Saturday, August 23, 2014

मनाचं व्यवस्थापन

आपण सगळेचजण आज एका गतिमान युगाला सामोरे जात आहोत. त्यामुळे सर्वांच्याच मनावर कायम कसलं ना कसलं टेन्शन असतं. आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न कुणीही पहावं, पण ते पाहत असताना स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवली पाहिजे. त्यानुसारच तुम्ही पावलं उचलायला हवीत.

मानवी मन हा अगदी प्राचीन काळापासून सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. डोळ्याला न दिसणारे, तरीही माणसांचे भावविश्व ढवळून काढणारे मन आजही संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या चिंतनाचा विषय बनून राहिले आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने या मनाची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्यवस्थापन हा शब्द परवलीचा झाला आहे. कौटुंबिक व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापन, भावनिक व्यवस्थापन या गोष्टी मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. माणसाचे जीवन सुखी, समृद्धी, आनंदी, प्रकाशमय, चिंतारहित आणि उत्साही राहायचे असेल, तर मनाच्या व्यवस्थापनकडेही गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

आपण सारेच आज एका गतिमान युगाला सामोरे जात आहोत. अस्तित्वासाठीचा संघर्ष तीव्र झालेला आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनावर ताण आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांचीही या ताणातून सुटका झालेली नाही. माणसांनी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न जरूर पाहायला हवे; पण ते पाहत असताना स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवून पावले उचलायला हवीत. कशासाठी धावायचे, किती धावायचे या गोष्टी स्वतःला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. ऐश्वर्यसंपन्न आणि सुखी, समृद्ध जीवनासाठी करावी लागणारी यातायात तितकीच महत्त्वाची आहे; पण त्या पलिकडे जाऊन जगणे नावाची जी गोष्ट आहे, तिचाही अर्थ उमगला पाहिजे. वस्तूंमध्ये सुख शोधता आले असते, तर या जगात कोणीच दुःखी राहिले नसते.

आपल्या जगण्याची व्याख्या प्रत्येकाला स्पष्ट करता आली, तर मनाच्या योग्य व्यवस्थापनाच्या दिशेने उचललेले ते पहिले महत्त्वाचे पाऊल असेल. दुसऱ्याशी तुलना न करता मी जगणार, ते या पद्धतीने, ही गोष्ट एकदा स्पष्ट झाली, की माणसाच्या मनावरचे खूप ताण कमी होतात. तो अधिक मोकळा होतो. त्यामुळे अशी माणसे आवडीची कामे खूप उत्साहाने करतात. आयुष्याचा प्याला भरलेला आहे, की रिकामा आहे, याचा विचार करण्यापेक्षा जीवन प्याल्यात असणारा प्रत्येक थेंब शोषून घेण्याची उत्कंठा असणारे निरोगी मन आपण तयार करायला हवे.

मनाच्या व्यवस्थापनातील दुसरी पायरी म्हणजे आपले प्राधान्यक्रम ठरवणे. हे अत्यंत तातडीचे, हे नंतर करता येण्यासारखे, हे काही कालावधीनंतर केले, तरी चालण्यासारखे, हे करण्याची आवश्यकताच नाही, अशा चार प्रकारांत महत्त्वपूर्ण कामांची विभागणी केली, की कामाची दिशा स्पष्ट होते. कोणत्या गोष्टी अगोदर करायच्या, कोणत्या नंतर, याचे ठोकताळे बांधता येतात. त्यानुसार मनात विचारचक्रे सुरू राहून निर्णय घेता येतात. हे सारे करीत असताना नेहमी ठरविल्याप्रमाणे घडेल, असे नाही. आयुष्यात वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट एक अनुभव म्हणून स्वीकारण्याची मानसिकता तयार केली, की संकटात आणि कठीण प्रसंगातही माणसांचे मनोधैर्य खचत नाही.

अनेकदा आपल्या बोलण्याचा सूर असा असतो, की मनात आणले, तर मी काहीही करू शकतो. मनात आणले, तर असाध्य ते साध्य होऊ शकते. एवढी कसली ताकद या मनात आहे? मनाच्या सागरात भावनांच्या आणि विचारांच्या असंख्य लाटा उसळत असतात. हे विचार चांगले असतील, तर व्यक्ती चांगले कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत असतात. आपण ज्या पद्धतीने विचार करतो, त्यानुसार आपली बुद्धी आणि कर्मेंद्रिये कार्य करीत असतात. त्यामुळे मनात नेहमी सकारात्मक विचारांची आरास मांडली पाहिजे.

कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी ते मनःपूर्वक करावे लागते. एखाद्या कार्यासाठी सिद्ध होताना मनाची संपूर्ण तयारी हा मनाच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भाग आहे. जसे शरीर थकते, तसे मनही थकत असते. नुसत्या झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळू शकते; पण झोपेतही मन जागेच असते. मनाची विश्रांती अनेक गोष्टींतून साधता येते. बहरलेले वृक्ष, खळाळणारे जलप्रवाह, निसर्गातील नानाविध रंगांची उधळण आणि पशुपक्ष्यांच्या दर्शनानेही मन प्रसन्न होऊ शकते, त्याला विश्रांतीही मिळते. आहारातून मिळणारी जीवनसत्वे शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असतात. केवळ अन्नातून मिळणारी जीवनसत्वे जीवनासाठी पुरेशी नसतात. ती चांगल्या विचारातून, पुस्तकातून, कलेच्या आस्वादातून, जोपासलेल्या छंदातून, मनमुराद गप्पांतून, मनसोक्त केलेल्या पर्यटनातून आणि कामात केलेल्या बदलातूनही मिळत असतात. अशा सत्वांवरच मनाचे भरण-पोषण होत असते. त्यासाठी मनाला कधी मुंगी, तर कधी पाखरू होता आले पाहिजे. यशस्वी मन व्यवस्थापनाचा तो एक महत्त्वाचा भाग असतो.

आजच्या बदलत्या जीवनशैलीत सुंदर दिसणे, उंची कपडे, महागडे दागदागिने, सुगंधी द्रव्ये हा आपल्या कौतुकाचा विषय असतो; पण आपली बुद्धी ज्याच्या आदेशाने पालन करते, त्या मनाच्या सौंदर्याकडे, सुदृढतेकडे आपण किती गांभीर्याने पाहतो, हा खरा प्रश्न आहे. मन हा अक्षय प्रेरणास्त्रोत आहे. तो अखंड प्रज्ज्वलित राहावा, यासाठी मनावर आलेले अविचारांचे, निराशेचे आणि अगतिकतेचे सावट दूर करायला हवे. म्हणूनच मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।। हा मंत्र लक्षात ठेवायला हवा.

पोळा आठवणीतला

बैलपोळ्याचा दिवस उगवला की, माझं मन गोळा होऊन, गाववेशीतून फिरून येतं. बसल्या बसल्या गावच्या आठवणी काढतं. लहानपणाच्या, शाळकरी वयातल्या गाईगुरं चारण्याच्या आठवणी, मनात रुंजी घालतात. त्यावेळचा काळच वेगळा होता. मृगाचा पाऊस हमखास पडायचा. शेतकरी आपल्या गाई-गुरांसह स्वतःला पावसात भिजवून घ्यायचा. उन्हात नांगरून, वखरून पडलेली जमीन भिजायची. पडणाऱ्या पावसात ती खोलवर अंग भिजवून घ्यायची. शिवारातली झाडं, झुडपं वेली- गवताच्या हिरवाईनं सारं वातावरणं नटलेलं असायचं. आनंदित झालेला शेतकरीराजा बैलजोडी घेऊन शेतावर जायचा, मशागत करायचा. भुसभुशीत जमिनीत बी-बियाण्यांची तो पेरणी करायचा.

पेरणी झाली की, प्रसन्न होत शेतकरीराजा उगवून आलेल्या हिरव्या निळ्या पिकांचं संगोपन करायचा. निंदनी, खुरपणी, कोळपणी करून त्याला उसंत मिळायची. घरच्या लक्ष्मीला अर्थात शेतकऱ्याच्या बायकोला माहेरची ओढ लागायची. नागपंचमीचा सण ऐन हिरवाईत यायचा. शेतकऱ्याचा मित्र साप, त्याची गावात मनोभावे पूजा व्हायची. नाच गाणं व्हायचं. माहेरवाशिणी शिवारानं पांघरलेल्या हिरव्या दुलईच्या साथीनं झोके घ्यायच्या. नारळी पौर्णिमा त्यांच्या मनात रक्षाबंधनाची साद घालायची. शेतकऱ्याला पोळ्याच्या सणाची चाहूल लागायची. तो प्रफुल्लित व्हायचा. रक्षाबंधनाची आठवण घेऊन शेतकरी राजाबरोबर घरातील स्त्री शेतीच्या कामात गुंतायची. शेतकऱ्याचा आनंद आता वाऱ्यावर डोलणारं पीक पाहून गगनात मावत नसायचा. या आनंदाच्या वातावरणातच पोळ्याच्या सणाची तो उत्साहाने तयारी करायचा.  
 
पोळ्याच्या दिवशी पहाटेची मोठी चांदणी मावळते न मावळते, तोच तो उठायचा. बैलजोडीसह शेतावर जायचा. बारा महिने शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी विश्रांती असते. ओला चारा वैरण बैलांना घातली जायची. बांधावरील ओल्या हिरव्या टवटवीत गवतावर बैलांना चरू दिलं जायचं. चरून तट्ट झालेले बैलं हुंदडायचे, मस्तवायचे, उंचवटा पाहून शिंगांनी माती उकरायचे. नंतर शेतकरी नदीनाल्याच्या नितळ पाण्यात त्यांना आंघोळ घालायचा. बैलांचं शरीर घासून काढायचा. त्यांची व त्याची अंघोळ झाली की बैलांना सजवायला घ्यायचा. खुरं चकाचक करायचा. बैलांचे खांदे ढोपर तेल लावून मालिश करायचा. गेरू लावून जखमांना थंडावा द्यायचा. शिंगं साळून लाल-पिवळ्या गुलाबी रंगाचा हिंगुळ लावून त्यावर बेगड चिकटवायचा. चमचमणारी शिंगं खुलून दिसायची. शिंगांवर छंबीगोंडा, चेहऱ्यावर म्होरकी, गळ्यात घुंगरू, नाकात नवी वेसण, अंगावर झूल, उघड्या अंगावर रंगीबेरंगी ठिपके. गोंड्याची शेपटी असा सजलेला बैल गाववेशीत आणला जायचा. असा सजलेला बैल इतरांना पाहून नखरायचा. आपल्या धन्याला जिभेनं चाटून सांगायचा, ‘धनी सगळ्यात भारी आहे मी.’ दोघं हर्षित व्हायचे!

गाववेशीतून बैलपोळा फुटला की देवळासमोर दर्शन घेऊन. देवाला सलामी देऊन. पूर्ण गावभर मिरवून बैलं घरी आणले जायचे. घरधनीन बैलांना ओवाळून त्यांना हळदी-कुंकू लावून त्याची मनोभावे पूजा करायची. ‘अशीच साथ दे माझ्या धन्याला, बरकत येऊ दे सालोसाल, बळीचं राज्य होऊ दे.’ अशी प्रार्थना ती करत असे. पुरणपोळीचा घास भरवून, सुपातलं धान्य त्याला चारून, पायांवर पाणी वाहायची. नारळ फोडून प्रसाद वाटला जायचा. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा उपवास असायचा. गोठ्यात बैलांना चारावैरण करून गोडघोड खाऊन मगच तो उपवास सोडायचा..!

आज गाववेशीतून बैलपोळ्याच्या दिवशी कुणाला मिरवायचं? खापराचे मांडे, पुरणपोळी कोणी बनवायची? हे करणाऱ्या महिलाही आता राहिल्या नाहीत. बैलं तरी आहेत का मिरवायला? बैलांचा आनंदानं सांभाळ करणारे किती शेतकरी उरले आहेत? पिठोरी अमावास्या म्हणजे बैलपोळ्याचा दिवस. मी मनाच्या वेशीत उभा आहे बैलपोळ्याच्या आठवणी जागवत...!