Monday, August 6, 2012

पाऊस पानोपानी.....



पाऊस पानोपानी
यंदा पावसानं दिलेल्या प्रदीर्घ ओढीनं समस्त जीवसृष्टीच्या डोळ्यांत पाणी आलंय. अजूनही त्याचा रुसवा गेलेला नाही. उन्हानं करपलेल्या काळ्या आईच्या सांत्वनासाठी नुकताच तो येऊन गेला खरा. तसा अधूनमधून तो आशेची किरणं दाखवतोयही; पण त्याच्या मनी काय आहे कुणास ठाऊक! अशी सारी उदासवाणी परिस्थिती भोवती असताही ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाऊसकवितांच्या आवाहनास मात्र कविजनांनी कवितांचा उदंड पाऊस पाडून आम्हास अक्षरश: ओलंचिंब केलं. साधारण दीड ते दोन हजार कविता प्रतिसादादाखल आमच्याकडे आल्या.
आधीच घोषित केल्यानुसार ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी चिकित्सक चाळणी लावून त्यातल्या निवडक कविता आमच्या स्वाधीन केल्या. या निवडक कविता ‘पाऊस पानोपानी’ या विशेषांकात आम्ही प्रसिद्ध करीत आहोत..

माझा पाऊस
पाऊस सगळय़ांचाच असतो
सगळय़ांनी तो भोगलेलाही असतो.
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस
कधीतरी भोगलेला आहे
झेललेलाही आहे.
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण.
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही,
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा.
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे..
मला फक्त
दिसायचा
तिच्या डोळय़ांतील
पाऊस.
तोच पाऊस
मला आठवतो.
तोच पाऊस
मला माहीत आहे.
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेश
अश्रू, हंबरडा
आणि
मूक विलाप..
माझ्या आईचा.
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याच्या अर्थहीन
थेंबांचा आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा..
- एहतेश्याम देशमुख,
मेहरुण, जळगाव

कास्तकाराचा पाऊस
आम्हास कास्तकाराईच्या डोक्स्यावर
तुहय़ा मेहेरबानीची चुंबर देजो, बस्स!
सप्पा अन्न धान्य पिकवाचा
जिम्मा पेलून घेऊ बाप्पा

मंग कायले अमेरिकेचा
लाल मिलो मांगवा लागते?

तूच रुसलास त गडय़ा
कर्जाचा डोंगर आन
नापिकीच्या हालतीने
फासीच घेवा लागल

तू करतेस धिंगाना आन
आमचा होते सत्यानास
तू करतेस मिजास आन
आमचा सुपडा साफ

जिंदगीनीची ऐसी तैसी पायन्यापरीस
मरावा नाई त का करावा?

या बहय़ताड जमान्यात
सबसिडीवर भेटते कार
दुष्काळीचा सातबारा देवाले
पटवारी मांगते रुपये हजार

तिगस्ता तुहय़ा मस्तीन सोयाबीन गेला
गुदस्ता एका पान्यान सप्पा धान मेला

अमदा तरी सरम ठेवजो
मनाजोगता वक्तावर येजो
तू तोंड कारा करून, आमच्या
जिंदगीले चुना नको लावजो
- राजन जयस्वाल,
नागभीड, चंद्रपूर

खेळ..
आठवणी कोसळत राहतात
मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या
प्रत्येक थेंबासोबत
भूतकाळाच्या ढिगाऱ्यावर.
त्यातून पुन्हा उगवतात
नव्या आठवणींचे कोंब.
पाऊस थांबत नाही
भूतकाळाचा ढिगारा जमीनदोस्त होतो
नव्या आठवणींना उगवण्यासाठी.
मी पाहात राहतो
प्रारब्धाचे खेळ..
घराच्या पत्र्यावर तडतडणाऱ्या
संगीत पावसाच्या साक्षीने.
- संजय जाधव,
देवपूर, धुळे.

सुखांतिका


निवळत गेला उन्हात हलक्या पाऊस वेडापिसा
उमटून गेला मातीवरती त्याचा हिरवा ठसा
दरीतले बेधुंद धुकेही भोवळ येऊन पडे
पंख भिजवुनी एकल पक्षी मोहिनीतला उडे
नभी कुंचले फिरवत उडते पावसातली परी
निळे रुपेरी मेघ निघाले काळ्या वाटेवरी
आभाळाने सुखान्तिकेचा मजकूर लिहिला नवा
मऊ अभ्रकी थरांत झिरपे ओथंबून गारवा
घनात फुलवून गूढ पिसारे मोर नाचले तिथे
रत्न उमलले शून्यामधुनी अशी झळाळी फुटे

अजून पडतो मनात पाऊस, तुला ठाउके नाही
थेंबाथेंबामधुनी हलकी करवत फिरवत राही
- जयश्री हरि जोशी, विक्रोळी (प.)
पाऊसवेणा
थंड तुषार अंगावर झेलत
कार्यालयाच्या काच तुटलेल्या खिडकीतून
मी अनुभवतो पाऊस
शिरशिरत, शहारत, रोमांचित होत
कितीतरी वर्षांनंतर..
पाऊस म्हणावं तसा वागतच नाही हल्ली
आभाळ भरून आलं
की मी बापाला विचारतो मोबाइलवर-
‘तिकडे पाऊस आहे का?’
‘नाही. कडक ऊन पडलंय..’
बापाचा निर्जीव सूर.
माझी उदासी मग अधिकच गडद
गच्च आभाळ भरून दाटलेल्या काळोखागत
हुरहुर लावणारी, अस्वस्थ करून टाकणारी
काळजीनं काजळी धरल्यागत बापाचा चेहरा
डोळय़ांत उतरत जातो, नि डोळे बाप होऊन जातात..
तजवीज करून पेरणीसाठी जुळवलेले बी-बियाणे
दिवस दिवस कार उन्हात लायनीत थांबून
मोठय़ा कष्टानं मिळवलेली खताची पोती
अलीकडे प्रकृती बरी नसतानाही
कृशतेच्या खुणा अंगावर लेवूनही
शेतीची तळमळ मुळीच कमी होत नाही
बापाची..
बाप..
आयुष्यभर कष्टून, झिजून
उभारत राहिला आमच्या सुखाचा खोपा..
अन् आम्ही मात्र खोप्याच्या काडय़ा हिसकावून
बांधलीत सिमेंटची घरं
शहरात..
कुठं स्लॅबमधून ठिबकलं तर
सीलिंगचा शो जाईल याची असते आम्हाला काळजी
अन्
पाऊस नाही म्हणून
बाप पोळतो आहे उन्हाच्या जाळानं
याचा मागमूसही नसतो..
‘पाऊस पडतोय इकडे.. खूप चांगला..’
बापाचा मोबाइलवरचा आवाज
आनंदाच्या कंपनांसह थेट माझ्या काळजात..
तुषारांहून अधिक रोमांचतो मी
माझ्या डोळय़ांतलं तेज लपवता येत नाही मला
वाळून कोळ होत आलेली माती
पावसाच्या धारांनी सुखावली असेल..
भेगांच्या जखमा बुजताना
कृतार्थ होत असेल.
जमीन ओलांडून पाण्याचा लोट
मन्याडीच्या दिशेने आतून धावत असेल..
वाहणं विसरून गेलेली मन्याड
आर्त-विव्हळ वाहण्यासाठी स्वागतात असेल.
अन् पाऊस उतरतो डोळय़ांत
माझ्याही नकळत..
- व्यंकटेश चौधरी,
नांदेड

काठी ढगाला डसू दे
गावात घुसावेत हजार दरोडेखोर तसा धाक होता पावसाचा..
काळेभोर ढग अंधार करायचे गावावर तेव्हा
घरांच्या अंगांवर उभा राही काटा.
झोप मरायची. स्वप्नं करपायची. संसार रस्त्यांवर यायचा.
चूल बंद व्हायची.
नवऱ्यानं झोडपून काढावं असा जेव्हा कोसळे पाऊस तेव्हा-
झोपडय़ात नांदणारी तांदळाबाई पावसाच्या नावे
टबाटबा बोंबलायची-
‘‘आरं दुस्मना, जगू देतू का नाय?
पीठमीठ चिखल झाला
झोपडय़ात पाण्याचा डव्ह झाला
भाकरीची दुरडी गेली वाव्हून
सापइच्चू आथरुणात आले मेले
आरं बाबा, घरच झालं हीर..’’

बैलांच्या खुरांजवळच्या जखमा सडत
वासरूलेकरं नाल्याच्या पुरात जिरतमरत
आंग झाकाय धडुतं नसं आणि पोट विझवायला अन्न!
पाऊस यायचा लक्ष तोंडांचा राकीस बनून.

मरणमार पाऊस झाला की :
शाळा बंद. मास्तरचं तोंड न पाहण्याचा आनंद मुलांवर उमटे.
बंबाट पाऊस झाला की :
पाखरांची हिरवीजांभळी मस्ती आभाळाला सजवायची.
बंदुकांतल्या गोळय़ा बरसाव्यात असा यायचा पाऊस तेव्हा
झाडांचं हिरवं साम्राज्य गुणाकारानं हिरवं व्हायचं..

आता पोट फाटावे असे आभाळ का फाटत नाही?
धोंडा माती यांना ओली लिपी तो का देत नाही?
मातीखाली बिया टोचणाऱ्या हातांना तो बळ का देत नाही?
माळरान उलथू दे. झाडपान झडू दे. काळप्रेत सडू दे.
आंधळी रात्र मरू दे. बैलशिंग ढगाला टोचू दे.
कुणब्याची काठी आभाळाला डसू दे. कायबी होऊं दे..
पण पावसा, हत्ती पिसाळल्यागत तू ये..
- केशव सखाराम देशमुख, नांदेड

पाऊस


तू तिथे डोंगराच्या कुशीत, ढगांच्या गोधडीत
स्वत:ला लपेटून पहुडलेला
आणि मी इथे कासावीस
उघडय़ा मोकाट वाऱ्याने गुदमरलेला

तू तिथे पानाफुलांच्या कानाशी
हुळहुळत त्यांना खेळवणारा
आणि मी इथे वैशाखाच्या उष्ण झळांशी
भर दुपारी झटपटणारा

तू तिथे एकेक गुपित उलगडत
पालटून टाकतोस रंग सारा
मी इथे जपत राहतो, लपत राहतो
बंद कुपीत झाकत स्वत:ला

मला भिजवण्याचा जिवापाड आटापिटा
व्यर्थ जातोच हे माहीत असताना
असा का वागतोस माहीत नाही
हे तुझं चिडवणं, खिजवणं
की अजून काही? माहीत नाही.

की पोटच्या सगळय़ा मायेनिशी माझ्यावर बरसल्यावर
माझ्या शुष्क डोळय़ांतलं आटलेलं पाणी
स्वत:च्या डोळय़ांत शोधतोस?
माहीत नाही.
- सोनल कर्णिक-वायकुळ,
दहिसर.
पाऊस : आठवणींचा


पावसात एक बरं असतं
भिजून घेता येतं
भिजता भिजता आतून आतून
रडून घेता येतं

कोसळता सरी ओठांवरती
अधीर होते मन
थेंबाथेंबातून साजरा होतो
आठवणींचा सण
ओल्या मातीत आठवणींच्या मग रुजून येता येतं..
भिजता भिजता..

आठवत राहतात तिलाही मग
हुळहुळणारे गाल
टिचभर छत्री टपटपणारी
अन् भिजलेला रुमाल
चिंबओल्या रुमालानं तिच्या डोकं पुसून घेता येतं..
भिजता भिजता..

आसू, हासू, आशा, हुरहुर
पावसाला सारं कळतं
मेंदीभरल्या तळहातावर
पावसाचं तळं जळतं
विरहाची काडी सुलगावून त्यात जळून घेता येतं..
भिजता भिजता..

सरतो पाऊस, फिटते धुके
वास्तवाचे पडते ऊन
मन म्हणते- चल रे गडय़ा,
आपल्या घरी आपणहून
पागोळय़ांचे बनून थेंब रेंगाळत राहता येतं
भिजता भिजता आतून आतून रडून घेता येतं..
पावसात एक बरं असतं..
- मिर्झा अन्वर अहमद,
 शहापूर.
संध्याकाळचा पाऊस


ढगांनी गच्च दाटलेलं निळसर राखाडी आकाश
क्षितिजाच्या समांतर रेषेवर ऋतुलहरीनुसार कलंडताना
सांध्यसूक्ताचा आरंभ करत कोसळू लागतो अपरंपार पाऊस
आठवणींचे नितळकाच संदर्भ घेऊन

शरीराच्या सतारीवर मेघमल्हाराची बंदिश छेडताना
उमलवतो पाऊस इंद्रियांच्या निबीड अरण्यातले स्पर्शपिसारे
नि निनादतात तिच्या गळय़ातून पाझरलेल्या आरोह-अवरोहांचे सूर
त्वचेच्या प्रत्येक ओल्याशार रंध्रातले पर्जन्यगीत होऊन

संध्याकाळच्या झिरमिरत्या काळोखात
समजूतदार पुराणपुरुषांसारखी मातीत पाय गच्च रोवलेली झाडं
सजवून घेतात फांद्यावर ‘तिच्या’ आठवणींच्या लक्षावधी काजव्यांची पालखी
पावसाचं सांजस्वगत माझ्यासमोर हळुवार गुणगुणताना..

‘तिच्या’ मुलखातून ऐकू येतात
विरहव्याकुळ रानमोरांचे आर्त पुकारे दहा दिशा सांजवताना
नि पावसाची द्रुतलय अधिकच जोर धरू लागते
माझ्या मेंदूच्या पेशींमधल्या अवकाशात ‘तिच्या’ आठवणींचे ढग
गच्च दाटून येतानाच्या प्रत्येक संध्याकाळी..!
- विनय पाटील
भरपावसातलं अजिंठा..
चिंब भिजलेले अजिंठय़ाचे डोंगर
धुंवाधार पाऊस
प्रचंड गारठा
अन् त्यात गोठलेलं अजिंठा..
    डोंगरमाथ्यावर
    धबधब्यांची दुधाळ कारंजी
    भिजलेली झाडं
    त्यावर गारठून थिजलेली माकडं
    पाखरांच्या पंखांवरही
    शेवाळ साठलेलं..
कुणीसं धावत पुढे आलं
स्वत: पावसात भिजत
आपली छत्री मला देत म्हणालं-
असा धुंवाधार पाऊस
कैक वर्षांत झाला नव्हता
छत्री घ्या नि निवांत फिरा अजिंठा
फक्त वीस रुपये द्या छत्रीचे
भाडय़ाचे पैसे मिळतात
पोरंबाळं दोन घास खातात
पावसात भिजून मी काय मरतो थोडाच?
खूप बघा लेणी;
अन् लेण्या-देण्याचा व्यवहार!
   
    पहिल्या नंबरच्या गुहेतला
    सरकारी रखवालदार
    भ्रष्ट दात विचकत म्हणाला-
    फक्त दहा रुपये द्या साहेब
    तुम्हाला गंमत दाखवतो.
    आणि दाखवतो पगारासोबत आम्ही
    आणखी काय काय खातो.

पलीकडे कुणी एक ती
अगदी एकटी
सोळा नंबरच्या गुहेपाशी
चित्रातल्या आरशात
त्याचं प्रतिबिंब पहात
अन् बेइमान नजरेनं
माझ्याकडे बघून हसत..

कोपऱ्यात एक गुलुगुलु जोडपं
सतरा नंबरच्या गुहेपाशी
हस्तिदंताचा हट्ट धरणाऱ्या
राजकन्येच्या शोधात
एकमेकांना छत्रीत घेऊन
छत्रीचाच आडोसा करत..

चिंब भिजलेले अजिंठय़ाचे डोंगर
माथ्यावरल्या धबधब्यातून
रिते होत होते
वाघुरा नदीत..
अन् वाघुरीची चिरंजीवी चंद्रकोर
मर्त्य जगाकडे पाहून
फेसाळून हसत होती
म्हणत होती-
अखेर सारेजण येणार
फिरत फिरत गोल गोल
सव्वीस नंबरच्या गुहेपाशी
जिथे आहे पहुडलेलं
पृथ्वीवरचं अंतिम सत्य
भगवान बुद्धाचं महानिर्वाण!
    - सुहास द. बारटक्के,  चिपळूण

निळं पाखरू


बाहेर पानाफुलांवर रिमझिमताना
माझ्या मनात मात्र चालू असतं
त्याचं धुंवाधार तांडव

पूरच येतो मग.. अगदी महापूर!
वाहत जाते मी त्यात
अपरंपार
जराशानं तो उसंत घेतो
पण तोवर
खूप सारी पडझड झालेली असते

काहीच तर उरलं नाही
असं वाटत असताना
दूरवर एका उन्मळून पडलेल्या
झाडाच्या फांदीवर
दिसतं मला एक निळं पाखरू
चोचीत हिरवी काडी घेऊन बसलेलं,
नोहासारखीच माझी आतली सृष्टी
तगवीत असलेलं.
- संगीता अरबुने, वसई
काय माहीत?


पाऊस कोसळून
जातो.
कुठे जातो?
त्याचा पाठलाग कसा करायचा?
तो जे घेऊन जातो ते
माझं नसतं.
तरी त्याविना जगणं
पोकळ वाटतं.
तो गेलेला पाऊस
परत येत नाही.
मी वाट पहातो.
अनेक पावसाळे येतात, जातात
पण तो पाऊस येत नाही.
आता हे जगणं
माझं की
त्या पावसाचं?
उरतं फक्त एक गाणं-
‘येरे येरे पावसा..’
कुणाचंच नसलेलं.. किंवा सगळ्यांचंच असलेलं?
काय माहीत!
- रवींद्र लाखे, कल्याण
पाऊस असा हा..
आले आभाळ भरून, लागे पावसाची धार
मन कावरे बावरे, उरी उठवी काहूर
ओल्याकंच मिठीतील, वेडावती आठवणी
पावसाची रिमझिम, दाह वाढवी अजुनी
पहिल्याच पावसाने, असा मांडला कहर
आले शहारून अंग, मन झाले सैरभैर
अंकुराला गोंजारित, मुक्त मनाने बरस
जवळीक साधणारा, हवाहवासा पाऊस
- डॉ. धुंडिराज शं. कहाळेकर,
कोल्हापूर

पुन्हा पाऊस वळला..
पाठमोरा होता होता पुन्हा पाऊस वळला
दिलाशाचे मंद हासू रानी सांडुनिया गेला ।।धृ।।

नाचणाऱ्या पावलांनी बाळवारा वनी आला
पाचोळय़ाचे भिरभिरे फिरवीत उधळला
संगे गिरकी घेताना पंख फुटले धुळीला..

रानझरी खुदकली गरतीचा साज ल्याली
सानओहोळ कुशीत घेऊनिया झेपावली
सांगे कडेकपारींना- ‘आला मुऱ्हाळी न्यायला..’

घळीतून कारवीचे निळे सूर ओघळले
आवतन मधुदाट कुणी वेचले, टिपले
निळय़ा पावरीचा सूर आज समेवर आला..

रानअळू खुळावले सुखभारे हिंदोळले
कुणी पर्णकायेवर चंद्रमणी खेळविले
चाळा रानझुळकेचा गोड छळुनिया गेला..

सोनसळी कांतीवर पंखस्पर्श थरारला
सोनकीच्या बिंबासवे मेघ निळुला डुंबला
रंगभासांची कंपने, ऋतू झिम्म शहारला..

धारावत्या ओळींतून थेंब नितळ ओवले
वेशीवरती स्वप्नाच्या शब्द पाकोळय़ांचे झाले
मल्हारल्या कवितेत प्राणगंध ठिबकला..
- माणिक वांगडे, मुंबई

पाऊसधारा
    पाऊसधारा
    अंगावर झेलीत
    इंद्रधनुष्य
    पाहत होतो
ऊन-पाऊस
खेळताना
धरती संगे
नाहत होतो
    नवा रंग
    नवा गंध
    मनास नवेपण
    देऊन जातो
निसर्ग सारा
मोहरताना
हिरवा धडा
वाचत राहतो
    झटकून टाकी
    मरगळ सारी
    पाऊस हसरा
    लवून पाहतो
मनास फुटे
नवी पालवी
अंतरंगी
बहरत राहतो
- एकनाथ आव्हाड,
चेंबूर.

गोवर्धन
घन झुकले रानात
    घन भिनले मनात
घन मेघदूत झाले
    माझ्या आषाढबनात

घन वाऱ्यावरी डोले
    घन विजेसंगे बोले
माझ्या अधीर अंतरी
    घन लपंडाव खेळे

घन काजळात न्हाले
    घन कृष्णरूप ल्याले
त्यांच्या वर्षांवात माझे
    अंग गोवर्धन झाले!
- डॉ. विद्याधर करंदीकर, कणकवली.

आज भिजला पाऊस..
बेभानल्या वाऱ्यासंगे, भान हरला पाऊस
थेंब थेंब गोंदवुनी, आज भिजला पाऊस

आभाळाने धरलेले, काळे ढग हे उराशी
माझी जाणून असोशी, उधाणला हा पाऊस

कसा ग्रीष्म मी साहिला, त्याला ठाऊक असावे
झळा विझवाया साऱ्या, आज कोसळे पाऊस

मेघमल्हाराचे सूर, कसे, कोणी आळवले
सुरावरी त्या भाळुनी, आज नादला पाऊस

झाडे वेली झिंगताना, जणू सचैल नाहल्या
पिसाऱ्यातुनी हिरव्या, आज गायला पाऊस

आली प्रार्थना या कानी, पेरलेल्या बियाण्याची
आला हिरव्या कोंबांना, जीव द्यायला पाऊस

धूळ चिडीचीप झाली, कात टाकली घरांनी
आनंदाश्रू अवघ्यांचे, आज प्यायला पाऊस

आल्या नव्हाळीच्या कळा, मन धुंद कुंद माझे
माझ्या लेखणीमधून आज झरला पाऊस

आज भिजला पाऊस.. आज भिजला पाऊस..
- आनंद श्रीधर सांडू, चेंबूर.

कसा वागतो पाऊस
डोंगराच्या डोक्यावर  कसा नाचतो पाऊस
नदीमध्ये नागव्याने,  कसा हासतो पाऊस
वेडे उनाड वासरु  बागडते रानोमाळ
घुंगराच्या तालावर,  कसा वाजतो पाऊस
भयभीत ओलीचिंब  श्वास टाकते धरणी
आडरानी एकटीला,  कसा गाठतो पाऊस
गर्द गर्भार नदीचा  डोह तुडुंबला पोटी
ओणावून उरीपोटी,  कसा भेटतो पाऊस
कातळाला भिजवून  गवताला लोळवून
कडय़ावरून दरीत  उडी टाकतो पाऊस
मिट्ट काळ्या काळोखात  बेडकांची बडबड
ओलेत्यानं येरझारा,  कसा घालतो पाऊस
झोंबाझोंबी अंगोपांगी  कोसळून झाल्यावर
नामानिराळा त्रयस्थ,  कसा वागतो पाऊस
पाण्या-माती भेटवून  सारे रान पेटवून
हिर्वी शाल पांघरुन,  शांत झोपतो पाऊस
- साहेबराव ठाणगे, वाशी.



पाऊस अजून पडत होता
अंधाराच्या कुशीत शिरून
पाऊस अजून रडत होता
कधीच सरली रात्र तरीही
पाऊस अजून पडत होता

काही श्वास तगून होते
बाकी सारे गाडले गेले
मातीच्या ढिगाऱ्याखाली
पाऊस अजून कण्हत होता

रात्रीत हरवले बालपण
विसरावी अशी ती आठवण
हरवलेले, विसरलेले
पाऊस अजून शोधीत होता

कधीतरी संपले अश्रू
आक्रोशही आटून गेले
विझलेल्या चितांवर
पाऊस अजून पडत होता..
- नीला सत्यनारायण, मुंबई.
पावसा, तू हो अवलिया
अविरत कोसळतोय पाऊस
नि मी ऐकतोय नाद उदासीचा
पावसाला अंगभूत लय वियोगाची
पाऊस बरसतोय का समरसून?
पाऊस चैतन्यमयी
सर्जनाला साद घालणारा
मीलनोत्सुक
पावसाची प्रतीकं झालीयत छिन्नविच्छिन्न..
देह-मनातली दरी वाढत चाललीय पावसातून
अंतरीचा मोर सजग होत नाहीय संततधारेतून
तरारलेली ही परकी रोपं
पावसानं गिळंकृत केलंय आश्वासक क्षितीज

पावसा, तू हो अवलिया धुंवाधार
वाहून जाऊ दे हे विषादपर्व
तुझ्या स्पर्शाने होऊ दे वृक्ष निर्भय अन् पाखरं तृप्त
प्रमादशील भूमीवर फिरू दे तुझे हात क्षमाशील
तू होऊन ये कैवारी उपेक्षेच्या प्रदेशात
न्याय दे बीजारोपणाला

पावसा, होऊ दे संवाद तुझ्या-माझ्या प्राणांचा
प्रीतिधारांत न्हाऊ दे सचैल
व्याकुळ अस्तित्वाला
नवा जन्म घेतलेल्या निरागस पावसा,
तू हो सहृदय
मला ग्रीष्मपुत्राला
घे तुझ्या सजल कुशीत..
- प्रा. प्रकाश खरात, मालाड (प.)

Saturday, April 7, 2012

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार..!!

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कारBookmark and SharePrintE-mail
डॉ. गिरीश कुलकर्णी ,रविवार ८ एप्रिल २०१२
altगोव्यात बेकायदा खाणींविरुद्ध आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रा. राजेंद्र व पौर्णिमा केरकर दाम्पत्य जिवावर उदार होऊन लढते आहे. मेळघाटात आदिवासी बालकांचे कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांवर डॉ. कविता आणि डॉ. आशीष सातव पथदर्शी काम करीत आहेत. मध्य प्रदेशच्या ग्रामीण आदिवासी भागात ‘समाज प्रगती सहयोग’ ही भारतातील दहा राज्यांतील उच्चविद्याविभूषित तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था पाणलोट क्षेत्र विकास व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सुयोग्य अंमलबजावणीद्वारे समग्र परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिते आहे. अंध आणि अपंगांसाठी मध्य महाराष्ट्रात अजित कुलकर्णी समर्पित वृत्तीने ‘अनाम-प्रेम’ या संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे. अहमदनगरमध्ये अंबादास चव्हाण, अनिल गावडे, अजय वाबळे, वैजनाथ लोहार, प्रवीण मुत्याल, मीनाताई altशिंदे, संगीता शेलार ‘स्नेहालय’च्या नव्या प्रकल्पांद्वारे एच.आय.व्ही.- एड्सबाधित वेश्या, वंचित बालके यांच्या पुनर्वसनाचे पथदर्शी प्रकल्प उभारत आहेत. हनीफ शेख आणि राजीव गुजर नगरमध्येच आठ झोपडपट्टय़ांतील सुमारे दोन हजारांवर वंचित बालकांचे जीवन बदलण्यासाठी ‘बालभवन’ या प्रकल्पाद्वारे एक अभिनव प्रयोग करीत आहेत. बीड जिल्ह्य़ात गेवराई तालुक्यात एच.आय.व्ही.- एड्सबाधित बालकांसाठी संतोष गर्जे ‘सहारा अनाथालय’ चालवतो आहे. संगमनेरला राजा अवसक धनदांडग्या राजकारण्यांविरुद्ध गरीबांच्या हक्कांची लढाई लढतो आहे. खांडगावला संतोष पवार वेश्यांची आणि एड्सबाधित मुले सांभाळतो आहे. ठाण्याचा सुयोग मराठे आपल्या पीएच.डी.चा अभ्यास सांभाळत ग्रामीण भागात तरुणांसाठी श्रमसंस्कार शिबिरे आयोजित करतो. पुण्याजवळ उरळी कांचन येथे डॉ. अनिल कुडिया आपली सुपर क्लास वनची नोकरी पणाला लावून पुण्यातील व्यसनाधीन आणि लालबत्ती भागातील बालकांचा र्सवकष विकास घडवतो आहे. दिल्लीत ‘गुंज’ ही संस्था उभी करून अंशू आणि मीनाक्षी गुप्ता या दाम्पत्याने वनाधिकाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मॅगसेसे पुरस्कार मिळविणारी नीलिमा मिश्रा जळगाव जिल्ह्य़ातील बहादरपूरला स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी ग्राम बनविण्यासाठी एक दशकापासून अविरत झटते आहे. श्रीगोंदा येथे अनंत झेंडे हा मुलगा महामानव बाबा आमटे विद्यार्थी सहाय्यक समितीद्वारे २५ गरीब, गरजू विद्यार्थ्यांना जीवनमूल्य आणि जगण्याचे ध्येय देत शिक्षणाला आधार देत आहे.. अशी ही यादी न संपणारी आहे. 
altआज देशातील कानाकोपऱ्यात सेवाकार्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले असंख्य तरुण-तरुणी लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. त्यांच्या या रचनात्मक धडपडीमागे प्रेरणेचा आणि ऊर्मीचा एक समान धागा आहे. ज्याचे नाव- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्याप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, त्यांच्या सहवासातून आणि त्यांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरांतून!
देशातील प्रत्येक राज्यात असे सेवाकार्याच्या ध्यासाने पेटलेले तरुण-तरुणी आपापल्या पंचक्रोशीतील भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. कुठे संघर्ष झडतो आहे, कुठे रचनेचा आविष्कार अंकुरतो आहे, कुठे रचना आणि संघर्षांचा योग्य मेळ घालून व्यवस्थेवर परिवर्तनासाठी दबाव तयार केला जातो आहे. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्याची प्रेरणा जाणून घेतल्यावर जाणवते की, अशा हजारो धडपडींमागे एका समान प्रेरणेचा आणि ऊर्मीचा धागा आहे. ज्याचे नाव आहे- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, सहवासातून आणि बाबांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीच्या धगधगत्या अग्निकुंडातून!
आपला देश सध्या संक्रमणावस्थेतून चालला आहे. अस्वस्थ करणारे समाजातील अनेक नवे बदल आपल्याला सतावत आहेत. देशासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या समíपत देशभक्तांचा क्रांतिवाद आणि त्याग आजच्या तरुणाईतून जणू लुप्त झाल्याची शंका येते. सतत एस.एम.एस., ई-मेल, फेसबुकमध्ये दंग असणाऱ्या आजच्या तरुणाईला आपल्याच समाजातील करोडो शोषित, वंचितांच्या नरकमय जीवनाची किंचितही जाणीव असू नये, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण निराशेचे हे मळभ एका निरलस सेवा परंपरेला आपण सजगपणे स्मरतो तेव्हा दूर होते. ‘पेरते व्हा..’ हा आश्वासक भाव आपल्या मनात प्रज्ज्वलित करणारे हे अग्निकुंड म्हणजेच महारोगी सेवा समितीच्या आनंदवन प्रकल्पातर्फे दरवर्षी आयोजिली जाणारी सोमनाथची श्रमसंस्कार छावणी! यंदाही संवेदनशील आणि कृतिशील तरुणाईला १५ ते २२ मे या काळात जीवन संपन्न करणाऱ्या या छावणीच्या अनोख्या अनुभूतीची संधी मिळणार आहे.
१९६७ साली बाबा आमटे या द्रष्टय़ा महामानवाने चंद्रपूर जिल्ह्य़ातील सोमनाथच्या जंगलात ही सेवाकार्याची धुनी प्रज्वलित केली. गेली ४५ वष्रे देशभरातले स्वप्नं पाहणारे आणि त्या स्वप्नासाठीच जगू इच्छिणारे हजारो तरुण-तरुणी इथे एकत्र येतात. इथल्या यज्ञकुंडातील निखारे हृदयात भरून परततात. आपल्या क्षमता एकवटतात आणि त्या समाजासाठी विकसित करतात. श्रमाची प्रतिष्ठा आणि सामूहिक श्रमाचे मोल जाणतात. याच सेवा परंपरेतून आणि प्रेरणेतून भारताच्या नवनिर्माणाचे असंख्य प्रयोग देशभर ठिकठिकाणी सुरू आहेत.
बाबांनी सोमनाथचा श्रमसंस्कार ‘याग’ सुरू केला तेव्हा ‘एन. जी. ओ.’ हा शब्द किंवा ‘एन. जी. ओ. संस्कृती’ आजच्या एवढी प्रचलित नव्हती. या श्रमसंस्कार छावणीमुळे गेल्या चार दशकांत उपेक्षित, सर्वहारा, सर्वघृणित समूहांमधील ‘माणूस’ जागा करण्याची प्रेरणा तरुणाईला मिळाली. मानव्याची आणि स्वीकाराची पहाट शतकानुशतके काळोखातच पिचलेल्या माणसांच्या आयुष्यात उगवली. देशभर भारलेल्या तरुणाईमुळे अक्षरश: हजारो प्रकाशाची बेटं प्रज्ज्वलित झाली. अंधाराला चिरत उज्ज्वल उदयाची आशा येथील श्रमसंस्कारांमुळे शिबिरार्थीत प्रखर झाली. या श्रमसंस्कार छावणीत जो येतो, तो बदलतोच. जो स्वत: बदलतो, तो वेगळ्या पद्धतीने जगण्याचा आणि नि:स्वार्थ वृत्तीने समाजासाठी श्रमण्याचा निर्धार करतो.. श्रमालाच परमेश्वर मानतो आणि त्यातून आपल्या समाजात, पंचक्रोशीत सकारात्मक बदल घडवतो. वेगळ्या पायवाटा मळण्यासाठी आतुर असलेल्या, एका वेगळ्या आव्हानात्मक, अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न अशा आयुष्याचा शोध घेणाऱ्या मनस्वी तरुणाईला सोमनाथची श्रमसंस्कार छावणी नित्य साद घालत आली आहे. आशयसंपन्न जीवनाचा आयुष्यात शोध न लागलेले ‘सत्तरीचे तरुण’ही छावणीत येतात. परंतु सोमनाथला घनदाट जंगल आहे. येथे उन्हाचा कडाका असतो. तो झेपण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी असायला हवी. दरवर्षी १५ ते २२ मेपर्यंत चालणाऱ्या या श्रमसंस्कार छावणीत केवळ वेगळ्या, जंगलानुभवाच्या, पर्यटनाच्या अपेक्षेने कोणी येईल तर मात्र त्याची निराशा होईल. नवनिर्माणाच्या आव्हानासाठी आसुसलेल्या तारुण्यसुलभ संघर्षांची अनिवार ऊर्मी तुम्ही उरात बाळगून असाल तर मात्र सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीचे हे निमंत्रण खास तुमच्यासाठीच आहे.
बाबा आमटे शब्दप्रभूही होते. ते म्हणायचे, ‘सुळासाठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. थोर श्रद्धा आणि ध्येयांना महान अग्निदिव्यातून जावे लागते.’ अशी विचारधारा तरुणाईला देणाऱ्या बाबांनी समाजाने झिडकारलेल्या कुष्ठरोग्यांच्या सर्वागीण पुनरुत्थानासाठी १९४९ साली आनंदवनाची स्थापना करून करुणेचा कलाम जगाला दिला. सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा इत्यादी प्रकल्पांतून सेवेचे यज्ञकुंड बाबांनी सुरू केले. समाजातील जवळपास सर्वच वंचित, उपेक्षित घटकांच्या जीवनाला स्पर्शणारे उपक्रम बाबांनी सुरू केले. कुष्ठरुग्ण, अंध, मूकबधिर, बहुविकलांग, वृद्ध, आदिवासी समस्याग्रस्तांसाठी या प्रकल्पांत हक्काचे घर आणि परिवार बाबांनी बनवला. म्हणूनच ‘सेवाकार्याची समग्र गीता’असे आनंदवन प्रयोगाला म्हटले गेले.
समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांसह कार्य उभारत असताना लोक बाबांची पाठीमागे टवाळी करायचे. ध्येयासक्तबाबांना मात्र कोण काय म्हणतो, याची कधीही फिकीर नव्हती. बाबा म्हणायचे, ‘जोपर्यंत समाजातील युवक जागा होत नाही, तोपर्यंत समाजातील दैन्य, वेदना आणि अश्रू संपूच शकत नाहीत.’ या चिंतनातून त्यांनी ‘हाथ लगे निर्माण में, नही माँगने, नहीं मारने’ हा मंत्र युवा पिढीला दिला. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी हे समाजाचे दोन मुख्य घटक. या दोन्हीमधील दरी जशी रुंदावत जाईल, तशी सामाजिक-आíथक विषमता आणि शोषण समाजाचा विनाश घडवील, असे बाबा म्हणायचे. श्रम आणि श्रमिकाला तुच्छ लेखणारा समाज असंस्कृत आणि अज्ञानी असतो, तो कधीच प्रगतिशील नसतो, असे ठणकावणारे बाबा स्वत: एक ‘श्रम-बुद्धिजीवी’ होते. म्हणूनच बाबांनी विद्यादान करणाऱ्या विद्यापीठांबरोबरच श्रमाचे आणि सेवेचे महत्त्व तसेच संस्कार देणारे विद्यापीठ असावे अशी कल्पना मांडली. १९६७ साली चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल या तालुक्याच्या गावापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलामध्ये सोमनाथ प्रकल्पाची सुरुवात झाली आणि श्रमसंस्कार छावणीची मुहूर्तमेढही रोवली गेली. भारतभरातून भारलेल्या युवक-युवतींचे तांडे या प्रकल्पात श्रमाचे संस्कार घेण्यासाठी येऊ लागले. १५ मे १९६७ रोजी पहिले श्रमसंस्कार शिबीर बाबांनी आयोजित केले.
७० च्या अस्वस्थ दशकात अस्वस्थ तरुणाईला एकत्र येण्याचे एक माध्यम हवे होते.  मुक्त, खुल्या संवादासाठी एक व्यासपीठ हवे होते. तरुणांना आपले विचार तर्कावर घासून पाहायचे होते. स्वतच्या जीवनाची आणि कार्याची दिशा ठरवायची होती. विचार वेगळे असतानाही किमान सहमतीच्या मुद्दय़ांवर आधारित एकत्र काम कसे करायचे, याबद्दल अनेकांच्या मनात संदिग्धता होती. बाबांच्या छावणीने या अस्वस्थतेला व्यक्त व्हायला एक सक्षम, खुले व्यासपीठ दिले. या सर्वाना श्रमसंस्काराचा वसा देण्यासाठी बाबांनी कोणताही ‘इझम्’ या छावणीला चिकटवला नाही. बाबांना स्वतचा नवा संप्रदाय किंवा ‘फॅन क्लब’ तयार करून इतरांविषयी अविश्वास वा नकारभाव पेरायचा नव्हता. एकमेकांच्या सहवासाशिवाय आणि परस्परांना नीट समजून घेतल्याशिवाय एकत्र येऊन रचनात्मक किंवा संघर्षांत्मक काम करू शकत नाही किंवा ते टिकवूही शकत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. बाबांनी कधीच कुणाला नाकारले नाही. त्यामुळे सर्व विचारधारांचे युवक बाबांच्या छावणीत यायचे. एकमेकांकडून बरेच काही शिकायचे. काही स्वीकारायचे, काही नाकारायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबांचा कठोर श्रमांवर आधारित कर्मवाद त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानच बदलून टाकीत असे. ‘मणभर बाष्कळ गप्पांपेक्षा अर्थपूर्ण लहानशा कृतीतूनच मानव्य साकारते’ हे बाबांचे तत्त्वज्ञान तरुणाईला भावायचे. त्यामुळे भेदाभेद, तोडफोड, प्रतिक्रियावादाऐवजी रचनात्मक पायावरील श्रमवाद आणि एकात्मतेचा भाव या शिबिरांमधून बाबांनी भारलेल्या या युवावर्गाला दिला. परिस्थिती आणि इतरांशी समायोजन या छावण्यांनीच तरुणांना शिकविले.
सुरुवातीची आठ वष्रे हे शिबीर एक महिना चालायचे. वैदर्भीय तप्त हवामानात बाहेरच्या युवक-युवतींनी यावे, परिवर्तनाच्या टप्प्यावर नवे सामाजिक बदल त्यांनी स्वीकारावे आणि मुख्य म्हणजे सकाळी व संध्याकाळी घामात निथळवणारे श्रम करावेत, अशी संकल्पना सुरुवातीपासूनच रुजली. शिबिराची संवादभाषा ही राष्ट्रभाषा हिंदी होती. भारतातील उत्तरेकडील काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहारपासून ते दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतले युवक-युवती या शिबिरांना १९६७ पासूनच येत राहिले. बंगाल, आसाम, ओरिसा इत्यादी पूर्वोत्तर राज्यांतून १९७३ नंतर तरुणाई येऊ लागली आणि या बहुभाषिक शिबिरार्थीमुळे या शिबिरास जणू लघू भारताचेच रूप येऊ लागले.
शिबिरात येण्यासाठी आगाऊ नोंदणी श्रेयस्कर ठरते. छावणीचा कालावधी १५ मे ते २२ मे असतो. १४ मे रोजी भारतभरातून युवक-युवतींचे जथ्थे सोमनाथ प्रकल्पात दाखल होतात. १५ मे रोजी सकाळी ५.३० वाजता ध्वजारोहणाने श्रमसंस्कार छावणी सुरू होते. भारत जोडोचे, श्रमप्रतिष्ठेचे नारे दिले जातात. हिंदी-मराठीसह बहुभाषिक प्रेरणागीते ताल-सुरात गात तरुणाईचा श्रमयज्ञ सुरू होतो. ‘नौजवान आओ रे, नौजवान गाओ रे, लो कदम मिलाओ रे, लो कदम बढाओ रे’ अशी किमान पाच-सहा गीते शिबिरात सहज पाठ होऊन जातात. सकाळी ६.३० पासून श्रमदानाला सुरुवात होते. कुदळ, फावडे, पाटी आदी साहित्य घेऊन शिबिरार्थी कामाच्या जागी निघतात. शिबिरादरम्यान सात दिवसांच्या काळात श्रमातून एखाद्या तलावाचे खोलीकरण, नाल्याची बांधबंदिस्ती, वृक्षलागवडीसाठी खड्डे करणे असा भरगच्च कार्यक्रम असतो. छावणीमुळे राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक जाणिवा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तरुणांमध्ये अंकुरतो. सकाळी तीन तास श्रमानंतर दुपारच्या सत्रात बौद्धिक व्याख्याने होतात. यात प्रत्यक्ष सामाजिक विकासाच्या, परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय असणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांशी तरुणाईचा थेट संवाद होतो. गेल्या ४५ वर्षांत अनेक दिग्गजांनी शिबिरातल्या मुलांसोबत अशा प्रकारे संवाद साधला आहे. संध्याकाळच्या सत्रात शिबिरार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. हे शिबीर शेती, जंगल, जमीन, गरीब व वंचितांशी तरुणाईचे नाते जोडते. प्रत्येकाला दुसऱ्या जिल्ह्य़ातील वा राज्यातील मित्र देते. येथे श्रमणारी मने आपोआप नम्र, अंतर्मुख आणि रचनात्मक होतात. आपला देश आणि समाज समजून घेण्याची दुर्मीळ संधी ही छावणी देत असते.
आता बाबा आणि साधनाताई हयात नाहीत; पण डॉ. विकास आणि डॉ. भारतीताई आमटे ही दुसरी पिढी छावणीत शिबिरार्थीना भेटते. विकासदादा या तरुणाईत रमतात. आज आनंदवनाची नवी पिढी नवीन वाटा मळते आहे. नवा वारसा तयार करते आहे. आनंदवन आता आपल्या नव्या युवा संचासह छावणीच्या आयोजनात व्यस्त आहे. यंदाचे शिबीर काही नव्या संकल्पनांसोबत राबविले जाईल. शिबिरार्थीना सेवाकार्याच्या नव्या जागा आणि साधनजुळणीची कौशल्ये ज्ञात करून दिली जातील. प्रत्यक्ष सेवाकार्यानुभवासाठी आपल्या आयुष्यातील काही काळ कोणी देणार असेल तर त्यास योग्य ती संस्था आणि सेवाकार्य सुचविणे, धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांशी नियमित संवाद वाढविण्याची योजना, इतर युवा शिबिरे व छावण्या यांच्याशी संवाद व सामूहिकरीत्या तरुणाईसोबत राबविण्याची कार्ययोजना आखणे असे बरेच काही यावर्षीच्या छावणीच्या निमित्ताने योजले आहे, अशी माहिती शिबिराचे संयोजक कौस्तुभ आमटे यांनी दिली. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने नावनोंदणीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधावा- कौस्तुभ विकास आमटे, सहाय्यक सचिव- महारोगी सेवा समिती, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र, पिन- ४४२९१४. भ्रमणध्वनी- ९८६९३३३४८८/ ९५५२५८२२१५. ई-मेल : somnathcamp@gmail.com

त्या फुलांच्या गंधकोषी ...!!!

ती आई होती म्हणुनी...

कवी ग्रेस यांच्या कवितेतून व्यक्त झालेली ‘आई’  अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात. तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली, असे ते मानतात... 
And when my voice is silent in death,
my song will speak in your living heart
- Ravindranath Tagore
कवी ग्रेस यांच्या मृत्यूनंतर रवींद्रनाथांचे हे उद्धृत अधिकच खरे ठरते. मृत्यूमुळे त्यांचा स्वर शांत झाला असला, तरी त्यांच्या कवितांची गूढ आशयांची स्वरावली रसिकमनात स्पंदत राहिली आहे..राहणार आहे..
शब्दांच्या आशयाच्या, प्रतिमांच्या धुक्यासारख्या रचना करणाऱ्या या कवीच्या प्रतिभेचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण तो पूर्णत्वाला गेला असा दावा कोणीच करू शकलेले नाही. तरीही पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितेच्या आशयाचा, रचनालयीचा, प्रतिमांचा उलगडा करून पाहावा असे मात्र सतत वाटत राहते. त्यांच्या कवितेची ही सारी अंगे, तिचे तरल पदर संपूर्णपणे न्याहाळणेही अवघड वाटावे. म्हणून येथे फक्त त्यांच्या कवितेतील ‘आई’ प्रतिमेच्या अर्थनिर्णयाचा प्रयत्न करून पाहायचे आहे.
ग्रेस यांच्या कविता, ललितलेखन यांचे वाचन केल्यानंतर काही गोष्टी ध्यानी येतात. त्यांच्या कलासृष्टीत त्यांचे स्वत:चे खास असे अनुभवविश्व साकार होत गेलेले आहे. कलावंताचे व्यक्तिमत्त्व, त्याचा प्रतिभाधर्म आणि त्याची अनुभव घेण्याची पद्धती यानुसार त्याच्या कलासृष्टीतील अनुभवविश्वाचे स्वरूप, शैली, प्रकृती व रचना हळूहळू निश्चित होत असतात. ग्रेस यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी एकच विषय आहे, असे दिसते. त्यांची प्रतिभा एकाच आशयाभोवती रुंजी घालते आणि त्या दृष्टीने पाहता, ग्रेस यांच्या कलासृष्टीचे अनुभवविश्व एककेंद्री आहे. मानवी जीवनातील अगम्य, अटळ असे दु:ख हे त्यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि हेच दु:ख त्यांच्या साहित्यसृष्टीचे शक्तिकेंद्र आहे. या शक्तिकेंद्रातून असंख्य अनुभवतरंग कलारूपे घेऊन अवतरत राहतात. कवितेत सृजन आणि मरण या दोन टोकांमधले जीवन कवीच्या प्रकृतीनुसार अभिव्यक्त होते. ग्रेस यांच्या कवितेच्या दु:खकळेची सूक्ष्मासूक्ष्म जन्मकारणे त्यांच्या कवितेतून स्पंदत असतात. सृजनशक्तीचे आणि मृत्युशक्तीचे एक केंद्र ‘स्त्री’ आहे. निर्मितीच्या क्षणीच निर्मितीनाशाच्या भयाने कंपित होणारी ग्रेसची जाणीव स्त्रीच्या अनेक प्रतिमांतून सतेज होत जाते. बाला, कुमारी, माता (मातास्वरूप इतर स्त्रिया- त्यांच्या प्रतिमा), या स्त्रीरूपांतून ही जाणीव रूपे धारण करते. सौंदर्य, मार्दव, कामभावना, करुणा, मनस्वीपणा, देहस्वीपणा या गुणांनी त्यांची ‘स्त्री’ नटलेली आहे.
परंतु त्या सर्व रूपांतही ‘आई’ व तिची गुणस्वरूपे तिच्या रूपाने वाटय़ाला आलेले जीवनाचे दु:खमय, करुणामय भागधेय हे ग्रेसच्या या प्रतिमेचे वैशिष्टय़ आहे. या प्रतिमेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, ही ‘आई’ अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात. तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली. त्यात दु:खाचा, उदासीचा रंग अधिक ठळक आहे असे ते मानतात.
मातृवनात जगत असताना तिच्याही जगण्याच्या सावल्या आपल्या आयुष्यात सरमिसळ झाल्या आहेत, अशी भावना त्यांची कविता व्यक्त करते. आयुष्याच्या सांध्यपर्वात, शब्द हरवून गेल्यावर ती ‘सांजफुलांची वेळ’ होते, पाण्यावरच्या चंद्रखुणा (शृंगारसूचक)ची ती ‘निळीसावळी वेल’ होते, गात्रांचे शिल्प स्पर्शापासून सुटल्यावर ती ‘गतजन्मीची भूल’ होता होता अखेरीस पायात धुळीचे (पार्थिवतेचे) लोळ घेऊन ‘भातुकलीचा खेळ’च होऊन जाते.
‘आई’च्या या देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली, हे आपले प्रारब्ध मानून कवी तिला परोपरीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
‘गावातल्या आठवणी’ या कवितेतून आपल्या वृत्तीतल्या वैरागीपणाचे रहस्य जणू आईच्या वर्तनातून उमटत जाते असेही कवी सुचवितो. शिवाय, मी तुझ्यापोटी आलो म्हणून तू आई होऊ शकलीस. पण मुलगा म्हणून संशयधुक्याच्या वेदनेपेक्षा नि:संग विरक्तीच का दिली नाहीस असाही प्रश्न कवी विचारतो. या वृत्तीतूनच ग्रेसच्या कवितेतील प्रतिमा, आशय यांचे अपारंपरिक रूप दिसून येते.
‘आडवाच झोपलो असतो
मीही गर्भाशयात तर
येऊ दिले असते का
तुझ्या वाटय़ाला माऊलीचे भाग्यपण?’..
...
तेव्हाच शिवून दिली असतीस
भगव्या क्षितिजाची झोळी
तर काय झाले असते?
आईचे चोरून देवळात जाणे- तिथे कुणा संन्याशाचे असणे, याचा एक दीर्घकालीन परिणाम ‘चंद्राच्या राखे’च्या प्रतिमेतून सुचविला जातो. कवीच्या कवितेतून सतत ही संन्यस्त, बैरागी वृत्ती वावरत राहते.
‘आई’च्या देहस्विनी असण्याला कवी याच संन्यस्त वृत्तीने, आयुष्य खूप कळून आल्यानंतरच्या शहाणपणाने स्वीकारतो. आणि या ‘स्त्री’ केंद्रातूनच कवीच्या अनुभवाची कलारूपे साकारतात. ‘माझी आई : सुमित्रा’ या कवितेत कवी लिहितो,
‘परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून
ती केव्हाच निघाली बेभान :
प्रियकरांचे, यारांचे निर्घृण वध, तर डोळी त्यांचेच
धगधगते बेमुर्वत इमान!
संध्या मलुल, पांगळी, अस्तसूर्याच्या भाराने वाकलेली :
तुटलेली कर्णव्याकूळ करंगुळी..
देवासारखे हसता येईल मला : मला संतासारखे रडता
येईल? तिच्या कपाळी, चंद्रमौळी..’
‘आई’ हे ग्रेसच्या कवितेचे एक प्रबळ शक्तिकेंद्र आहे. कवी तिच्याकडे तिच्यातील ‘मादी’पणाकडे पाहतो. तिचे प्रमत्तपणच आपल्याला भुलवते, जगवते, प्रेरणा देते. कवी म्हणतो,
‘माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल..
माझी आई भिरभिर संध्या
घेई सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा..
आईमुळेच निर्मितीशीलतेचा अर्थ कळतो. आईमुळेच ‘शिंदळ वारा’सुद्धा शालीन होतो. अशा आईच्या जाण्यानंतर कवी ‘घनव्याकूळ’ रडतो. तिच्या जाण्याबरोबर आपले बालपणही संपले. जीवनगीताच्या ओळी तुटक, अधुऱ्याच राहिल्या ही जाणीव ठसठसत राहते.
‘‘आता लिहिताना काही
जरा वेगळे वाटते
माझ्या लेखणीची ओळ
तिळातिळाने तुटते
शब्द अनाथ दिसती
रेष हळूच ओढावी-
टिंब ठेवूनही अंती
गीत अपुरे वाटते..’’
ग्रेसच्या या ‘आई’ प्रतिमांचा अर्थनिर्णय करताना प्रश्न पडतो की कवितेत कवी आपल्या अनुभूतींचा मागोवा कसा घेत असतो? प्रथम प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेऊन नंतर त्या स्थूल अनुभवाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभूती कवितेत व्यक्त करतो का? कविता म्हणजे कवीने/ माणसाने भूतकाळात घेतलेल्या अनुभवाची प्रतिकृती किंवा स्मृतिकोषात तरळणारी प्रतिमा नसते. Poetic image is not an echo of the past! कवीची कल्पनाशक्तीच आपल्या प्रतिमा व्यापाराला वास्तव व भूत यापासून अलग राखत असते.
ग्रेसच्या कवितेतील ‘कवी/मी’ त्याच्या खास अनुभवमुशीतून ‘आई’च्या स्त्री-मादी-देहस्विनीरूपाची अनुभूती घेतो. ही अनुभूती तो स्वत:च्या शब्दतंद्रेतून, कल्पकतेने घेतो. म्हणून त्या अनुभूतीला नवेच कल्पकतापूर्ण अर्थरूप मिळू लागते. तेथे वास्तव ‘आई’ उरत नाही. तिच्या स्वभाव, वृत्ती, देहाचे हुबेहूब शब्दचित्र रेखाटणे यात काव्यात्मता नसते. कवीची भाषा वास्तवाला नवे अनुभूतीस्वरूप, आशयरूप देत असते. यालाच ग्रेस रूपकांची पांघरणी आणि पाझरणी म्हणतात. ग्रेसच्या कवितेत आणि एकूणच त्यांच्या भावविश्वात ‘आई’ किंवा ‘मातृवत’ हा अनुभवविषय असून अनुभव घेणारी कवीची संवेदनशीलता तिचा सर्जनशील कल्पकतेने अनुभव घेते.
‘आई’च्या देहस्विनी स्वरूपातील ‘मादी’ मागे एक कोसळणारे घर सावरणारी, मुलांना जोजवणारी, पाजणारी, पोसणारी ‘आई’सुद्धा आहे. ‘आई’च्या या थकल्या-भागल्या जीवाबद्दलची करुणा ग्रेसच्या कवितेत पुन्हा पुन्हा येत राहते.
‘घर थकलेले संन्यासी
हळुहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमध्ये
नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या-मधुरा,
रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी
आभाळ घसरले होते.
पक्ष्यांची घरटी होती
ते झाड तोडले कोणी?
एकेक ओंजळीमागे
असतेच झऱ्याचे पाणी.
या सुप्रसिद्ध कवितेत थकलेले घर सावरणारी, घसरणारे आभाळ तोलणारी, पक्ष्यांच्या वस्तीचे झाडच तोडून टाकल्यावर झऱ्याचे ओंजळभर पाणी होणारी आईच आहे. म्हणून तर तिच्या मृत्यूनंतर कवी ‘घनव्याकूळ रडतो’, आपल्या गीताची ओळ आता अपुरीच राहिली म्हणून खंतावतो, तर तिच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून तिचीच विनवणी करतो. आणि पिंड शिवणाऱ्या, पर्यायाने आईला मुक्ती देणाऱ्या कावळ्याला ‘सांध्यपर्वातील 

वैष्णवी’ अर्पण करून टाकतो.
‘आई’च्या जीवनशैलीतील विसंगती, विरोध, अगतिकता यांचे 
भान कवीला एक मुलगा, एक जाणता पुरुष, एक नैतिक-
अनैतिकाच्या पल्याड गेलेला संन्यस्त, संवेदनशील कवी या अनेक नात्यांनी येत जाते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते येते. 
‘अंधार येतो तिच्या भोवताली
तिला वाटते चंद्र ती मोजते
निनादातला मृत्यू यावा गळ्याशी
उभ्याने तशी अस्त ती झेलते.’
आयुष्यात उभ्या उभ्या स्वत:चे असे अनंत अस्त झेलणारी आई-
‘गर्भात हात हलतो भरली दुपार पोटी
आई उभ्या उभ्याने रचते अभंग कोटी’
जीवनाचे हे करुणरम्य कोटी कोटी अभंग रचताना, तिच्या आयुष्याचे चंद्रगंध विटून गेले, तरी ‘पाठीत वाकताना आई गळ्यात हसली.’ मुलांना उन्हाळेसुद्धा समना वाटून देणारी आई, तिला जगण्याच्या आरशातून (मृत्युरूप) घारी बोलावतात त्यांना आपला देहही वाटून देते. अशी ही ग्रेसच्या कवितेतली ‘आई’. ती बाई, ती पोर, ती वृद्धा, तीच सीता, ऊर्मिला, द्रौपदी. तीच मिसेस नॅली डीन, तीच मेरलीन मन्रो, तीच नटाली, तीच राधा पार्थसारथी, तीच हॉस्पिटलमधली केरळी नर्स, तीच चंद्रमाधवी, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांध्यभयाची सजणी! सर्व काही तीच. आदिम स्त्रीत्वरूप अशारीर स्त्री, हाडामांसाची शारीर स्त्री!
आई प्रतिमेचा अशा प्रकारे अनुभव घेणारी ग्रेसची संवेदनशीलता कधी रामायण-महाभारतातील सीता-मिथिला, (लक्ष्मण)- शूर्पणखा यांच्यासारख्या मिथकांतून दु:ख, वेदना, वंचना यांचे रूपही अनुभवते-
‘कधी हिडिंबा पारोशी
शूर्पणखाही उदास;
देहभावाला झोंबते
देहभावाची किळस!
कधी राधा कधी कुब्जा
देहाखालून चालते;
शूर्पणखेच्याही पोटी
नवे लक्ष्मणाचे नाते.
किंवा कृष्णाने भामा, द्रौपदी, राधा यांना दिलेल्या वेदनांचेही रूप कवी मातृप्रतिमेच्या पडछायेप्रमाणे अनुभवतो. मातृरूपातून घेतलेला हा स्त्रीत्वाचा शोध ग्रेसच्या कवितेतील धमनी आहे. अनुभवविश्वातील शक्तिकेंद्राचे स्थान गवसले आणि त्यांच्या संवेदनशीलतेचा धर्म उलगडला की, ग्रेसच्या ‘आई’ कविता दुबरेध राहत नाहीत. तसेच त्यांचा इतर प्रतिमांच्या संघाताशी अनुबंध जोडता येतो आणि ‘मातृरूप’ ‘स्त्री’ प्रतिमेतून प्राक्तन म्हणून मिळालेल्या निर्मितीशक्तीचा, निर्मितीऱ्हासाच्या भयाचा वेदनेचा उदास रंग समजू लागतो आणि कवी
‘ही माझी प्रीत निराळी
संध्येचे श्यामल पाणी,
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी.’
असे का म्हणतो, यातला ‘डोह’ कोणता हे सहज उमगू लागते. कवितावाचनाच्या रूढ वाटा सोडल्यानंतरच ग्रेसच्या प्रतिमा समजल्यासारख्या वाटतात. एका कवितेतून एक सलग उलगडत जाणारे आशयसूत्र सापडले की कविता ‘समजली’ असे मानणारी वाट सोडली तरच ग्रेसच्या कवितेतील भाववृत्तींचे संरचित दिसू लागते.
कविता हा जर कवीची शब्दतंद्रा आणि रसिकाची शब्दतंद्रा यातील ‘भावविण्याचा करार’ असेल, तर ग्रेसची कविता हा करार पाळते असे म्हणता येईल. आणि मग कवीच्या अनुभवविश्वातील देहरूप, वासनारूप ‘मातृकेंद्र’ कवितेतून ‘शोकमग्न गीतांच्या ओळी’ लिहायला कसे उद्युक्त करते त्याचा थोडा थोडा तळ न्याहाळता येतो. म्हणूनच हे अर्थनिर्णयनाच्या तीरावरून दिसलेले ‘आई’चे रूप!
‘आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरज वेळी वाटत फिरतो
जोगी कुठले वेध?..
..त्याही नंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर..’ 
दिसले, समजले असे वाटावे आणि पुढच्याच प्रतिमेने आणखी तरंग उठवावेत आणि तरीही उत्कट, उदासीच्या लयीने ‘आई’ आपल्या मनाच्या नदीमध्ये नाद उमटवत निघून जावी, म्हणून हा अर्थनिर्णयनाचा तीर!

Friday, November 4, 2011

कोनाडे

माझ्या माहेराच्या घरात नाना प्रकारचे कोनाडे मी पाहिलेले आठवताहेत. ओटीवरचे सर्व कोनाडे अत्यंत आकर्षक महिरपी असलेले. एकमेकासमोर. सारख्या अंतराने असे हे कोनाडे ओटीची शोभा वाढवायचे. एका कोनाडय़ात लाल रुमालात दासबोधाची एक पोथी बांधलेली मला अजून आठवते. एका कोनाडय़ात कायम एक लख्ख घासलेली समई असायची. विजेचे दिवे नव्हते. रात्री ती उजळायची. तिच्या हलत्या वाती भिंतीवर उमटायच्या. त्या पाहताना मनात कधी भीती उमटायची. पण आजोबा जागीच खाकरले की भीती पळायची. पुढच्या पडवीत एक मोठा लोटा पुरून एक कोनाडा केलेला होता. त्यामध्ये कायम तांदूळ भरलेले असायचे. कुणी झोळी घेऊन दाराशी थांबले की आमच्या बाळमुठी त्यामधून भरून त्या झोळीत रित्या व्हायच्या. आणखी एक गम्मतशीर कोनाडा आठवतो. तो साखरी आगरचा- माझ्या आजोळचा. तिथे खूप मोठे अंगण होते ते वरच्या घरी. ‘वरचे घर’ म्हणजे मूळ आजोळचे घर. त्या अंगणाला चिरेबंदी अशा बाजू भिंती होत्या. अंगणात खाली उतरत यायचे. या जांभ्या दगडाच्या भिंतीत एक करवंटीचा कोनाडा होता (म्हणजे नारळाची करवंटी पुरून केलेला) तो सदैव भाताचे तूस जाळून तयार केलेल्या रांगोळीने भरलेला असायचा. अंगणी सारवली की लगेच रांगोळी घालता यावी म्हणून. बाईला जसे कुंकू तशी सारवल्या अंगणात रांगोळी. रांगोळी नसेल तर, अंगण बोडके का? म्हणून आजोबांचा स्वर चढायचा.
एप्रिलला नातवंडांच्या परीक्षा संपल्या, की सर्व नातवंडांना घेऊन कोकणात अवतरते. मोठे घर. घरामागे माडांची गर्द राई. त्यामागे स्वच्छ, सुंदर, उसळणारा समुद्र, मला सारखा खुणावत असतो. घरापुढे-मागे सारवलेली स्वच्छ अंगणे. मुलांना शहरात ब्लॉक नामक खुराडय़ात असे मोकळं ढाकळं हुंदडायला मुळात मिळत नाही. लहान मुलांनी वारा प्यायलेल्या वासरासारखं हुंदडावं बालपणी. म्हणजे मुले छान वाढतात. मनानेही मुक्त मोकळी राहतात. चैत्र-वैशाखाचे दिवस म्हणजे कोकणचा मेवा लुटण्याचे दिवस. काजू, करवंदे, आंबे, फणस, रातांबे, तोरणे असा भरपूर मेवा मुक्तपणाने मुले खाऊ शकतात. फणसबाळे सांभाळीत दारात फणस सेवेला उभे. मुलांना कोकणात यायला नाही आवडले, तरी नातवंडांना आवडते, नातवंडांना जे आवडते ते मुलांची विशेष पर्वा न करता करणे हा आजीचा धर्म मी पुरेपूर सांभाळते. हे एवढं रामायण सांगायचे कारण म्हणजे आता शहरात न भेटणारी पण अजून या मातीत (भिंतीत म्हणा ना!) असणारी एक गम्मतशीर गोष्ट किंवा रचना तुम्हाला भेटवायची आहे! त्याचे असे झाले.
सायंकाळी अंगणाच्या पाठवणीवर (पायरीवर) मी बसले होते. इतक्यात पेपर आला. येथे तो सायंकाळी येतो. (क्वचित दुपारी) माझ्या नातीला मृदुलाला सांगितले- ‘मुदूऽ, माझा चष्मा आण. त्या ओटीवरच्या कोनाडय़ात ठेवलाय.’
‘कोनाडा म्हणजे?’ तिने विचारले.
मी हात कोनाडय़ाच्या दिशेने केला.
मी मागे हात करीत म्हटले, ‘अगं, तो काय समोर-’
‘हो! ते ‘आपोआप कपाट’ होय?’
‘आपोआप कपाट’ हा पाच वर्षांच्या नातीचा नवीन शब्द मला आवडला. घरं बांधताना भिंतीतच तयार झालेला तो कोनाडा म्हणून ‘आपोआप कपाट’. तिला कपाट वाटले कारण कोनाडय़ामध्ये एक फळी टाकलेली होती. त्यामुळे तिच्या दृष्टीने ते कपाट.
मृदुलाच्या त्या बोलण्यातून मला पाहिलेले अनेक प्रकारचे कोनाडे आठवू लागले. माझ्या माहेराच्या घरात नाना प्रकारचे कोनाडे मी पाहिलेले आठवताहेत. ओटीवरचे सर्व कोनाडे अत्यंत आकर्षक महिरपी असलेले. एकमेकासमोर. सारख्या अंतराने असे हे कोनाडे ओटीची शोभा वाढवायचे. एका कोनाडय़ात लाल रुमालात दासबोधाची एक पोथी बांधलेली मला अजून आठवते. एका कोनाडय़ात कायम एक लख्ख घासलेली समई असायची. विजेचे दिवे नव्हते. रात्री ती उजळायची. तिच्या हलत्या वाती भिंतीवर उमटायच्या. त्या पाहताना मनात कधी भीती उमटायची. पण आजोबा जागीच खाकरले की भीती पळायची. पुढच्या पडवीत एक मोठा लोटा पुरून एक कोनाडा केलेला होता. त्यामध्ये कायम तांदूळ भरलेले असायचे. कुणी झोळी घेऊन दाराशी थांबले की आमच्या बाळमुठी त्यामधून भरून त्या झोळीत रित्या व्हायच्या. आणखी एक गम्मतशीर कोनाडा आठवतो. तो साखरी आगरचा- माझ्या आजोळचा. तिथे खूप मोठे अंगण होते ते वरच्या घरी. ‘वरचे घर’ म्हणजे मूळ आजोळचे घर. त्या अंगणाला चिरेबंदी अशा बाजू भिंती होत्या. अंगणात खाली उतरत यायचे. या जांभ्या दगडाच्या भिंतीत एक करवंटीचा कोनाडा होता (म्हणजे नारळाची करवंटी पुरून केलेला) तो सदैव भाताचे तूस जाळून तयार केलेल्या रांगोळीने भरलेला असायचा. अंगणी सारवली की लगेच रांगोळी घालता यावी म्हणून. बाईला जसे कुंकू तशी सारवल्या अंगणात रांगोळी. रांगोळी नसेल तर, अंगण बोडके का? म्हणून आजोबांचा स्वर चढायचा.
१९४४ साली गुहागरला प्लेग झाला. तेव्हा सारी मंडळी घरे सोडून समुद्रालगत ‘कावण’ काढून राहायला गेली. ‘कावण’ म्हणजे ऐसपैस झोपडी. दोन-चार खोल्या असलेली. तेव्हा म्हणे खूप माणसांनी घराच्या कोनाडय़ात दागिन्याचे डबे ठेवून कोनाडे चक्क लिंपून टाकले. वरून भिंती आल्यावर कळणार तरी कसे? पण या कोनाडे लिंपण्यावरून एक कथा नेहमी आजी सांगायची. आजी आमची महा गोष्टीवेल्हाळ!
एकदा असेच घर सोडून जाताना एका माणसाने दागिन्यांचा डबा कोनाडय़ात पुरून भिंत लिंपली. तर खूण म्हणून एक खुंटी लावली. त्याच्या वर पूजेचा मुकटा ठेवला. घरात कुण्णा कुण्णाला सांगितले नाही. गावी सारी माणसे गेली. तिथेच त्याला ‘लकवा आला.’ वाणी गेली. हातपाय लोळागोळा. त्याला घरी आणले. ओटीवर बाजेवर हा माणूस. सारखे हात माजघरात altआणि डोळे  माजघरात. पण कुणाला त्याची नेत्रपल्लवी आणि हस्तपल्लवी कळली नाही. दागिने कोनाडय़ाने गडप केले. गुप्त धन असेच सापडत असावे. अशी ही गम्मत!
आमच्या गुहागरच्या या घरात एक सुंदर कोनाडा आहे. तो येऊनच पाहायला हवा असा देखणा. त्याचे नाव ‘देवाचा कोनाडा’. पश्चिमाभिमुख अशा या कोनाडय़ात देव विराजमान आहेत. आजही! खाली बसून पूजा करता येईल इतक्या उंचीवर म्हणजे जमिनीपासून फूट सव्वाफूट उंचीवर हा कोनाडा आहे. पुढच्या वरील भागात सागवानी लाकडाची सुंदर महिरप आणि महिरपीला खालच्या दोन बाजूला ऐटबाज पोपट, शंभर वर्षे होऊन गेली, तरी या कोरीवकामाला ढक नाही इतका हा कोनाडा सुंदर आहे.
या निमित्ताने आणखी एक कोनाडा आठवला. हा कोनाडा माझ्या काकांच्या घरी माडीवरच्या जिन्याकडे जाताना वरच्या भिंतीत आहे. चांगला ऐसपैस कमानी कोनाडा. माझी चुलत बहीण रुसली की ती या कोनाडय़ात जाऊन बसायची. ती कोनाडय़ात बसली की आजी म्हणायची, ‘अगो ऽ बाई, मंथरा अवतरली कोनाडय़ात. आता काय रामाचे सिंहासन मागेल. ते द्यायला हवे!’
तिची बाबापुता चालायची. तिथे सहज हात कुणाचाच पुरायचा नाही. पठ्ठी अशी बहाद्दर. तिला जे हवे ते मिळाल्यावाचून कोनाडा सोडायची नाही. तिचे लग्न गुहागरला झाले. मधेच ती दिसेना. आजी म्हणाली,
‘अगो ऽ गौरीहार घेऊन कोनाडय़ात नाही ना बसली ही?’ माजघरभर हशा उसळला. पण सासरच्या एकाही माणसाला त्याचा अर्थ उमजला नाही.
पुण्याला लग्न होऊन आल्यावर मी एका वाडय़ात गेले. या वाडय़ाच्या दिंडीदरवाजाच्या आतल्या बाजूला असाच प्रचंड कमानी कोनाडा. पहारेकरी चक्क रात्री तिथे झोपायचा. मी प्रवास खूप केला. देवालयामध्ये मी खूप सुंदर सुंदर कोनाडे पाहिले. एका शंकराचे देवळातले कोनाडे मला अजूनही विसरता येत नाहीत. प्रवासात त्रिपुरी पौर्णिमा आली. त्या शिवालयाच्या आवारभिंतीला असेच हजारो छोटे छोटे कोनाडे. पणती बसेल एवढे. त्या प्रत्येक कोनाडय़ात दिवे लावलेले आणि समोर त्रिपुर उजळलेले ते प्रकाशरूप, आजही माझ्या डोळ्यात आहे. गुहागरला आमच्या व्याडेश्वराचे मंदिर अष्टकोनी आहे. या दगडी भिंतीमध्ये प्रत्येक भिंतीत असेच अजस्त्र कोनाडे आहे. पैलू पाडावे असे ते कोनाडे अत्यंत देखणे आहेत.
आमच्या घरी लहानपणी प्रत्येक भावंडांना एकेक स्वतंत्र कोनाडा होता. भिंत सारवली की चुन्याचे वर लिहिलेले. ‘सदाशिवचा कोनाडा’ ‘कमलचा कोनाडा’ माझे माहेरचे नाव कमल. बालपणीची एक गम्मत आठवली. कमरेच्या वर असलेल्या जागी भिंतीत एक कोनाडा होता. त्यामध्ये फणीकरंडय़ाची पेटी असायची. या पेटीत दोन-तीन फण्या (तेव्हा कंगवा नव्हता.) कुंकवाचा चांदीचा करंडा आणि काजळाची चांदीची डबी असायची. पेटी उचलून चटईवर बसून वेणीफणी, कुंकू वगैरे शृंगार करायचा. (शृंगार एवढाच होता) एकदा ती पेटी माझ्या हातून पडली. आरसा फुटला. वडलांनी एक नवीन आरसा आणला आणि तो कोनाडय़ातच कायमचा बसवला. फणी करंडय़ाची पेटी कायमची माळ्यावर गेली. आता जाता-येता कोनाडय़ातल्या आरशात डोकवायची सोय झाली. मी सारखी पाहायची. माझी आजी भारी हुशार आणिaltमिस्किल. म्हणाली-
‘सारखं काय पाहातेस? पाहून काय कळतंय का? काही सुचतंय का?’
‘आता आरशात पाहून काय डोंबल सुचणार?’ मी म्हटले.
तशी माझ्या डोक्यावर टप्पू मारून म्हणाली, ‘ये इकडे’.
आम्ही दोघी आरशापुढे उभ्या. ती बाजूला गेली.
‘आता काय झालं?’
‘काय म्हणजे? आरसा स्वच्छ झाला.’ मी म्हटले.
तशी म्हणाली, ‘तेच सांगत्येय तुला. मन आरशासारखं हवे. कुणी पुढं उभं राहिलं की उमटायला हवे. घटना संपली की स्वच्छ! परत नवीन प्रतिबिंब-अनुभव घ्यायला मन स्वच्छ!’ तेव्हा अर्थ कळला नव्हता. आज वाटते आजी किती महान होती! आणि ते कोनाडेही! स्वच्छ! सताड! सदैव उघडे!
(डॉ. लीला दीक्षित लिखित आणि दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘मोकळं आभाळ’ या पुस्तकातून साभार)

    Friday, September 16, 2011

    घर कौलारू : चूलबाई

    घरोघरी मातीच्या चुली’ या वास्तवावर आता बहुतांश दृष्टीने फुली मारावी लागेल. छोटय़ा गावात, शेतवस्तीवर चुलीचे अस्तित्व अजून टिकून आहे. पण एक काळ असा होता, की ही चूलबाई प्रत्येक घरात विविध रूपांनी आणि आकारांनी विराजमान असे. त्याची जुन्या काळातील तीन रूपे सर्वानाच माहीत असतात. स्वयंपाकघरात विराजमान असते ती चूल. तिची जोडी जमते ‘वईल’ या पुरुषाबरोबर. ती चूल तो वईल. चूलबाई स्त्रीलिंगी असून स्वयंपाकघरात प्रथम मानाची. सप्तपदीत स्त्री पुढे पुरुष मागे. पण हा पुरुष मनातल्या मनात वेगळीच शपथ घेत असतो. ‘बाईऽग, आज चाल तू पुढे. पण उभं आयुष्य माझ्या मागं मागं यायचंय’ आता दिवस बदलतोय! पण पूर्ण बदलेल का? त्यामुळे जडसृष्टीत तरी चूलबाईचा हा मान मला कायमच सुखावतो. स्वयंपाकघरात ‘चूल आणि वईल’ असा दोन जोडय़ा असत. त्यातील एक चूलबाई आणि वईल वापरला जाई. आदल्या दिवशी पेटवलेली चूल दुसऱ्या दिवशी लाल मातीने सारवली जाई आणि लख्ख सारवलेली चूलबाई स्वयंपाक रांधायला सिद्ध होई. चूल आणि वईल मध्ये पोकळ जागेने जोडलेले असे. चूलबाई पेटली की वईलही जरा मंद लाल निळसर ज्वाळांनी धगधगून उठे. या चुलीवर सतत एक तांब्याचे तपेले असे. ते पाण्याने भरलेले असे. रात्री १२ लाही गरम पाणी तयार. हे तांब्याचे तपेले सतत चुलीवर असे. स्वयंपाक झाला, की झाले हे स्थानापन्न. चूलबाई कामात असे तेव्हा हे ‘वईल’वर विसावे. सततच्या काजळीनं हे काळंकुट्ट झालेलं. त्याला नावच होतं. ‘मशेरकं’.
    या चुलीच्या पण परी असत. चूलवईल स्वयंपाकघरात मानाची. चुलीपेक्षा मोठा चुला. तो पडवीत बसे. पोहे भाजायला, भाजणी करायला, लाडवाचे भाजायला, जिलेबी काढण्यासाठी उपयोगी पडे. जिलेबी काढायची म्हटली तर याच चुल्यावर मोठ्ठी पिवळी परात विराजमान व्हायची आणि आमच्या चंपूताई जोशी त्याच्यावर तुपात भराभर जिलब्या टाकीत. साजूक तुपात पोहणाऱ्या त्या जिलेब्या आम्ही पडवीतल्या पायठणीवर बसून न्याहाळत राहायचो. त्यामुळे हा पडवीतला चुला पेटला की आम्ही भावंडे खूश व्हायचो. या चुल्याचे वडील म्हणजे चुलाण. हे चांगले भक्कम असे. जांभ्या दगडाचे तीन दगड ठेवून हे चुलाण तयार होई. हे चुलाण म्हणजे अंघोळीचे पाणी तापवण्यात तरबेज. या चुलाणात वाडीतले माडाचे थरपे, लाकडाच्या मोठय़ा गाठी आणि ओंडके, वाडीतल्या झावळय़ा काहीही जळण म्हणून चाले. पडवीलगत अंगणात एका बाजूला हे चुलाण असे. वर पत्र्याचे छप्पर. बाकी चारी दिशा मोकळय़ा. या जागेला एक खास नाव असे ‘थाळ’. आजी म्हणे, ‘जा, थाळीवरचे गरम पाणी आण, लोण्याची रवी धुवायला.’
    आता या चूल कुटुंबाला खायला लागणारे अन्न म्हणजे सरपण. घरातील चूल प्रथम पेटवायची ती गोवरीने किंवा शेणीने. घरात गाईगुरे भरपूर असत. त्यामुळे वाडीत गोवऱ्या थापण्याचा उद्योग सतत असे. आई किंवा आजी रात्री गोवऱ्यांनी शेगडी भरीत. ती खापराची असे. तिच्या बुडाशी पाच-सात गोवऱ्या. वर साळीची फोलपटे भरली जायची. रात्री झोपताना चुलीतला छोटा निखारा त्या साळीच्या तुसावर ठेवला की झाले! सकाळी जिवंत अग्नी लगेच मिळे. ‘जिवंत’ हा कोकणचाच शब्द. ही शेगडी घरातला अग्नी सतत सांभाळी. एवढंच तिचं काम. रांधायला तिचा कधीच उपयोग नसे. सकाळी चूल या शेगडीनेच पेटे. स्वयंपाकघरातील चूलबाईला जडजड लाकडे झेपायची नाहीत. तिच्यासाठी छोटी लाकडे असायची. शहरात त्याला ‘बंबफोड’ म्हणत. आमचा शब्द ‘मोठी सळपे’. लहान सळपे म्हणजे अत्यंत पातळ बोटाएवढय़ा ढलप्या. प्रथम चूल पेटताना त्याचा उपयोग होई. पडवीतला चुला, जरा जादा भक्षक. तो माडाच्या झावळय़ांचे काखे, पोया पिचुंदप्या, जरा लांब लाकडे खाई. स्वयंपाकघरातील ‘चूल’ सतत ‘वईल’बरोबर असे. तोही तिला मदत करी. चूलबाईवर भाताला कढ आला, की तो ‘वईल’कडे सरके. भाताचे तपेले वईलावर विसावले की मंद जाळाने भात मऊसूद, मोकळा छान होई.
    ‘चूल’, ‘चुला’ आणि ‘चुलाण’ यांना घरात नारायणाचे रूप होते. अग्निनारायण! दिवाळी झाली की आजी घरातील हरचंदला सांगायची, ‘जा बाबा, उद्या नामा कुंभार येणारेय चुली थापायला. डोंगरातून दोन टोपल्या लाल चिकण माती आण’. ही माती जरा चिकट असे. लालभडक असे. दुसऱ्या दिवशी सकाळी नामा येई. मागच्या अंगणात चुली घाली. चूलवईलांच्या दोन जोडय़ा, एक मोठा चुला. एखादी शेजारची आजी येऊन आजीला सांगे. ‘गोऽ सीता, मला पण एक चुला दे बाई. तो नाम्या एका चुल्यासाठी कुठला येतोय?’
    नामाच्या मागे माझी आणि बहिणीची भुणभुण होई. ‘आम्हाला भातुकलीची चूल घालून दे.’ तो आनंदाने सार करी. सुटीत भातुकलीच्या या चुलीत नैवद्याच्या वाटीचा भात आम्ही शिजवीत असू. त्यासाठी एक छोटं आजोबांच्या मुठीएवढं तांब्याचं तपेलं आजीने गोपा तांबटाकडून करून घेतलं होतं. या चुली वाळायला चार महिने जात. पावसाच्या आधी स्वयंपाकघरातल्या जुन्या चुली काढल्या जात आणि चूलवईलाच्या दोन जोडय़ा तिथे स्थानापन्न होत. नवी चूल प्रथम पेटवताना आई तिच्यावर हळदीकुंकू वाहात असे. फुले घालून साखरेचा नैवेद्य झाला की मगच चूलबाई स्वयंपाकाला सिद्ध होई. ‘घरात चूल पेटलीच पाहिजे’ याचा अर्थ बाळपणी कळत नसे. वाडीवरची रखमा कधीतरी थरथरत्या पायांनी आजीपुढे फाटका पदर पसरी. ‘सीतामाय, दोन दिस जाले. चूल नाय पेटली.’
    आजी घरात जाई. शेरभर तांदूळ आणि भांडंभर डाळ तिला देई. आज या आठवणी झाल्या, की मनात व्याकुळता दाटते. कोकणचे दारिद्रय़ आजही थोडंबहुत तसंच आहे. हे केव्हा सुधारणार?
    आम्हा भावंडांसाठी चूल गमतीचा भाग होता. दुपारी चूल विझली, की आम्ही फणसाच्या आठळय़ा, पावटय़ाच्या शेंगा, बाळवांगी, छोटे बटाटे त्यात सारून ठेवायचो. मंद मेमुरात (धगधगती राख) हे सारं खरपूस भाजून निघे. मंद निखारे असतच थोडे.
    चूल, चुला आणि चुलाण यांच्यावरची एक गंमत सांगायला हवी. तिला ‘मी नाव दिलंय ‘खाचणचूल’. कोकणात पूर्वी कार्यालये नव्हती. आजही नाहीत. लग्न घरी होत. मोठं गोत जमे. अशा वेळी मागच्या अंगणात एक फूट रुंद आणि पाच-सहा फूट रुंद असा जमिनीत चर खणला जाई. या चरावर मोठी, सतेली, पातेली राहतील अशा पद्धतीने जांभे दगड मांडीत. अशा एका जमिनीतील चरावर तीन मोठय़ा चुली तयार होत. परत या खाचणचुलीला लाकडे समोरून घालावी लागत नाहीत. दोन्ही बाजूंनी चर मोकळा असतो. त्यात मोठमोठे लाकडाचे ओंडके छान जळत. वर फक्त पत्र्याचे छप्पर असे. अंगणाच्या चारी बाजू मोकळय़ा. मोकळय़ा वाऱ्याने अग्नी रसरसून छान पेटे. तीनचारशे माणसांचा स्वयंपाक स्त्रिया चार-पाच तासांत सहज करीत. मोठी सतेली, पातेली चुलीवर उतरायला पुरुषमंडळी मदत करत. भल्यामोठय़ा कढईच्या कानामध्ये आडवा बांबू घालून कढईबाई खाली उतरे.
    अंगणात पंक्ती बसत. शेजारचे घर सलगीचे असे. मधला गडगा काढून दोन अंगणे एकत्र होऊन मोठा हॉलच तयार होई. माडाच्या झावळय़ांनी शाकारलेले आणि शेणाने मऊसूद सारवलेले हे अंगण छान दिसे. मांडवाला पताका, आंब्याचे डहाळे. केळीचे लोंगर, आंब्याचे शेंदरी घड, तांबूस रामफळे, शहाळी असे नैसर्गिक सुशोभन असे. तयार झालेले अन्न पुरुष ओटीवर आणून ठेवीत. केळीची पाने आणि हिरवेगार केळीचेच द्रोण.
     पानांभोवती गुलाल, रांगोळी, उदबत्त्यांचा वास घमघमे आणि ही पंजी असलेली खाचणचूल सर्वाचे पोट तृप्त करी. आता घरी कोकणात चूल नाही. तरीही एक चूल मनात जागी आहे. आई किंवा आजी पुढे बसलेली. भराभर भाकरी करणारी. भाकऱ्यांची चळत चुलीला टेकून उभी आणि झणझणीत पिठलं आणि कांदा-वांग्याच्या भरिताची घमघम. हे चित्र माझ्या मनात कायमच जागे आहे.