या छत्रीचे
भाडय़ाचे पैसे मिळतात
पोरंबाळं दोन घास खातात
पावसात भिजून मी काय मरतो थोडाच?
खूप बघा लेणी;
अन् लेण्या-देण्याचा व्यवहार!
पहिल्या नंबरच्या गुहेतला
सरकारी रखवालदार
भ्रष्ट दात विचकत म्हणाला-
फक्त दहा रुपये द्या साहेब
तुम्हाला गंमत दाखवतो.
आणि दाखवतो पगारासोबत आम्ही
आणखी काय काय खातो.
पलीकडे कुणी एक ती
अगदी एकटी
सोळा नंबरच्या गुहेपाशी
चित्रातल्या आरशात
त्याचं प्रतिबिंब पहात
अन् बेइमान नजरेनं
माझ्याकडे बघून हसत..
कोपऱ्यात एक गुलुगुलु जोडपं
सतरा नंबरच्या गुहेपाशी
हस्तिदंताचा हट्ट धरणाऱ्या
राजकन्येच्या शोधात
एकमेकांना छत्रीत घेऊन
छत्रीचाच आडोसा करत..
चिंब भिजलेले अजिंठय़ाचे डोंगर
माथ्यावरल्या धबधब्यातून
रिते होत होते
वाघुरा नदीत..
अन् वाघुरीची चिरंजीवी चंद्रकोर
मर्त्य जगाकडे पाहून
फेसाळून हसत होती
म्हणत होती-
अखेर सारेजण येणार
फिरत फिरत गोल गोल
सव्वीस नंबरच्या गुहेपाशी
जिथे आहे पहुडलेलं
पृथ्वीवरचं अंतिम सत्य
भगवान बुद्धाचं महानिर्वाण!
- सुहास द. बारटक्के, चिपळूण
निळं पाखरू
बाहेर पानाफुलांवर रिमझिमताना
माझ्या मनात मात्र चालू असतं
त्याचं धुंवाधार तांडव
पूरच येतो मग.. अगदी महापूर!
वाहत जाते मी त्यात
अपरंपार
जराशानं तो उसंत घेतो
पण तोवर
खूप सारी पडझड झालेली असते
काहीच तर उरलं नाही
असं वाटत असताना
दूरवर एका उन्मळून पडलेल्या
झाडाच्या फांदीवर
दिसतं मला एक निळं पाखरू
चोचीत हिरवी काडी घेऊन बसलेलं,
नोहासारखीच माझी आतली सृष्टी
तगवीत असलेलं.
- संगीता अरबुने, वसई
काय माहीत?
पाऊस कोसळून
जातो.
कुठे जातो?
त्याचा पाठलाग कसा करायचा?
तो जे घेऊन जातो ते
माझं नसतं.
तरी त्याविना जगणं
पोकळ वाटतं.
तो गेलेला पाऊस
परत येत नाही.
मी वाट पहातो.
अनेक पावसाळे येतात, जातात
पण तो पाऊस येत नाही.
आता हे जगणं
माझं की
त्या पावसाचं?
उरतं फक्त एक गाणं-
‘येरे येरे पावसा..’
कुणाचंच नसलेलं.. किंवा सगळ्यांचंच असलेलं?
काय माहीत!
- रवींद्र लाखे, कल्याण
पाऊस असा हा..
आले आभाळ भरून, लागे पावसाची धार
मन कावरे बावरे, उरी उठवी काहूर
ओल्याकंच मिठीतील, वेडावती आठवणी
पावसाची रिमझिम, दाह वाढवी अजुनी
पहिल्याच पावसाने, असा मांडला कहर
आले शहारून अंग, मन झाले सैरभैर
अंकुराला गोंजारित, मुक्त मनाने बरस
जवळीक साधणारा, हवाहवासा पाऊस
- डॉ. धुंडिराज शं. कहाळेकर,
कोल्हापूर
पुन्हा पाऊस वळला..
पाठमोरा होता होता पुन्हा पाऊस वळला
दिलाशाचे मंद हासू रानी सांडुनिया गेला ।।धृ।।
नाचणाऱ्या पावलांनी बाळवारा वनी आला
पाचोळय़ाचे भिरभिरे फिरवीत उधळला
संगे गिरकी घेताना पंख फुटले धुळीला..
रानझरी खुदकली गरतीचा साज ल्याली
सानओहोळ कुशीत घेऊनिया झेपावली
सांगे कडेकपारींना- ‘आला मुऱ्हाळी न्यायला..’
घळीतून कारवीचे निळे सूर ओघळले
आवतन मधुदाट कुणी वेचले, टिपले
निळय़ा पावरीचा सूर आज समेवर आला..
रानअळू खुळावले सुखभारे हिंदोळले
कुणी पर्णकायेवर चंद्रमणी खेळविले
चाळा रानझुळकेचा गोड छळुनिया गेला..
सोनसळी कांतीवर पंखस्पर्श थरारला
सोनकीच्या बिंबासवे मेघ निळुला डुंबला
रंगभासांची कंपने, ऋतू झिम्म शहारला..
धारावत्या ओळींतून थेंब नितळ ओवले
वेशीवरती स्वप्नाच्या शब्द पाकोळय़ांचे झाले
मल्हारल्या कवितेत प्राणगंध ठिबकला..
- माणिक वांगडे, मुंबई
पाऊसधारा
पाऊसधारा
अंगावर झेलीत
इंद्रधनुष्य
पाहत होतो
ऊन-पाऊस
खेळताना
धरती संगे
नाहत होतो
नवा रंग
नवा गंध
मनास नवेपण
देऊन जातो
निसर्ग सारा
मोहरताना
हिरवा धडा
वाचत राहतो
झटकून टाकी
मरगळ सारी
पाऊस हसरा
लवून पाहतो
मनास फुटे
नवी पालवी
अंतरंगी
बहरत राहतो
- एकनाथ आव्हाड,
चेंबूर.
गोवर्धन
घन झुकले रानात
घन भिनले मनात
घन मेघदूत झाले
माझ्या आषाढबनात
घन वाऱ्यावरी डोले
घन विजेसंगे बोले
माझ्या अधीर अंतरी
घन लपंडाव खेळे
घन काजळात न्हाले
घन कृष्णरूप ल्याले
त्यांच्या वर्षांवात माझे
अंग गोवर्धन झाले!
- डॉ. विद्याधर करंदीकर, कणकवली.
आज भिजला पाऊस..
बेभानल्या वाऱ्यासंगे, भान हरला पाऊस
थेंब थेंब गोंदवुनी, आज भिजला पाऊस
आभाळाने धरलेले, काळे ढग हे उराशी
माझी जाणून असोशी, उधाणला हा पाऊस
कसा ग्रीष्म मी साहिला, त्याला ठाऊक असावे
झळा विझवाया साऱ्या, आज कोसळे पाऊस
मेघमल्हाराचे सूर, कसे, कोणी आळवले
सुरावरी त्या भाळुनी, आज नादला पाऊस
झाडे वेली झिंगताना, जणू सचैल नाहल्या
पिसाऱ्यातुनी हिरव्या, आज गायला पाऊस
आली प्रार्थना या कानी, पेरलेल्या बियाण्याची
आला हिरव्या कोंबांना, जीव द्यायला पाऊस
धूळ चिडीचीप झाली, कात टाकली घरांनी
आनंदाश्रू अवघ्यांचे, आज प्यायला पाऊस
आल्या नव्हाळीच्या कळा, मन धुंद कुंद माझे
माझ्या लेखणीमधून आज झरला पाऊस
आज भिजला पाऊस.. आज भिजला पाऊस..
- आनंद श्रीधर सांडू, चेंबूर.
कसा वागतो पाऊस
डोंगराच्या डोक्यावर कसा नाचतो पाऊस
नदीमध्ये नागव्याने, कसा हासतो पाऊस
वेडे उनाड वासरु बागडते रानोमाळ
घुंगराच्या तालावर, कसा वाजतो पाऊस
भयभीत ओलीचिंब श्वास टाकते धरणी
आडरानी एकटीला, कसा गाठतो पाऊस
गर्द गर्भार नदीचा डोह तुडुंबला पोटी
ओणावून उरीपोटी, कसा भेटतो पाऊस
कातळाला भिजवून गवताला लोळवून
कडय़ावरून दरीत उडी टाकतो पाऊस
मिट्ट काळ्या काळोखात बेडकांची बडबड
ओलेत्यानं येरझारा, कसा घालतो पाऊस
झोंबाझोंबी अंगोपांगी कोसळून झाल्यावर
नामानिराळा त्रयस्थ, कसा वागतो पाऊस
पाण्या-माती भेटवून सारे रान पेटवून
हिर्वी शाल पांघरुन, शांत झोपतो पाऊस
- साहेबराव ठाणगे, वाशी.
पाऊस अजून पडत होता
अंधाराच्या कुशीत शिरून
पाऊस अजून रडत होता
कधीच सरली रात्र तरीही
पाऊस अजून पडत होता
काही श्वास तगून होते
बाकी सारे गाडले गेले
मातीच्या ढिगाऱ्याखाली
पाऊस अजून कण्हत होता
रात्रीत हरवले बालपण
विसरावी अशी ती आठवण
हरवलेले, विसरलेले
पाऊस अजून शोधीत होता
कधीतरी संपले अश्रू
आक्रोशही आटून गेले
विझलेल्या चितांवर
पाऊस अजून पडत होता..
- नीला सत्यनारायण, मुंबई.
पावसा, तू हो अवलिया
अविरत कोसळतोय पाऊस
नि मी ऐकतोय नाद उदासीचा
पावसाला अंगभूत लय वियोगाची
पाऊस बरसतोय का समरसून?
पाऊस चैतन्यमयी
सर्जनाला साद घालणारा
मीलनोत्सुक
पावसाची प्रतीकं झालीयत छिन्नविच्छिन्न..
देह-मनातली दरी वाढत चाललीय पावसातून
अंतरीचा मोर सजग होत नाहीय संततधारेतून
तरारलेली ही परकी रोपं
पावसानं गिळंकृत केलंय आश्वासक क्षितीज
पावसा, तू हो अवलिया धुंवाधार
वाहून जाऊ दे हे विषादपर्व
तुझ्या स्पर्शाने होऊ दे वृक्ष निर्भय अन् पाखरं तृप्त
प्रमादशील भूमीवर फिरू दे तुझे हात क्षमाशील
तू होऊन ये कैवारी उपेक्षेच्या प्रदेशात
न्याय दे बीजारोपणाला
पावसा, होऊ दे संवाद तुझ्या-माझ्या प्राणांचा
प्रीतिधारांत न्हाऊ दे सचैल
व्याकुळ अस्तित्वाला
नवा जन्म घेतलेल्या निरागस पावसा,
तू हो सहृदय
मला ग्रीष्मपुत्राला
घे तुझ्या सजल कुशीत..
- प्रा. प्रकाश खरात, मालाड (प.)
Subscribe to:
Posts (Atom)