Tuesday, November 30, 2010

आनंददूत !!!

या पावसाच काही खर नाही सांगतो तुला
त्याला सगळ कळत असाव बहुधा
तुझ असणं..नसणं...असुनही नसणं
अन हो आजकालच तुझ नसुनही असणं....
या सगळ्याचे त्याचेही अडाखे असावेत बहुधा...
तु असतांना त्याच थुई-थुई नाचणं
वार्‍याला न जुमानता तुझ्यावर रेंगाळणं
मी एकटाच असतांना मात्र असंबद्ध वागणं
वळीवाच्या नावाने पटकन निघुन जाणं
हा सगळा माझ्यासाठी जुलुमच होता गं......
पण तुला आठवतय ...आपली पहीली भेट..
त्या दिवशी तो जसा वागला होता
जसं निर्जन बेटावर अल्लाउद्दीन भेटावा दिव्यासहीत
त्यानं त्यादिवशी जे जपल न तुझ्या-माझ्या कहाणीला
तेंव्हाच मी ठरवल ....
यानं काहीही केल तर तक्रार नाही ...
अन आजकाल तर तो
तुझ्याच कहाण्या मला नव्याने सांगतो
तुझ्याच कविता ओल्या करुन पुढ्यात टाकतो
अचानक मी का कोरडा झालो म्हणुन रागावतो
अन येता-जातांना बरच काही सांगत असतो.....
आयुष्यातल्या चढ-उतारांची आपली जागा आहे
आनंदाच गाणही आपलच अन आपलाच त्रागा आहे...वगैरे
तुझे-माझे सप्तरंगी तुषार आता भलेही नाहीत त्याच्याकडे
पण त्याच्याबरोबर एकट बरसण्यालाही भरपुर जागा आहे...
खरच.. मला आता कबुल करावच लागेल....
तो आनंददूतच आहे ........
माझ्या सारख्यांसाठी !!!!!!!!!!!!!!!!

श्रावण...

जुना रस्ता जुन्याच डोहात नवा पाउस मिसळुन गेला
यंदा श्रावण तुझ्याशिवाय एकटा एकटाच कोसळुन गेला
तुला पावसात शोधण्यासाठी रोज छत्री विसरुन आलो
रडेपर्यंत हसशील म्हणून जुन्याच चिखलात घसरुन आलो
चिखल म्हणाला, जुनाच दोस्त आज नव्यानं ढासळुन गेला
यंदा श्रावण तुझ्याशिवाय.....
सुसाट वारा उलटी छत्री कसलाच किस्सा घडला नाही
तुझा साधा रुमाल सुध्दा यंदा चिखलात पडला नाही
डोह म्हणाला, स्वच्छ रुमाल गढुळ पाण्यात विसळुन गेला
यंदा श्रावण तुझ्याशिवाय....
पावसाच्या भिंतीआड मोकळं मोकळं मंदीर नाही
चित्रपट पाहतानाही तुझ्या पायावर उंदीर नाही
माझे एकटे पाय बघुन, वेंधळा उंदीर गोंधळुन गेला
यंदा श्रावण तुझ्याशिवाय...
मागचा श्रावण पुढचा श्रावण भरून वाहतील जोडीने
एवढा एकच व्याकुळ होईल सखे तुझ्या ओढीनं
श्रावण म्हणाला, समजुन घे, एक डाव भुताला दिला
यंदा श्रावण तुझ्याशिवाय......

तुकाकाका ....

लहानपणी उन्हाळ्याची सुटी लागली की एक कार्यक्रम ठरलेला असायचा. गावाकडे पळणे....
माझं लहानपण तसं बर्‍याच ठिकाणी गेलं. आण्णांची नोकरी पोलीसखात्याची, त्यात ते खाकीवाले, त्यामुळे दर वर्ष - दिड वर्षांनी बदली ठरलेली. (खाकीवाले : पोलीसांच्या दोन जाती असतात. खाकीवाले आणि खाSSSकी वाले, सुज्ञास अधिक सांगणे नलगे).
सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आमचे एक छोटेसे गाव आहे! गाव तसा छोटाच आहे. हजार एक लोकवस्तीचा. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. सगळे जुन्या पद्धतीचे आता मोडकळीला आलेले वाडे.
गावाला बस स्टॉप असा नाहीच. वेशीवर असलेले मारुतीचे मंदीर हाच तिथला बस स्टॉप. मंदीराला लागुनच गावाची वेस आहे. वेशीपाशीच पडकी चावडी आणि सार्वजनीक पाणवठ्याची प्रचंड मोठी विहीर. या विहीरीला सगळे मिळुन एकुण सोळा रहाट होते पाणी काढण्यासाठी. आता चारच उरले आहेत. विहीरीचं पाणी पण आटत चाललेय. मुळात आता घरोघर नळ आल्याने तिचा वापर फारच कमी झालायगावात सरळसोट एक लांबलचक रस्ता या टोकापासुन त्या टोकापर्यंत पसरलेला. रस्त्याच्या दुतर्फा आमचे छोटेसे गाव वसलेले आहे.
माझे कुणीतरी खापर पणजोबा काहीशे वर्षापुर्वी गावात येवुन स्थाइक झालेले. आम्ही मुळचे कर्नाटकातील बदामीचे. मुळ आडनाव “विद्वत”. पण तत्कालीन राज्यकर्त्याने जगण्यासाठी म्हणुन महाराष्ट्रात आलेल्या आमच्या पुर्वजांना त्यांच्या निष्ठेवर खुश होवुन आजुबाजुच्या पाच गावाचे सारा वसुलीचे काम (कुळकर्णीपद) दिले आणि आम्ही कुळकर्णी, मग हळुहळु कुलकर्णी म्हणुन ओळखले जावु लागलो. पुढे कुलकर्णी हेच आडनाव कायम झाले. गावात आमचा एक प्रचंड असा वाडा होता. आता खुप मोडकळीला आलाय. त्यातलाच काही भाग दुरुस्त करुन, पुन्हा बांधुन काढुन आमची आताची पिढी वाड्यात राहते. एकेकाळी वाडा खुप प्रशस्त होता, ऐसपैस होता. दिंडी दरवाज्यातुन आत शिरलं की समोर अंगण आहे. अंगणात मधोमध तुळशी वृंदावन. आणि अंगणाच्या चारी बाजुनी कोटासारख्या खोल्या आहेत. पुर्वी दोन्ही मजले मिळुन एकुण १० खोल्या होत्या. सद्ध्या सहा फक्त शिल्लक आहेत. दिंडी दरवाज्याच्या अगदी समोर अंगणाच्या त्या बाजुला आमची देवघराची खोली आहे. अगदी दारात उभे राहीलेल्याला देखील आमचे शिसवी देवघर स्पष्ट दिसायचे, आता देवघराची जागा बदललीय. अंगणाला लागुन असलेली ओसरी आणि ओसरीला लागुन देवघर. देवघराचा उंबरा जवळ जवळ एक फुट उंचीचा होता. आता काढुन टाकलाय.
उन्हाळ्याची सुटी लागली की आण्णा आम्हाला गावी सोडून यायचे. इतरही चुलत, आत्ये भावंडे यायची. कधीही उठा, येता जाता कणगीतल्या भुईमुगाच्या शेंगा, कोवळी तुर, हुलगे अशा मेजवानीवर हात साफ करा. शाळेची काळजी नाही. अभ्यास नाही त्यामुळे आम्ही पोरेसोरे सॉलीड खुश असायचो. दिवसभर शेतावर हुंदडायचे, विहीरीत बिंडा बांधुन पोहायचे, झाडावर चढायचे. धमाल असायची नुसती.सद्ध्या घोटीत आमची ३० एकर शेती शिल्लक आहे. काकाने विहीरीत पोहायला शिकवलेले. पांगार्‍याचा बिंडा बांधुन धडा धडा विहिरीत उड्या मारायच्या. मग बांधावरच्या चिंचेवर चढुन तोडलेल्या चिंचासाठी भांडणे. विहिरीवर बसुन मस्तपैकी काकुने करुन दिलेल्या लाल मक्याच्या भाकरी, वांग्याची भाजी हाणायची. ते दिवस खरोखर खुप सुखाचे होते. त्यावेळी उन्हाळ्याची सुटीही चांगली महिनाभर मिळायची. आजच्यासारखे क्लासेसचे फॅड अजुन निघाले नव्हते ना.
पण या महिन्यातला एक दिवस घातवारासारखा उगवायचा.
सकाळी-सकाळी दारातून हाळी ऐकु यायची.
"बामणीन वैनी, हायती का देव घरात?"
तो बामणीन वैनी शब्द ऐकला की आमची त्रेधा उडायची. कारण काकुला या नावाने बोलावणारा गावात एकच माणुस होता, ज्याच्या नावाने आमच्या घरातलं प्रत्येक लहान मुल घाबरायचं. अगदी २ वर्षाच्या लेकरापासुन ते १५ वर्षाच्या छोकर्‍यापर्यंत. मला तर वाटतं, आमचं घरच काय गावातली सगळी पोरं त्याला घाबरत असावीत. त्याचं नाव होतं "तुकाराम बागल" पण गावात लहान थोर सगळेच त्याला ओळखायचे ते "तुका न्हावी" म्हणुनच. आम्ही गावी गेलो की एक दिवस काका त्याला बोलावुन घ्यायचे आणि मग सगळ्या बच्चे कंपनीची एका रांगेत , तरटावर बसुन झकास हजामत व्हायची. तुकाच्या हातात एकदा मान दिली की मग सगळे केस भादरुन होइपर्यंत काही खरं नसायचं. आमची मान म्हणजे त्याची खाजगी मालमत्ता असल्यासारखी वापरायचा तुका. मला त्याच्याकडुन केस कापुन घ्यायला कधीच आवडायचं नाही, कारण तो अगदीच बारीक भादरुन टाकायचा सगळे केस. आधीच आम्ही वामन मुर्ती त्यात केसही एवढेशे म्हटले की अवतार जाम अफलातुन दिसायचा. १२-१३ वर्षाचे वय असल्याने स्वतःच्या दिसण्याबद्दलची जागरुकता वाढायला सुरूवात झाली होती.
कारण हा तुका आम्ही तिथे गेल्यानंतर १५-२० दिवसांनी उगवायचा, तोपर्यंत परत यायची वेळ झालेली असायची आणि डोइवर फरशी घासायच्या केस झडलेल्या ब्रशसारखी खुरटे घेवुन पुण्यात वावरायची शॉल्लेट लाज वाटायची. पण काकांसमोर कुणाचेच चालायचे नाही. सगळ्यांना आपली गर्दन त्या गारद्याच्या हाती द्यावीच लागायची. तुका मग आपली हत्यारे परजत गोंधळलेल्या, बावरलेल्या आदिलशाही सैनिंकावर गनिमी काव्याने एकदम हल्ला करणार्‍या मर्द मावळ्यासारखा (च्यायला उपमा उलट्या झाल्या का?) तुटून पडायचा. त्याचा हात सॉलीड जड होता. एखाद्याचे तरी रक्त निघायचेच. मग ते तुरटीच्या खड्याने खसखसुन पुसत तो रक्त टिपून काढायचा. ती सिच्युएशन बघण्यासारखी असायची....
काकांनी दम दिलेला असल्याने आम्ही त्याला तुकाकाका म्हणायचो, पण त्याला नुसते तुकाच म्हणलेले आवडायचे. तर तुका आपली धोकटी उघडुन बसलेला असायचा. त्याच्या समोर तरटावर हातात आरसा धरुन आमच्यापैकी एखादा बकरा..., कत्तलखान्यात खाटकाच्या सुरीखाली उभ्या असलेल्या बकर्‍याच्या चेहर्‍यावरही एवढे केविलेवाणे भाव नसतील असा त्याचा चेहरा. शेजारी एका रांगेत बाकीचे ७-८ जण. रांगेत आपला नंबर शेवटचा असावा अशी प्रत्येकाचीच केविलवाणी धडपड चालु असायची. शेजारीच काका बसुन असायचे. सगळ्यांची "हजामत" होइपर्यंत ते बसल्या जागेवरुन उठायचे नाहीत. त्यामुळे मनात असो वा नसो कुणालाच ते टाळता यायचे नाही. तुकाचा हात जबरदस्त चालायचा. दोन तासात सगळ्यांची भादरुन (डोकी) टाकायचा तो. त्यात त्याची एक कातरी खुपच जुनी झालेली होती. तिने बर्‍याचदा केसाला चांगलीच ओढ बसायची आणि ओसरीचे रुपांतर रुदनगृहात व्हायचे. काम पुर्ण होइपर्यंत तुका एक शब्दही बोलायचा नाही. आता 'बाल'हत्या करायला गेले की अखंड बडबड (तिही फालतु) करणारा इथला नापित पाहीला की मला तुकाची जाम आठवण येते.
एकदा मात्र तुका बोलला. संज्या, आमच्या तीन नंबरच्या, चुलत आत्याचा मुलगा, वय वर्षे सात (हुश्श ) वैतागुन त्याला म्हणाला. तुका काका मी मोठा झालो की मोठ्ठं कटींग सलुन काढणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझे केस भादरणार सगळे. मग तुला कळेल, काय त्रास होतो ते. (तोवर तुकाची पण कुणी भादरु शकेल यावर आमचा विश्वासच नव्हता.) तसा तुका भडकला.
"गप ए फुटाण्या, एक कानफटात दीन बघ. सलुन काढणार म्हणे. गपचुप अभ्यास करुन विंजनेर व्हायाचं तं हजामती करणार म्हणे. फटके दीन गांXवर सणकुन दोन."
दुसर्‍याच क्षणी तुकाचा आवाज एकदम मऊ झाला.
"देवा, तुमी चांगलं शिका, लै मोटं व्हा. दागदर व्हा, विंजनेर व्हा. आमी हावोच की असली हलकी सलकी कामं कराया. तुमच्यासारक्याचं काम न्हवं ह्ये."
तूका न्हावी...
काळा कुळकुळीत वर्ण, अंगात एक बर्‍यापैकी पण स्वच्छ असणारा सदरा आणि गुडघ्यापर्यंत येणारं धोतर असा त्याचा वेश. एका खांद्यावर अडकवलेली चामड्याची धोकटी आणि दुसर्‍या खांद्यावर एक घोंगडी. त्या घोंगडीवर त्याने त्याच्या गुरुंचा कापडी फोटो शिवुन घेतला होता. श्री शिवलाल स्वामी तसे आमच्या सगळ्या गावचेच गुरु. आजच्या सो कॉलड बाबा-बुवा सारखे नाहीयेत ते. भजने, प्रवचने उत्तम करतात पण त्यावर त्यांचा फारसा विश्वास नाही. सोलापूरातील सेटलमेंट नामक कुप्रसिद्ध भागात त्यांनी उद्यम नगर म्हणुन एक छोटीशी वसाहत स्थापन केलीये. तिथे त्यांनी वडर, लमाण ई. जमातीतील तसेच इतरही समाजाने वाळीत टाकलेल्या लहान मोठ्या गुन्हेगारांसाठी एक पुनर्वसन केंद्र चालवले आहे. त्यांच्यासाठी लहान लहान उद्योग चालु करुन दिले आहेत. असो तर स्वामींचा फोटो तुकाच्या घोंगडीवर असे.
एका भेटीत तुकाच्या खांद्यावर त्याची चिरपरिचीत घोंगडी दिसली नाही म्हणुन त्याला विचारले तर त्याने जवळजवळ उडवुनच लावले...
"हरपली की देवा कुटंशी!" मी विसरूनही गेलो.
नंतर आठवड्याभराने आम्ही पोरं-पोरं शेताकडुन येत असताना वेडी अंपी दिसली रस्त्यात. कर्नाटकातल्या कुठल्यातरी गावातली ही बाई, कोणी तरी नोकरीचे आमिष दाखवुन इकडे आणली आणि नंतर चक्क त्याने तिला सोलापूरच्या बुधवारपेठेत विकले. त्या धक्क्याने वेड लागुन इकडे तिकडे भटकत ती आमच्या गावात येवुन पोचली, ती इथलीच होवून गेली. तिच्याकडे ती घोंगडी बघितल्यावर साहजिकच आम्हाला स्फुरण चढले.
"ए येडे, हि घोंगडी आमच्या तुकाकाकाची आहे " म्हणुन आम्ही ती घोंगडी तिच्याकडुन हिसकावुन घेतली आणि परत तुकाला नेवुन दिली. अर्थात त्यामागे आमचा स्वार्थ होता. तुकाकडुन मिळेल तेवढी सवलत हवीच होती. दुसर्‍या दिवशी घोंगडी परत अंपीच्या अंगावर दिसली. तुकाला विचारायला गेलो तर म्हणाला...
"जाऊ द्या देवा, येडी हाये पण माणुसच हाये ना. तिलाबी थंड वाजतीच की. म्हुन म्याच दिली व्हती घोंगडी तिला."
मी अवाक होवून बघतच राहीलो. तुकाचं हे नवीनच रुप पाहायला मिळालं होतं आज.
दिवस हळु हळु जात होते. आम्हीही मोठे होत गेलो. जगाकडे बघण्याची दृष्टी बदलत होती. मध्येच एक दिवस काकांचा फोन आला. मी १० वीत होतो तेव्हा. तुका लग्न करत होता, त्यासाठी आई-आण्णांना खास आमंत्रण होतं. आण्णा आश्चर्यात पडले होते. तुका जवळ जवळ काकांच्याच वयाचा, आण्णांपेक्षा ८-९ वर्षांनी लहान. पण इतके दिवस लग्नाविना राहीलेला. सगळे मागे लागुन देखील 'मला नाय लावायचा पाट!' यावर अडून राहीलेला. आज वयाच्या चाळीशीनंतर लग्नाला कसा काय तयार झाला?
पण आई-आण्णा आठवणीने गेले. ते परत आल्यावर कळलेली हकिकत अफाटच होती. गावाबाहेरच्या वस्तीतला (हरिजन वस्ती) सोपाना. त्याच्या विधवा पोरीवर गावातल्याच काही पोरांनी बलात्कार केला होता. रखमीनं थेट पावातल्या विहीरीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. नेमका त्यावेळी तुका तिथे रानातच होता. त्यानं तिला वाचवलं आणि सरळ लग्न करुन रिकामा झाला. सुरुवातीला गावात थोडा गोंधळ झाला. कारण ती एक तर विधवा, त्यात म्हारवड्यातली , तुका जातीनं न्हावी त्यामुळे गावातल्या तथाकथित प्रतिष्ठीत लोकांनी याला विरोध केला. त्यासाठीच काकांनी आण्णांना बोलावले होते. आण्णांनी लोकांची समजुत काढली आणि रखमीला घर मिळालं. पण तुका आता आम्हाला नव्याने कळायला लागला होता.
माझं इंजीनिअरींग पुर्ण झाल्यावर एकदा गावी गेलो होतो, तेव्हा तुकाला मुद्दाम जावुन भेटलो. आता पन्नाशीच्या घरात होता तुका. त्याच्या पाया पडुन सांगितलं...
"तुकाकाका, तू सांगितल्याप्रमाणे विंजनेर झालो रे." तसा तुका उसळुन म्हणाला...
"देवा तू तर चित्तरकार होनार हुता ना, विंजनेर मी त्या संज्याला सांगितलं हुतं." म्हणजे हे ही त्याच्या लक्षात होतं. चित्र काढण्याची आवड असणं आणि चित्रकार होणं यातला फरक त्याला समजावुन सांगण्याच्या फंदात मी पडलो नाही. त्यानं माझ्या पाठीवरुन हात फिरवला आणि म्हणाला...
"त्ये कायका आसंना, आन्ना लै खुश आस्तील न्हवं. पोरं मोटी जाली की आय-बापाला हुनारा आनंद लै येगळाच अस्तोय बग."
मला माहीत नव्हतं पण या घटनेच्या दोनच आठवडे आधी तुकाचा मुलगा साधं तापाचं निमीत्त होवून तडकाफडकी गेला होता. नंतर जेव्हा काकांकडुन ही गोष्ट कळली तेव्हा हळहळण्याशिवाय दुसरं काहीच करु शकलो नाही मी. आजही गावी जातो तेव्हा थकलेला तुका भेटतो आणि विचारतो...
"काय देवा, हजामत करायची का? बसताय तरटावर.....!"
आता गावात कटींग सलुनही झालीत. तरटाची जागा खुर्च्यांनी घेतलीय. हातात धरायच्या तुकाच्या फुटक्या आरशाची जागा मोठ मोठ्या मिरर्सनी घेतलीये. तुकाही खुप थकलाय आता. पण इतके दिवस अरेतुरे करणारा तुकाकाका आता अहोजाहो करतो, किती सांगितले तरी त्याला ते पटत नाही. मग मी हलकेच हसतो, कधी कधी मुड असेल तर अगदी हजामत नाही पण दाढीला मात्र त्याच्यासमोर नक्की बसतो. पण खरंच सांगतो...
अजुनही त्याचा हात थरथरत असला तरी तेवढाच जोरात चालतो, पण अजिबात त्रास देत नाही. कारण आता मला तुका पुरेपुर उमजलाय.

मावळतीचा साज




ढगांच्या मधून लपाछीपी करत मावळतीला जाताना सूर्य.


सांजवेळी क्षितिजावर पसरलेले विहंगम दृक्ष्य.



सांजवेळी वाटेत येणाऱ्या प्रत्येकास आपल्या सोनेरी किरणांत समावून घेताना.



आपल्या प्रखरतेने ढगातून डोकावताना.



मावळतीला जाताना क्षितिजाला चढविलेला मावळतीचा साज.



सप्तरंगानी उजळून निघालेले क्षितिज.



सूर्याचे देखणेरूप पाहण्याचा मोह या वाटसरूला सुध्दा आवरता आला नाही.



झाडामागून मावळतीला जातानाच्या सूर्याचे विलोभनीय दृक्ष्य.



पहाडामागून मावळतीला जाताना.


झाडामागून मावळतीला जाताना या निष्पर्ण झाडालाही सौंदर्य मिळाले.

Wednesday, November 17, 2010

||वारी||

      वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे,गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.
      अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात. 
      वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.
      वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत.त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.
मुख्य चार यात्रा(वार्‍या)
१) चैत्री यात्रा
      
चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात.


२) आषाढी यात्रा
      ;
आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ " आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात.वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात.इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात.आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.

      ;
"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते.एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते.गोपाळपुर येथे सार्‍या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्‍यांना गोपालकाला वाटला जातो.
३) कार्तिकी यात्रा
      ;
कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते.शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.
४) माघी यात्रा
      ;
माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते.या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.

Monday, November 8, 2010

समतावादी संस्कृतीचा महानायक: बळीराजा

दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांचा राजा बळीराजा. या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी भावना आहे. या दिवशी ग्रामीण भागात बहिणी भावाला ओवाळतांना, ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असे म्हणतात. बळीराजाचे महत्व मांडणारा लेख.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला कपटाने मारण्यात आले. वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. अशावेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, ‘आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. घराघरात बलिपूजन केले जाते.
ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता-बहिणी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ म्हणून घरातील पुरूषांना ओवाळतात. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मरतड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते, असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते.  प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ म्हटले जात असे. आज जसे भारतातील प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे (जिल्हे) असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा होय. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख जोतीबा, मल्हार व मरतड हे सुरक्षा अधिकारी होत, अशी भावना आहे. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती, हे लक्षात येईल. अशा सुखी व संपन्न राज्यावर नेहमीच परकीय आक्रमक वाईट नजर ठेवत असत.
बाहेरून आलेल्या परकीयांनी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकाविले. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्याचा सेनापती असलेल्या वामनाने बळीराजाला कपटाने मारले, असे म्हटले जाते. वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही कथा आपणास पुराणांमधून सांगितली जाते. परंतु बहुजनांच्या हिताची प्रत्येक गोष्ट गाडून टाकण्यात आली आहे. बहुजनांच्या फायद्याचे आयोग आजही दडपून टाकण्यात येत आहेत. बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे. देशात पसरलेले जातीभेद, स्त्री-पुरूष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य  नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे.
बळीराजाच्या क्रांतिकारक इतिहासाचा धसका जातीयवाद्यांच्या छातीत कायमचा घर करून बसलेला असल्याने जेव्हां जेव्हां बळीराजा पाताळातून वर येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हां तेव्हां त्याला पुन्हा पाताळात गाडण्यासाठी प्रयत्न सुरू होताता, असेच म्हटले पाहिजे. बहुजनांच्या हिताचे आयोग गाडणे म्हणजे वर्तमानातील संभाव्य बळीराजांना गाडणे होय. आज ज्याला बळीराजा म्हटले जाते, तो शेतकरी रोज हजारोंच्या संख्येने आत्महत्या करीत आहे.
इतिहासातील बळीराजा हा आक्रमकांविरोधात लढता लढता मेला. आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणेच पसंत करत आहे. लढाई सुरू होण्याआधीच तो पराभव मान्य करत आहे. त्याची लढण्याची प्रेरणा हरवली आहे. कारण त्याचा क्रांतिकारक लढय़ाचा इतिहास हरवला आहे. त्याची लढाऊ ‘आयडेंटी’च हरवली आहे. म्हणून आज बहुजन बुद्धिजीवींनी खरा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे. हा इतिहास बहुजनांच्या रुढी व परंपरांमध्ये शोधला पाहिजे. त्यावरील अंधश्रद्धांची पुटे खरवडून काढलीत तर अस्सल इतिहास आपल्याला सापडल्याशिवाय राहाणार नाही. बहुजनांच्या डोक्यातून अंधश्रद्धा नष्ट करावयाच्या असतील तर त्यांच्या देवांचा अभ्यास करून त्यामागील क्रािंतकारक इतिहास शोधून काढला पाहिजे.
प्राचीन काळापासूनच्या सर्व रुढी, परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची आज नितांत गरज आहे. त्याशिवाय जातीयवाद्यांनी लादलेल्या रुढी, परंपरा व दगडाचे देव आणि बहुजनांचे खरेखरे ऐतिहासिक देव यातील फरक कळणार नाही.
आज आपण ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, बौद्ध विरुद्ध बौद्धेतर अशा अनेक आयडेंटीज् घेऊन वर्णजाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु या संघर्षांसाठी आवश्यक असलेली कनिष्ठ जातींची व बहुजनांची फौज कोणतीही आयडेंटी घेऊन लढायला तयार नाही. कोणत्याही सामाजिक व सांस्कृति संघर्षांत आयडेंटी हा कळीचा मुद्दा आहे, आणि ती आयडेंटी इतिहासातून येते. त्यातूनच लढण्याची प्रेरणा मिळते. वर्तमानकाळ फक्त लढय़ाची साधने, धोरण व डावपेच ठरवित असतो. सत्य इतिहास, अचूक आयडेंटी व प्रेरणा ही शस्त्रे नसल्यास सामाजिक व सांस्कृतिक संघर्ष उभा राहूच शकत नाही. भरण-पोषण होत असलेली वर्णजाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक संघर्षांशिवाय पर्याय नाही.
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी बळीराजाचे जे प्रतिक दिले आहे, त्याच्या मुळाशी सांस्कृतिक संघर्षांची पाश्र्वभूमी आहे. परंतु या दृष्टीकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हावयाचा आहे. सर्व माहिती ताटात ठेवलेली असतानाही बहुजन बुद्धिजीवींना बळीराजाचे सांस्कृतिक संघर्षांतील महत्व कधीच लक्षात आले नाही. ग्रामीण भागातील बहुजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते, म्हणूनच पाच हजार वर्षांपासून ठराविक गटाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला आहे. या लढय़ात अग्रभागी आहेत अडाणी ग्रामीण स्त्रिया. ज्या आजही इडा पीडा घालवण्यासाठी बळीच्या राज्याची आस जिवंत ठेवत आहेत.
या बलिप्रतिपदेच्या पाश्र्वभूमीवर समाजातील जाती-वर्ण व्यवस्था आणि स्त्री-पुरूष विषमतेविरूध्द लढण्याची गरज आहे.