Saturday, August 6, 2016

जगण्याचा जामीनदार!

आसाराम लोमटे 

माणूस जगतो तो निसर्गाच्या आधाराने. त्याला मिळणारा प्रत्येक श्वास, त्याच्या भोवतालच्या सृष्टीतली हालचाल, त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचे उसासे आणि असंख्य जिवांनी भरलेले अवघे चराचर.. ही सृष्टीची किमया साकारणारा पाऊसच आहे. तो पारखा झाला तर माणूस माणसात राहत नाही. अन् त्यानेच जर दिलदारी दाखवली तर मग तरारणाऱ्या कोंभासारखे जगणेही पीळदार होऊन जाते.. केवळ छाती भरून मृद्गंध घेण्यासाठी आसुसलेल्यांना या पावसाने उल्हसित केलेच; पण छाती फाटेस्तोर राबले तरीही हाती काही उरत नाही असा अनुभव नेहमीच घेणाऱ्यांना त्याने ‘आबाद’ केले आहे. त्यांच्या जगण्याचा जामीनदार म्हणूनच धावून आलाय तो..
ज्या उजाड माळरानावर भयाण दुपारी दुष्काळाच्या जिभा फिरलेल्या असतात, तिथेच आता गवताला तुरे लागावेत, ही करामत कोणाची? आईचा तेल माखणारा हातही पारखा झालेल्या एखाद्या अनाथ लेकराचे केस वाऱ्यावर भुरुभुरु उडताना दिसावेत तसे ज्या डोंगरांचे माथे दिसू लागतात, तिथेच दाटून आलेली हिरव्यागार गवताची उतू जाणारी साय पसरवतो कोण? अन् वाऱ्यावर डफासारखी थरारणारी हिरवी सळसळ कोणाचं बोट धरून येते? निष्पाप झाडानं आपले हडकुळे हात पसरावेत आभाळाच्या दिशेनं बेदम आघात झालेल्या शरणागतासारखे, त्याच झाडांवर आता पाखरांची किलबिल.. हा चमत्कार तरी कशाचा? गणगोत तुटल्यासारखे दूरवर गेलेल्या उदास पाऊलवाटांना रंगीबेरंगी फुलांनी सजवतो कोण? अन् जिथे गरम उसासे टाकून भेगाळलेल्या भुईलाच जावेत खोलवर तडे-तिथे हे उललेले काळीज सांधतो तरी कोण? भगभगीत उन्हात सरभर झालेली माणसे कशाच्या आधाराने पुन्हा धडपडून सावरतात?
..हे सारे वास्तवात उभे करण्याचा संजीवक वकूब धारण करणारा पाऊस म्हणजे जणू आभाळाचाच हात.
..तो झरतो म्हणजे आभाळातून थेंबाथेंबाने पाणी झरते- एवढेच थोडे आहे? त्याच्या झरण्यातून पाझरतो विश्वास. त्याच्या आधारानेच जगण्याला सजवतो आपण आणि बांधतो पापण्यांना स्वप्नांचे तोरण. अशावेळी तो वाटतो आपल्या आतडय़ातल्या नात्यांचा आणि जिवंत हाडामांसाचा! म्हणूनच तो जेव्हा वाट पाहायला लावतो तेव्हा माणसे त्याच्या नावाने बोटे मोडू लागतात. तळतळून बोलताना आढळतात.. ‘कोणता दावा साधलाय.. जणू साता जन्माचा वैरी होऊन बसलाय.’ जिथे आभाळाचा रंग पाहून एकमेकांशी कसे वागायचे ते ठरवले जाते, तिथे पावसाची हजेरी लाखमोलाची! आभाळात ढगांचा पत्ता नसेल आणि पावसाच्या नक्षत्रातही लख्ख चांदण्यांनी लदबदलेले आभाळ दिसत असेल तर मग ‘काळ तर मोठा कठीण आला..’ असे वाटू लागते. व्यवहार ठप्प होतात. हात आखडते घेतले जातात. अन् तो येऊ लागला की मग त्याच्यावरचा राग कुठल्या कुठे निघून जातो. त्याच्याशी भांडणारेसुद्धा जणू नंतर त्याच्याच कुशीत शिरू पाहतात. तो येतो तेव्हा सरसकट सारखाच अन् कृत्रिम लयीत नाही बरसत. बनचुका सराईतपणा नसतो त्याच्या येण्यात. अगदी जिवावर आल्यासारखे येतो तेव्हा त्याचे मुळूमुळू येणे म्हणजे ‘मोले घातले रडाया’ असे वाटू लागते. पण जेव्हा कडकडाट, धडधडाट करीत तो येतो तेव्हा सगळा आसमंत फाटू लागतो की काय, असे वाटू लागते. थरकाप उडतो जिवाचा. चवताळलेल्या नागासारखा भासू लागतो तो. ओल्या मातीला भिडणाऱ्या बलांनी नागासारख्या शेपटय़ा करीत भुई िशगावर घ्यावी, तसला त्वेष असतो त्याच्या येण्यात. दात-ओठ खाऊन तावातावाने बरसतो तो. त्याचा धसमुसळेपणा कधी कधी अनावर संतापात उतरतो अन् एरवी त्याला शिव्या घालणारे आपण घरटय़ात बसून भीतीच्या कोठारात र्अधओल्या अंगाने निमूटपणे त्याचे हे रूप पाहतो. त्याची रग चिडीचूप करते आपल्याला. ताशा बडवल्यासारखा तो कोसळू लागतो तेव्हा होणारा झाडा-पानांचा घायटा एखाद्या अनाहत नादासारखा भासू लागतो.
यंदा त्याने कमाल केलीय. आई-बापावर रुसून गेलेल्या पोरासारखा नाही वागला तो. मुलूख सोडून परागंदा झाल्यासारखे केले नाही त्याने. लहरी जुगाऱ्याने भीड चेपल्यानंतर अगदीच निसवल्यासारखे वागावे, तसेही केले नाही. एखाद्या डरपोक माणसाने जीव मुठीत धरून पळून जावे असा भेकडपणाही नाही दाखवला आणि अध्र्यावर साथ सोडून गुंगाराही नाही दिला. थोडक्यात काय, तर पत्ता विसरला नाही तो. समजूतदार होऊन बरोबर वेळेवर आला. ‘एकदा आला अन् नादी लावून गेला’ असेही केले नाही त्याने. अखंड बरसतोय तो संततधार. त्याने वाट पाहायलाही लावली नाही अन् हातही आखडता घेतला नाही. किती किती बदललंय सगळं त्याच्या येण्याने. जिथं मुक्या जनावरांना उभं राहायलाही सावली दिसत नाही तिथं आता झाडे हिरवीगर्द झाली आहेत. हिरवंगार गवत माजलंय रानात अन् त्याचा उग्र वास येऊ लागला आहे. नदी-नाले वाहू लागलेत. उन्हात नदीच्या रखरखीत पात्रात झालेले खड्डेच खड्डे अन् वाळूवर दिसणाऱ्या मृगजळाच्या लाटांचे निशाणही शिल्लक राहिले नाही. सर्वस्व गमावल्यासारखे विवस्र्त् झालेल्या नद्या आता दमा-धीराने वाहू लागल्या आहेत. दोन्ही किनाऱ्यांना तटतटून जाणारा त्यांचा प्रवाह काय काय घेऊन जातोय सोबत.. कुठली कुठली माती अन् कुठले कुठले वाहून आलेले पाणी या सर्वाना एकजीव करत तो धावतोय पुढल्या दिशेनं. यंदा आभाळात वांझ ढगांचे कळप भटकले नाहीत. आभाळ कायमच काळेभोर अन् सदैव झरण्याच्या तयारीत असलेले. मनाला वाटेल तेव्हा पाऊस येतोय. त्यामुळे जागोजागी पिकांनी बाळसे धरले आहे. एरवीचे कुपोषण पिकांच्या वाटय़ाला आलेले नाही. डवरून आलेल्या निसर्गाचे नाना रंग सुखावत आहेत. मनाला उभारी देत आहेत. जीवघेणा दाह अन् सर्वागाची भाजणी होत असताना पावसाने दडी मारलीय असे वातावरण यंदा जाणवले नाही. तळ गाठलेले जलसाठे तुडुंब भरत आहेत. शेताशिवारात पाणी थळथळताना दिसत आहे. जवळचे होते-नव्हते टाकून पेरणी केली आणि आता तो आलाच नाही तर काय करायचे? असे म्हणत डोळ्यांत सारा जीव गोळा करून वाट पाहण्याची पाळी पावसाने आणली नाही. तो मनमुराद बरसतोच आहे. कुठे ‘महामूर’, तर कुठे ‘धुंवाधार’, कुठे ‘एकठोक’, तर कुठे ‘बेलगाम’.. काही ठिकाणी तर त्याची अक्राळविक्राळ ताकद थरकाप उठवीत आहे.
भर उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी केलेली वणवण अन् आता चौमाळ पसरलेले पाणी.. आधी घशाची कोरड अन् आता जागोजागी पायाखाली जाणवणारी आश्वासक ओल. हीच ओल झिरपत जाते तेव्हा मोकळे होतात जमिनीच्या पोटातले पाझर अन् आटलेल्या विहिरींना फुटतो पान्हा. पाषाणाला भेदून पाणी घेऊ लागते प्राणांतिक जोमाने जोरदार मुसंडी. तळाचा खडक फुटून पुन्हा पाणी धडपडू लागते जमिनीच्या पोटातून वर येण्यासाठी. जमिनीच्या पोटातच राहिलो तर मृत, अन् कातळ भेदून भुईवर आलो तरच आपण जिवंत- असली भारी जिद्द असते या पाण्यात. हे पाणी आता खळाळताना दिसू लागले आहे.. जागोजागी रांगताना दिसू लागले आहे. नक्षत्रागणिक त्यात भर पडू लागली आहे. सगळीकडे शेता-शिवारात दिसून येणारी नवथर हिरवाई, डवरून आलेली घनगर्द झाडी, गुराढोरांच्या, पाखरांच्या, किडय़ा-मुंग्यांच्या.. सगळ्यांच्याच जगण्याच्या बुडाशी आहे या पाण्याची ओल.
जेव्हा पावसाने दगा दिलेला असतो तेव्हा रानोमाळ पसरणाऱ्या वाळलेल्या गवतासारखी माणसे सरभर होतात. पोटापाण्यासाठी गाव सोडतात. पाऊस ताल धरत आला की जगण्याचाही सावरला जातो तोल.अन् तो रुसला तर बिघडून जाते जगण्याचीच लय. पडत्या पावसाने अनेक दारांच्या उंबऱ्यापर्यंत लागतेय पाणी आणि छप्परही लागते गळायला. अशा वेळी जागोजागी घरातली तुटकीफुटकी भांडी ठेवून घरात होणारा चिखलाचा डेरा उपसला जातो. पण आता पीकपाणी चांगले राहील, हंगाम करपणार नाही, पोटापाण्यासाठी बिऱ्हाड पाठीवर घेऊन जायची पाळी येणार नाही अशी भावनाही झड-पावसात चेहरे उजळून टाकते.
दगा न देता हाच पाऊस सखा होऊन येतो तेव्हा जगण्यावरचा भरवसा वाढू लागतो. पाखरांच्या चोचीत दाणे येतील. पोरासोरांच्या चेहऱ्यावर हसण्या-बागडण्याचे सुख हुंदडेल. दुष्काळात झेललेले घाव भरून येतील. जळत्या घरातून उडय़ा टाकून शिक्षणाच्या वाटा धुंडाळण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे चेहरे गावाकडच्या धास्तीने काळवंडणार नाहीत. पोरीबाळींचे हात पिवळे करण्याची वेळ आली असताना धास्तीने झोप उडालेल्या बापावर गळफास घेण्याची पाळी येणार नाही. उजाड झालेल्या वस्त्यांमध्ये भणाण वारा हक्काने खेळणार नाही. दुष्काळाची चाहूल घेऊन येणाऱ्या भीषण पावलांच्या आवाजाने दचकून माणसे झुरणी लागणार नाहीत. जणू ‘असे काही होणारच नाही याची हमी मी देतो,’ असे म्हणतच पुढे येतो पाऊस.. आणि पाहता पाहता माणसे कडेलोटापासून बाजूला होतात. काहीच अपराध नसताना जेव्हा एखादे बालंट अंगावर यावे आणि जगणे नकोसे व्हावे असे वाटू लागते तेव्हा एखाद्या ‘जामीनदारा’सारखा धावून येतो पाऊस. गांजलेल्या माणसांभोवती घोंघावणाऱ्या असंख्य प्रश्नांचे भुंगे तो थोपवतो. घेतो साऱ्यांच्याच जगण्याची हमी तेव्हा तो आपल्या सगळ्यांसाठीच किती मोठा तारणहार असतो. माणूस जगतो तो निसर्गाच्या आधाराने. त्याला मिळणारा प्रत्येक श्वास, त्याच्या भोवतालच्या सृष्टीतली हालचाल, त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचे उसासे आणि असंख्य जिवांनी भरलेले अवघे चराचर..ही सृष्टीची किमया साकारणारा पाऊसच आहे. तो पारखा झाला तर माणूस माणसात राहत नाही अन् त्यानेच जर दिलदारी दाखवली तर मग तरारणाऱ्या कोंभासारखे जगणेही पीळदार होऊन जाते.. केवळ छाती भरून मृद्गंध घेण्यासाठी आसुसलेल्यांना या पावसाने उल्हसित केलेच; पण छाती फाटेस्तोर राबले तरीही हाती काही उरत नाही असा अनुभव नेहमीच घेणाऱ्यांना त्याने ‘आबाद’ केले आहे. त्यांच्या जगण्याचा जामीनदार म्हणूनच धावून आलाय तो..

Wednesday, July 6, 2016

देव-घर

चहा पीत खिडकीशी उभा होतो. समोरच्या झाडावर एक कावळा घरटं बांधून कावकाव करत बसला होता. कुठून कुठून हँगर, गवत, काटक्या वगैरे आणून कावळ्याने ते सगळं छानपैकी रचलं होतं. पाऊस आलाच तर आयत्यावेळी पंचाईत नको, म्हणून कुठल्याशा घरातून ढापून आणलेली (‘महालक्ष्मी साडी सेंटर’ असं नाव छापलेली !) एक प्लास्टिकची पिशवी देखील होती. घर इज रेडी ! हाय काय आणि नाय काय ! मनात आलं…काय सुखी आहे ही प्रजा ! माणूस म्हणून जन्माला ‘न’ आल्यामुळे घरासोबत येणाऱ्या कितीतरी गोष्टी नाहीच्चेत यांच्या आयुष्यात !

हल्ली वर्तमानपत्रात ज्या जाहिरातींच्यामध्ये बातम्या येतात त्या – घरांच्या जाहिराती, होम हंटिंग, होम लोन्स आणि त्याचे हप्ते, त्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे आणि त्यासोबत लागणाऱ्या त्यांच्या एक लाख फोटोकॉपीज, पझेशन, रंग-टाईल्स-फर्निचर-नळ-कड्या यांचं सिलेक्शन, गृहप्रवेश, गृहशांती, वास्तुशास्त्र, नवीन घराच्या पार्ट्या, भांडी, हवे असलेले-नसलेले हजारो कपडे आणि त्यासाठी नेहमीच कमी पडणारी कपाटे, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर अशा तत्सम गोष्टी आणि त्या बिघडल्यावर होणारी धावपळ….या आणि अशा तमाम गोष्टी यांच्या आयुष्यात नाहीचेत ! अरे हो…एक महत्वाची गोष्ट लिहायची राहून गेली…जी या प्राणीमात्रांच्या घरात नाहीये..देवघर !

प्राणीमात्रांच्या आयुष्यात देव नाही, धर्म नाही. त्यामुळे ओघाने येणारे रीतीरिवाज, रूढी-परंपरा, व्रत-वैकल्ये, उपास तापास..या गोष्टी नाहीत ! कावळ्याच्या त्या एका घरट्याने अंतर्मुख केलं. वस्तूंचा, गरजांचा, कर्मकांडांचा केवढा पसारा मांडून ठेवलाय आपण ! माणसाने आपल्या घरात साक्षात देवाला आणून बसवलं. पण तरीही माणूस सुखी झालाय का? प्राणी पक्षांच्या आयुष्यात ‘देव’ नाही म्हणून ते सुखी आहेत की दुःखी आहेत? कळायला मार्ग नाही. पण उपासाच्या दिवशी चुकून हरीण खाल्लं गेलं म्हणून पश्चात्ताप, ओटी भरली नाही म्हणून सिंहीणबाई रागावल्यात, मंदिरात कोकिळांना प्रवेशबंदी…असल्या  गोष्टींपासून ही प्रजा कोसो दूर असावी. त्यांच्याकडून कधीही निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन होत नाही. दुसऱ्याचं न ओरबाडता ते स्वतःच्या नैसर्गिक गरजा भागवतात. आला दिवस जगतात. माझा अंदाज आहे की, ते आपल्यापेक्षा सुखी असावेत.

माणसाचं म्हणाल, तर प्रत्येक घराचे देवधर्मासंबंधी काही नीती नियम असतात. सर्वांनी ते पाळले पाहिजेत असा वडीलधाऱ्या मंडळींचा आग्रह असतो. त्या त्या धर्मानुसार घरात रोज पूजा-अर्चा होते. काही घरात गणपती, नवरात्र, गोकुळाष्टमी या स्वरूपात देवाचे पूजन होते. काही लोकांचे देव हे त्यांच्या घरात राहत नसून त्यांच्या गावच्या घरात राहतात. भारत-पाकिस्तान मॅचच्या दिवशीही ‘गावच्या जत्रेला गेलंच पाहिजे’ म्हणून जाणारे पुण्यात्मे मला माहित आहेत. सोळा शनिवार, पांढरे सोमवार वगैरे करणारी घरेही मी पाहिली आहेत. देवळात गेल्याशिवाय, पोथीचे पठण केल्याशिवाय अन्न न घेणारी माणसे मला माहित आहेत. घरात नवीन गोष्ट आल्यावर ती पहिली देवाला दाखवायची, घरात येणारे पैसे आधी देवासमोर ठेवायचे, घरात गोडधोड केल्यावर पहिला नेवैद्य देवाला दाखवायचा, घरात शुभ घटना घडल्यावर पहिला देवासमोर गुळ ठेवायचा, काही अमंगल घडतंय असं वाटलं तर देव पाण्यात ठेवायचे, दर गुरुवारी घरात गुरुचरित्राचे पठण करायचे, हरिपाठ करायचा, घरात एखाद्या जपाचा मंत्रोच्चार सीडी लावून चालू ठेवायचा, श्रावणात कांदा-लसूण-मांसाहार वर्ज्य करायचा, रोज सकाळ संध्याकाळ देवांना पंचामृताने आंघोळ घालायची, अशा विविध माध्यमातून माणसं ‘देव’ नावाच्या संस्थेशी ‘कनेक्ट’ ठेवतात. देव-धर्म वजा केले तर माणसाच्या आयुष्यात पोकळी निर्माण होईल. एकदा गंमत म्हणून ‘कालनिर्णय’ उघडा. प्रत्येक तारीख नीट वाचा. तुम्ही अवाक व्हाल. त्या प्रत्येक चौकोनात या देशातल्या धार्मिक लोकांसाठी काही ना काही उद्योग लावून दिलेला आहे. कुठल्यातरी गावात जत्रा असेल, कुणा महात्म्याची जयंती-पुण्यतिथी, नाना उपवास, आणि अगदीच काही नाही तर चंद्र-सूर्य या ना त्या नक्षत्रात प्रवेश घेत असतील. या सर्व चौकोनात दिलेली व्रतवैकल्ये (डोळे झाकून) करणारी घरे आणि त्यातील माणसे मला माहीत आहेत. त्या व्रतवैकल्यांमधील ‘खरं देवपण’ कॅलेंडरच्या चौकटीच्या बाहेर कधीतरी सांडेल का ?माणूस सुखी होईल का?

आजपासून वीस-तीस वर्षांनी आपल्या घरांमध्ये ही सर्व व्रतवैकल्ये इतक्याच आत्मीयतेने पाळली जातील का? मला नेहमी प्रश्न पडतो. कदाचित, काही वर्षांनी ‘कालनिर्णय’ आणि तत्सम कॅलेंडर कंपन्यांना नव्या पिढीची गरज ओळखून बदलावं लागेल. ज्या पिढीला ‘एकादशी’ म्हणजे काय हे माहित नसेल त्यांना ‘अपरा एकदशी’ कशी कळेल? ‘ओला’ आणि ‘उबर’च्या जमान्यात सूर्याचे वाहन उंदीर आहे की हत्त्ती आहे याने काय फरक पडेल? वीस पंचवीस वर्षांनी ‘कालनिर्णय’ मध्ये अमुक तारखेला ‘फेसबुक स्थापना दिन’, फादर्स डे, बिग बझार मेगा ऑफर डे..वगैरे दिसलं तर फार आश्चर्य वाटायची गरज नाही. पूर्वीच्या काळातली सोवळीओवळी आणि त्यातला तो कर्मठपणा जसा कमी झाला तशी हळूहळू घरातल्या देवाचं आणि पर्यायाने त्या देवघराचं महत्व कमी होईल का? Don’t get me wrong ! या नव्या पिढीच्या घरातून ‘देवघर’ कधीच वजा होणार नाही. मात्र व्रत वैकल्यांसाठी घ्यावे लागणारे परिश्रम, उत्साह, द्यावा लागणारा वेळ आणि शरीराला कष्ट यातलं या नव्या पिढीला काहीही द्यायचं नाही. कारण दाण्याची आमटी आणि साबुदाणा खिचडी खाऊन उपास करणारी आपली पिढी ते घरात रोज पाहत आहेत. यातील ‘फॉर्म ओव्हर सबस्टन्स’ या नव्या पिढीने बरोब्बर जोखलाय. ते कमी म्हणून की काय, सोशल मिडिया त्यात तेल ओतण्याचं काम करत्ये. नव्या पिढीच्या दृष्टीने प्रजासत्ताकदिन, अंगारकी चतुर्थी, नागपंचमी, फादर्स डे, भारताने मॅच जिंकल्याचा दिवस, गटारी अमावस्या हे सगळं एकाच पातळीवर आहे. जगात काही घडो, त्याचं ‘स्टेटस’ अपडेट करायला कंटेंट मिळाला पाहिजे ! हे एकदा लक्षात घेतलं की सोशल मिडीयावर ‘वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !’ असं वाचल्यावर फार धक्का बसणार नाही.

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. मी अशा काही घरांमध्ये गेलोय की ज्या घराचा उंबरठा ओलांडून आत गेल्या गेल्या ‘छान’ वाटतं. ते केवळ घराच्या सजावटीमुळे किंवा स्वच्छतेमुळे नसतं. ते ‘छान वाटणं’ त्या घरात राहणाऱ्या आनंदी व प्रसन्न माणसांमुळे असतं. इथे रोजच्या पुजेइतकंच महत्व त्या घरातल्या लहानापासून प्रत्येक मोठ्या व्यक्तीला दिलं जातं. इथे उपास कोणाचे आहेत यापेक्षा घरात काम करणारी गडी माणसं जेवली का, याची विचारणा होते. यज्ञ, अभिषेक, नैवेद्य यापेक्षा सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने मदत केली जाते. अशा घरांत देवघरासाठी वेगळ्या जागेची गरज नसते. ते घरच देव-घर होऊन जातं.

या निमित्ताने एक घटना आठवली. ती सांगतो आणि थांबतो. अहमदनगरला आमचा एक मित्र नितेश बनसोडे ‘सावली’ नावाची संस्था चालवतो. सुमारे पन्नास मुलांना दत्तक घेतलंय त्याने. या संस्थेला मदत करण्यासाठी एक सधन मारवाडी कुटुंब आलं होतं. दुर्दैवाने त्या कुटुंबातला एक मुलगा नुसता मतीमंद नव्हता तर ‘व्हेजिटेबल’ अवस्थेत होता. दया येऊन आम्ही त्या मुलाबद्दल चौकशी केली. त्या मुलाचे वडील म्हणाले, ‘आमचा हा मुलगा आता पंधरा वर्षांचा आहे. यापुढे हा बरा होणार नाही, हे आम्हाला कळल्यावर पायाखालची जमीन सरकली. जणू आमचं सगळं घरच मोडून पडलं. यातून आधी मी स्वतः सावरलो. नंतर घरच्या सर्व लोकांना एकत्र केलं. घरातले आम्ही सगळेच कमालीचे देवभक्त आहोत. मी घरच्यांना सांगितलं, असं समजा, आपल्या घरात देव जन्माला आलाय. स्वतःला भाग्यवान समजा की आपल्याला प्रत्यक्ष देवाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. सुदैवाने घरातल्यांनी माझं ऐकलं. त्या दिवसापासून या घराचा आमच्या मुलाकडे पाहायचा दृष्टीकोन बदलून गेला. आता आम्ही सगळे मिळून आमच्या घरातल्या ‘या’ देवाची सेवा करतो.’

या घटनेला खूप वर्ष लोटली. ही घटना घडली तो दिवस होता १० सप्टेंबर. आठवण म्हणून, त्यावर्षीच्या ‘कालनिर्णय’ मधला १० सप्टेंबरचा तो चौकोन काढून माझ्या डायरीत चिकटवून ठेवलाय. अधूनमधून डायरी चाळताना तो चौकोन दिसतो. मग तो मुलगा आठवतो. त्याहीपेक्षा, त्याचे ते हसतमुख वडील आठवतात.

‘कालनिर्णय’मधल्या तीनशे पासष्ट चौकोनातल्या सर्व व्रतांचे पुण्य माझ्या डायरीतल्या त्या एका चौकोनात आहे.

नविन अनिल काळे



Saturday, August 23, 2014

मनाचं व्यवस्थापन

आपण सगळेचजण आज एका गतिमान युगाला सामोरे जात आहोत. त्यामुळे सर्वांच्याच मनावर कायम कसलं ना कसलं टेन्शन असतं. आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न कुणीही पहावं, पण ते पाहत असताना स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवली पाहिजे. त्यानुसारच तुम्ही पावलं उचलायला हवीत.

मानवी मन हा अगदी प्राचीन काळापासून सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. डोळ्याला न दिसणारे, तरीही माणसांचे भावविश्व ढवळून काढणारे मन आजही संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या चिंतनाचा विषय बनून राहिले आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने या मनाची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्यवस्थापन हा शब्द परवलीचा झाला आहे. कौटुंबिक व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापन, भावनिक व्यवस्थापन या गोष्टी मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. माणसाचे जीवन सुखी, समृद्धी, आनंदी, प्रकाशमय, चिंतारहित आणि उत्साही राहायचे असेल, तर मनाच्या व्यवस्थापनकडेही गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

आपण सारेच आज एका गतिमान युगाला सामोरे जात आहोत. अस्तित्वासाठीचा संघर्ष तीव्र झालेला आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनावर ताण आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांचीही या ताणातून सुटका झालेली नाही. माणसांनी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न जरूर पाहायला हवे; पण ते पाहत असताना स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवून पावले उचलायला हवीत. कशासाठी धावायचे, किती धावायचे या गोष्टी स्वतःला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. ऐश्वर्यसंपन्न आणि सुखी, समृद्ध जीवनासाठी करावी लागणारी यातायात तितकीच महत्त्वाची आहे; पण त्या पलिकडे जाऊन जगणे नावाची जी गोष्ट आहे, तिचाही अर्थ उमगला पाहिजे. वस्तूंमध्ये सुख शोधता आले असते, तर या जगात कोणीच दुःखी राहिले नसते.

आपल्या जगण्याची व्याख्या प्रत्येकाला स्पष्ट करता आली, तर मनाच्या योग्य व्यवस्थापनाच्या दिशेने उचललेले ते पहिले महत्त्वाचे पाऊल असेल. दुसऱ्याशी तुलना न करता मी जगणार, ते या पद्धतीने, ही गोष्ट एकदा स्पष्ट झाली, की माणसाच्या मनावरचे खूप ताण कमी होतात. तो अधिक मोकळा होतो. त्यामुळे अशी माणसे आवडीची कामे खूप उत्साहाने करतात. आयुष्याचा प्याला भरलेला आहे, की रिकामा आहे, याचा विचार करण्यापेक्षा जीवन प्याल्यात असणारा प्रत्येक थेंब शोषून घेण्याची उत्कंठा असणारे निरोगी मन आपण तयार करायला हवे.

मनाच्या व्यवस्थापनातील दुसरी पायरी म्हणजे आपले प्राधान्यक्रम ठरवणे. हे अत्यंत तातडीचे, हे नंतर करता येण्यासारखे, हे काही कालावधीनंतर केले, तरी चालण्यासारखे, हे करण्याची आवश्यकताच नाही, अशा चार प्रकारांत महत्त्वपूर्ण कामांची विभागणी केली, की कामाची दिशा स्पष्ट होते. कोणत्या गोष्टी अगोदर करायच्या, कोणत्या नंतर, याचे ठोकताळे बांधता येतात. त्यानुसार मनात विचारचक्रे सुरू राहून निर्णय घेता येतात. हे सारे करीत असताना नेहमी ठरविल्याप्रमाणे घडेल, असे नाही. आयुष्यात वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट एक अनुभव म्हणून स्वीकारण्याची मानसिकता तयार केली, की संकटात आणि कठीण प्रसंगातही माणसांचे मनोधैर्य खचत नाही.

अनेकदा आपल्या बोलण्याचा सूर असा असतो, की मनात आणले, तर मी काहीही करू शकतो. मनात आणले, तर असाध्य ते साध्य होऊ शकते. एवढी कसली ताकद या मनात आहे? मनाच्या सागरात भावनांच्या आणि विचारांच्या असंख्य लाटा उसळत असतात. हे विचार चांगले असतील, तर व्यक्ती चांगले कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत असतात. आपण ज्या पद्धतीने विचार करतो, त्यानुसार आपली बुद्धी आणि कर्मेंद्रिये कार्य करीत असतात. त्यामुळे मनात नेहमी सकारात्मक विचारांची आरास मांडली पाहिजे.

कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी ते मनःपूर्वक करावे लागते. एखाद्या कार्यासाठी सिद्ध होताना मनाची संपूर्ण तयारी हा मनाच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा भाग आहे. जसे शरीर थकते, तसे मनही थकत असते. नुसत्या झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळू शकते; पण झोपेतही मन जागेच असते. मनाची विश्रांती अनेक गोष्टींतून साधता येते. बहरलेले वृक्ष, खळाळणारे जलप्रवाह, निसर्गातील नानाविध रंगांची उधळण आणि पशुपक्ष्यांच्या दर्शनानेही मन प्रसन्न होऊ शकते, त्याला विश्रांतीही मिळते. आहारातून मिळणारी जीवनसत्वे शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असतात. केवळ अन्नातून मिळणारी जीवनसत्वे जीवनासाठी पुरेशी नसतात. ती चांगल्या विचारातून, पुस्तकातून, कलेच्या आस्वादातून, जोपासलेल्या छंदातून, मनमुराद गप्पांतून, मनसोक्त केलेल्या पर्यटनातून आणि कामात केलेल्या बदलातूनही मिळत असतात. अशा सत्वांवरच मनाचे भरण-पोषण होत असते. त्यासाठी मनाला कधी मुंगी, तर कधी पाखरू होता आले पाहिजे. यशस्वी मन व्यवस्थापनाचा तो एक महत्त्वाचा भाग असतो.

आजच्या बदलत्या जीवनशैलीत सुंदर दिसणे, उंची कपडे, महागडे दागदागिने, सुगंधी द्रव्ये हा आपल्या कौतुकाचा विषय असतो; पण आपली बुद्धी ज्याच्या आदेशाने पालन करते, त्या मनाच्या सौंदर्याकडे, सुदृढतेकडे आपण किती गांभीर्याने पाहतो, हा खरा प्रश्न आहे. मन हा अक्षय प्रेरणास्त्रोत आहे. तो अखंड प्रज्ज्वलित राहावा, यासाठी मनावर आलेले अविचारांचे, निराशेचे आणि अगतिकतेचे सावट दूर करायला हवे. म्हणूनच मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।। हा मंत्र लक्षात ठेवायला हवा.

पोळा आठवणीतला

बैलपोळ्याचा दिवस उगवला की, माझं मन गोळा होऊन, गाववेशीतून फिरून येतं. बसल्या बसल्या गावच्या आठवणी काढतं. लहानपणाच्या, शाळकरी वयातल्या गाईगुरं चारण्याच्या आठवणी, मनात रुंजी घालतात. त्यावेळचा काळच वेगळा होता. मृगाचा पाऊस हमखास पडायचा. शेतकरी आपल्या गाई-गुरांसह स्वतःला पावसात भिजवून घ्यायचा. उन्हात नांगरून, वखरून पडलेली जमीन भिजायची. पडणाऱ्या पावसात ती खोलवर अंग भिजवून घ्यायची. शिवारातली झाडं, झुडपं वेली- गवताच्या हिरवाईनं सारं वातावरणं नटलेलं असायचं. आनंदित झालेला शेतकरीराजा बैलजोडी घेऊन शेतावर जायचा, मशागत करायचा. भुसभुशीत जमिनीत बी-बियाण्यांची तो पेरणी करायचा.

पेरणी झाली की, प्रसन्न होत शेतकरीराजा उगवून आलेल्या हिरव्या निळ्या पिकांचं संगोपन करायचा. निंदनी, खुरपणी, कोळपणी करून त्याला उसंत मिळायची. घरच्या लक्ष्मीला अर्थात शेतकऱ्याच्या बायकोला माहेरची ओढ लागायची. नागपंचमीचा सण ऐन हिरवाईत यायचा. शेतकऱ्याचा मित्र साप, त्याची गावात मनोभावे पूजा व्हायची. नाच गाणं व्हायचं. माहेरवाशिणी शिवारानं पांघरलेल्या हिरव्या दुलईच्या साथीनं झोके घ्यायच्या. नारळी पौर्णिमा त्यांच्या मनात रक्षाबंधनाची साद घालायची. शेतकऱ्याला पोळ्याच्या सणाची चाहूल लागायची. तो प्रफुल्लित व्हायचा. रक्षाबंधनाची आठवण घेऊन शेतकरी राजाबरोबर घरातील स्त्री शेतीच्या कामात गुंतायची. शेतकऱ्याचा आनंद आता वाऱ्यावर डोलणारं पीक पाहून गगनात मावत नसायचा. या आनंदाच्या वातावरणातच पोळ्याच्या सणाची तो उत्साहाने तयारी करायचा.  
 
पोळ्याच्या दिवशी पहाटेची मोठी चांदणी मावळते न मावळते, तोच तो उठायचा. बैलजोडीसह शेतावर जायचा. बारा महिने शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी विश्रांती असते. ओला चारा वैरण बैलांना घातली जायची. बांधावरील ओल्या हिरव्या टवटवीत गवतावर बैलांना चरू दिलं जायचं. चरून तट्ट झालेले बैलं हुंदडायचे, मस्तवायचे, उंचवटा पाहून शिंगांनी माती उकरायचे. नंतर शेतकरी नदीनाल्याच्या नितळ पाण्यात त्यांना आंघोळ घालायचा. बैलांचं शरीर घासून काढायचा. त्यांची व त्याची अंघोळ झाली की बैलांना सजवायला घ्यायचा. खुरं चकाचक करायचा. बैलांचे खांदे ढोपर तेल लावून मालिश करायचा. गेरू लावून जखमांना थंडावा द्यायचा. शिंगं साळून लाल-पिवळ्या गुलाबी रंगाचा हिंगुळ लावून त्यावर बेगड चिकटवायचा. चमचमणारी शिंगं खुलून दिसायची. शिंगांवर छंबीगोंडा, चेहऱ्यावर म्होरकी, गळ्यात घुंगरू, नाकात नवी वेसण, अंगावर झूल, उघड्या अंगावर रंगीबेरंगी ठिपके. गोंड्याची शेपटी असा सजलेला बैल गाववेशीत आणला जायचा. असा सजलेला बैल इतरांना पाहून नखरायचा. आपल्या धन्याला जिभेनं चाटून सांगायचा, ‘धनी सगळ्यात भारी आहे मी.’ दोघं हर्षित व्हायचे!

गाववेशीतून बैलपोळा फुटला की देवळासमोर दर्शन घेऊन. देवाला सलामी देऊन. पूर्ण गावभर मिरवून बैलं घरी आणले जायचे. घरधनीन बैलांना ओवाळून त्यांना हळदी-कुंकू लावून त्याची मनोभावे पूजा करायची. ‘अशीच साथ दे माझ्या धन्याला, बरकत येऊ दे सालोसाल, बळीचं राज्य होऊ दे.’ अशी प्रार्थना ती करत असे. पुरणपोळीचा घास भरवून, सुपातलं धान्य त्याला चारून, पायांवर पाणी वाहायची. नारळ फोडून प्रसाद वाटला जायचा. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा उपवास असायचा. गोठ्यात बैलांना चारावैरण करून गोडघोड खाऊन मगच तो उपवास सोडायचा..!

आज गाववेशीतून बैलपोळ्याच्या दिवशी कुणाला मिरवायचं? खापराचे मांडे, पुरणपोळी कोणी बनवायची? हे करणाऱ्या महिलाही आता राहिल्या नाहीत. बैलं तरी आहेत का मिरवायला? बैलांचा आनंदानं सांभाळ करणारे किती शेतकरी उरले आहेत? पिठोरी अमावास्या म्हणजे बैलपोळ्याचा दिवस. मी मनाच्या वेशीत उभा आहे बैलपोळ्याच्या आठवणी जागवत...!

Saturday, November 2, 2013

आयुष्याची संध्याकाळ 

संसाराच्या रहाटगाड्यात 
तारुण्य हरवल्याचे कळलेच नाही, 
वृद्धापकाळाच्या वाटेने जाणारे पाऊल 
तारुण्याकडे परत फिरलेच नाही...। 
माझंच रक्त होऊ लागलं होतं 
माझ्यापासून आता विभक्त, 
आदर आणि नातं केवळ 
नावारूपाला उरले फक्त...।। 
एकेकाळचा तो थाट-माट 
हसतो आज आमच्यावरी, 
रक्तानेच वाळीत टाकलं 
का रुसावे जगावरी...।। 
जीर्ण शरीराला मनही विटले 
विटला आता सारा परिवार, 
आयुष्याच्या या विदारक सत्याला 
कोण कसे नाकारणार...।। 
मानवाच्या स्वार्थीपणाची 
आज सांगतो तुम्हाला गंमत, 
अहो, चलती असे तोवरच 
माणसाला असते किंमत...।। 

Monday, August 6, 2012

इक बूँद कभी पानी की..

PrintE-mail
पाऊस! कधी आर्त, वाट पाहावयास लावणारा, कधी भर पावसात तन-मनाची होरपळ करणारा, कधी सारे भेद, सारे अंतर मिटवून अंतर्बाह्य़ भिजवून टाकणारा. मनाची ओल आणि मनाचा शुष्कपणा गुलजारांच्या गीतांतील पावसात प्रतीत होत जातो. त्यांच्या गीतांतील भाव मनाच्या सरोवरात अर्थाच्या थेंबांप्रमाणे पडतात आणि मग तरंगावर तरंग उमटत जातात अन् आपल्या भावविश्वाचा सारा तळ ढवळून निघतो.
‘छोटी सी कहानी से
बारिशों की पानी से
सारी वादी भर गयी..’
गुलजारांचा ‘इजाजत’ हा एक अलवार, भावगर्भित ‘काव्यपट’! त्यातील हे एक गीत! या चित्रपटाची सुरुवात बेभान कोसळणाऱ्या पावसात विरणाऱ्या डोंगर, दऱ्या आणि झाडे यांच्या दृश्याने होते. पाश्र्वभूमीवर आशाताईंच्या आवाजातील चिंब गाणे.. ‘छोटीसी कहानी से’..
रंग-रूपाचे सारे भेद मिटवून टाकणारा, साऱ्या सृष्टीला अंतर्बाह्य़ भिजवून, तिला नवनीत करणारा पाऊस गुलजारांच्या गीतांतून नित्य भेटत राहतो.
मुळात गुलजार हे भावकवी! मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म भाव-भावना व्यक्त करताना ते निसर्गघटकांचा प्रतिमा व प्रतीके म्हणून आपसूकच वापर करतात. दूर जाणाऱ्या वाटा, वळणे, झाडांच्या निष्पर्ण फांद्या, एकाकी डोंगरमाथा, सुकलेले पिवळे पान, त्याचा तुटून, गळून पडल्याचा आवाज, दऱ्या-खोऱ्यांत गुंजणारी शून्य शांतता, पिवळसर ग्लान चंद्र.. असे सारे काही त्यांच्या कवितांमध्ये, गाण्यांमध्ये डोकावत असते. त्यातही प्रामुख्याने येतो तो म्हणजे पाऊस.
पाऊस! कधी बेभान कोसळणारा. कधी सरत्या थेंबांचा. गुलजारांचा पाऊस ‘माणूसपण’ लेवून येतो. मानवी मनाचे असतात तसे त्याचेही विभ्रम असतात. गुलजारांचा पाऊस एखाद्या कवीच्या हळव्या मूड्ससारखाच. हा पाऊस कधी आर्त, वाट पाहावयास लावणारा, कधी भर पावसात तन-मनाची होरपळ करणारा, कधी सारे भेद, सारे अंतर मिटवून अंतर्बाह्य़ भिजवून टाकणारा. मनाची ओल आणि मनाचा शुष्कपणा गुलजारांच्या गीतांतील पावसात प्रतीत होत जातो. त्यांच्या गीतांतील भाव मनाच्या सरोवरात अर्थाच्या थेंबांप्रमाणे पडतात आणि मग तरंगावर तरंग उमटत जातात अन् आपल्या भावविश्वाचा सारा तळ ढवळून निघतो.
गुलजारांचा पाऊस स-रूप आहे. रंग, रूप, नादासकट तो गीतातून प्रकट होत जातो..
‘शाखों पे पत्ते थे
पत्तों पे बूंदे थी
बूंदों में पानी था..’
अशी शब्दप्रतिमा समोर उभी राहत असतानाच पावसाचा अन् नायिकेचा मूड लेवून पुढली ओळ येते..
‘पानी में आंसू थे..’
दाटल्या आभाळात वीज चमकून जावी तशी मनात कसलीशी एक कळ उमटते. अर्थात, गुलजारांचा पाऊस संवेदना ल्यालेला. नायिकेच्या मनात दडलेलं बाल्य पुढच्या ओळीत उमटून जातं..
‘रुकती है, थमती है, कभी बरसती है
बादल पे पांव रखे, बारिश मचलती है’
पावसाचे सगुण रूप दाखविताना गुलजार दुसऱ्या एका गाण्यात म्हणतात-
‘मोती मोती बिखर रहा है गगन
पानी पानी है, सब पिघलने दो
मेंहा बरसने लगा है आज की रात
आज की रात मेंहा बरसने दो..’
सारे काही शुष्क, कोरडे असते. मातीच्या तळव्याला भेगा पडतात. कोरडे डोळे कोरडय़ा आभाळाकडे लागतात, तेव्हा गुलजार पावसाची आळवणी करतात..
‘अल्ला मेघ दे, पानी दे
पानी दे, गुडधानी दे..’
तरी पाऊस कोसळत नाही, तेव्हा जगण्याची सामूहिक तहान गुलजार मांडून जातात..
‘मछली मर गई
नदिया सुखी
नदिया सुखी
फ़ाके पड गए
फ़ाके पड गए
बुढिया भूखी
कौन बचाए
बादल आए..’
मानवी नाते हा गुलजारांना भावणारा, खुणावणारा, खरं तर झपाटून टाकणारा विषय! मानवी मनाचे असे नाते त्याच्या साऱ्या गहिऱ्या छटांसह त्यांच्या गीतांतून, कवितांमधून प्रतिबिंबित होत असते. मानवी मन तरी किती सूक्ष्म; चिमटीत मावणार नाही इतके. आणि विशाल तर इतके, की काळाच्याही बाहुपाशात मावू नये. मानवी मनाची आंदोलने व्यक्त करण्यासाठी कुठल्याही कवीला अलवार असा पाऊस हवाच असतो. मानवी मनाच्या असतात तशाच पावसाच्याही छटा असतातच.. असंख्य, अनंत!
गुलजारांच्या नायिकेचे भावविश्व, तिचे मन कायमच पावसाच्या खेळाशी बांधले गेलेले आहे. तो तिचा सखा आहे, तसाच वैरीही! तिचे भावविश्व उलगडताना कवी पावसाच्या प्रतिमांचा सहज वापर करून जातो.
‘झिर झिर बरसे सावनी अखियाँ
साँवरिया घर आ..’
पावसाने यावे. नक्की यावे, पण एकटय़ाने येऊ नये. सोबत प्रियकरालाही घेऊन यावे. पाऊस आला, पण ‘तो’ नसेल तर पावसाच्या येण्याला अर्थ तो काय?
‘तेरे संग सब रंग बसंती
तुझ बिन सब सुखा..’
येथे पाऊस कोसळतोय अन् जीवलग कुठेतरी दूर दूर. तेव्हा ती म्हणते-
‘इक घन बरसे, इक मन प्यासा
इक मन प्यासा, इक मन तरसे..’
इथला पाऊस त्याच्या गावी जावा अन् त्याने तिच्या मनाची तगमग जीवलगाला सांगावी म्हणून ती म्हणते-
‘पलकों पर इक बूँद सजाए
बैठी हूँ सावन ले जाए
जाए, पी के देश में बरसें
इक मन प्यासा, इक मन तरसे..’
तसे पाहिले तर मनाचे अन् आभाळाचे नाते अनोखे! दोघेही वेळी-अवेळी दाटून येतात अन् वेळी-अवेळी बरसतात.
पावसाच्या रूपात गुलजार अगदी सहजच प्रणयाचे संसूचन करून जातात..
‘पत्ते-पत्ते पर बूँदे बरसेगी
डाली-डाली पर झुमेगा सावन
प्यासें होंठो को चूमेगी बारिश
आज आंखों में फूलेगा सावन’
पावसात त्या दोघांचे एकाच छत्रीत भटकणे त्या वेळी कितीही सुखावून गेलेले असले तरी आज दुरावलेल्या विरही अवस्थेत मात्र त्याची आठवण उदास करून जाते..
‘एक अकेली छतरी में जब
आधे-आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गीले
सूखा तो मैं ले आई थी
गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..’
जीव पिळवटून टाकणारी अशीही वाटणी! भिजलेले अंग कधीच कोरडे होऊन जाते, पण भिजल्या मनाचे काय?
पाऊस अन् विरहाचा पारंपरिक संबंध गुलजारांच्या गीतांतून ठायी ठायी येतो..
‘अब के ना सावन बरसे
अब के बरस तो बरसेगी अंखियाँ..’
किंवा
‘सावन में बरखा सताए
पल पल, छिन छिन बरसे
तेरे लिए मन तरसे..’
अर्थात जेव्हा पाऊस नसतो, तेव्हाही आसवे असतात. आकाश दाटून येवो- ना येवो; मन कळत-नकळत दाटून येते. डोळे पाझरू लागतात.
‘दो नैनों मैं आँसू भरे है
निंदिया कैसे समाए..’
गुलजारांच्या गाण्यांमध्ये नॉस्टेल्जिक मूड असतोच. खोल दऱ्यांतील पावसाळी धुक्यासारखा!
‘पानी-पानी इन पहाडों की ढलानों से उतर जाना
धुआँ-धुआँ कुछ वादियाँ भी आएँगी, गुजर जाना
इक गाँव आएगा, मेरा घर आएगा
जा मेरे घर जा, नींदे खाली कर जा
पानी, पानी रे..’
कधी आकाश भरून येते, पण बरसून मोकळे होत नाही. तसेच कधी कधी मनाचे होते. एक अपरंपार सैरभैरपण वाऱ्यासारखे मनात घोंघावत राहते.
‘दिल हुम हुम करें घबराए
घन धम धम करे डर जाए
इक बूँद कभी पानी की
मोरी अँखियों से बरसाए..’
अन् अवचित जर जीवलग आला, तर सारे काही तरारून येते, मोहरून उठते..
‘तेरी झोरी डारूँ
सब सूखे पात जो आए
तेरा छूआ लागे
मोरी सूखी डाल हरियाए..’
असा हा पाऊस आणि गुलजारांची पाऊस-गीते! अंतरीचा भाव व्यक्त करतानाच अंतरीचा ठाव घेणारी! असं एखादं गाणं कानी पडलं की, ‘बारिशों की पानी से’ मनाची ‘सारी वादी’ भरून जाते. मन अंतर्बाह्य़ भिजून चिंब होते. मग खिडकीबाहेर पाऊस बरसो वा न बरसो..
 

पाऊस

पाऊसPrintE-mail
अरुणा ढेरे ,रविवार,५ ऑगस्ट २०१२ 
वेडावल्यागत धिंगाणा घालणारा पिसाट पाऊस.. 
दाही दिशा झडीनं गारठून, हुडहुडत पाय पोटाशी घेत आक्रसलेल्या.. 
धरतीच्या अंगात जणू देवचार संचारलेला.. 
ती अनिवार, अर्निबध 
स्वत:शीच घुमतेय.. 
कोसळत्या पाऊसधारांचा धुकट, तलम पडदा सर्वागी लपेटून मिचमिच्या डोळ्यांनी झाडं, रान, वाटा तृप्तीनं जडावल्यात.. 
पण पोटपाणी कुणाला चुकलंय, म्हणताना गुरांना घेऊन रानाची वाट धरलेला एकट गुराखी.. 
कच्च ओलाचिंब.. 
डोईवर कांबळ्याची खोळ.. 
या पाऊसखाईत 
गुरं राखायचं म्हणजे..! 
वाटेवरच्या खळाळ पाण्यात तडतडणाऱ्या सरींच्या अगणित भिंगऱ्यांनी सूरमयी लयीत 
ताल धरलेला.. 
मनही ओलंचिंब..
रुंजी घालणाऱ्या अलवार, ओलेत्या आठवणींनी..   
चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या या ओल्याकंच चित्रासारखं.
पाऊस सुरू व्हायचा तेव्हा शाळाही नुकती सुरू झालेली असायची. नवा वर्ग, नव्या बाई हव्या तर असायच्या; पण हवा असायचा मन ओढून घेणारा पाऊसही. अंगणातल्या मातीवर थेंबांचे गोल उमटत राहायचे. मग हळूहळू सगळं तुडुंब तळंच व्हायचं. कडेनं लावलेल्या हजारी मोगऱ्याच्या रुंद पानांवर आणि जाईच्या लांबसर कळ्यांवर पाऊस सडसडत राहायचा. शाळा सुटून छत्रीतून अर्धे भिजत घरी येईतो संध्याकाळ झालेली असायची. नदी घरामागेच. तिचं पाणी दिवसागणिक वाढत असायचं. हळूहळू घरी यायचं ते पुराचं पाणी पाहतच. दोन्हीकडच्या घाटांवरून पाणी थेट वाडय़ाच्या दारापर्यंत यायचं.
मग रात्री उशिरापर्यंत घरी जुन्या आठवणी काढत मोठी माणसं जागत, गप्पा करत असायची. आठवणी गावाकडच्या पावसाच्या, पावसात चुकलेल्या गुरांच्या, हलाखीच्या दिवसांत तग धरून राहिल्याच्या, गमावलेल्या माणसांच्या असण्याच्या-नसण्याच्या, पानशेतनं गिळून टाकलेल्या चार काडय़ांच्या संसाराच्या.. कधीतरी ते बोलणं ऐकता ऐकताच झोप लागायची. आणि पहाटे पहाटे बाहेरच्या पावसाची लय धरून आई-आत्यांच्या दळणाच्या ओव्या ऐकत जाग यायची तेव्हा त्या गाण्याला जी एक उदास करणारी गलबल असायची, तिचा अर्थ कळतो आहेसं वाटायचं.
पूर पाहायला जाऊ नये असं तेव्हा त्या दोघी आम्हाला सारखं बजावत असायच्या. ‘अगं, बाई आहे ती नदी म्हणजे! नाही जाऊ पाण्याच्या पहिल्या भराच्या वेळी..’ त्या म्हणायच्या.
झाडं झराडती, इजा कराडती
धरणीबाई गं, आला आला तुझा पती
अशी ओवी मी पुढे.. पुष्कळ पुढे ऐकली, तेव्हा त्या वेळी आई-आत्यांच्या तोंडची नदीची ओवी मला सहज उमगली. त्यांच्यासाठी धरणीबाई आणि नदीबाई- दोन्ही बायकाच आणि एकरूपच. त्या म्हणायच्या-
नदीला आला पूर, नका जाऊ पाह्य़ा
तिच्या गं शेजेवर आलासे मेघराया
जमिनीला काय किंवा नदीला काय, पावसाची कशी विलक्षण ओढ जडली आहे, हे कळायला मधे बरीच र्वष गेली. त्या वर्षांवर पाऊस बरसत राहिला होता. म्हणून पुष्कळ काही कविता म्हणून उगवूनही येत राहिलं.

एकदा मी आणि शांताबाई शेळके- आम्ही चिपळूणला निघालो होतो. ऑगस्टमधली व्याख्यानमाला. पाऊस सगळ्या वाटेवर गडद भरून राहिलेला. आम्हाला ‘मेघदूता’ची आठवण झाली. बारहमासा, चौमासासारख्या पारंपरिक गाण्याच्या प्रकाराला कवीनं- एखाद्या अभिजात प्रतिभावंत कवीनं स्पर्श केला की काय अनोखं निर्माण होऊ शकतं ते ‘मेघदूता’त पाहावं. शांताबाईंचा काळ ‘मेघदूता’च्या प्रेमात पडलेल्या कवींचा. तोपर्यंत बोरकर, कुसुमाग्रज, बापट- कितीकांनी ‘मेघदूता’ला मराठीत आणलेलं. पुढे शांताबाईंनीही आणलंच.
आम्ही साऱ्या प्रवासभर ‘मेघदूत’ आठवत, म्हणत गेलो. धूर, पाणी, वीज आणि वारा यांनी बनलेला तो- म्हटलं तर अर्थहीन आकार! आणि कालिदासानं आपल्या प्रतिभास्पर्शानं त्याला दिलेलं चैतन्यमय रूप- कविता म्हणजे तरी दुसरं काय असतं? वेगवेगळ्या पोतांचे, जातींचे, आकार-प्रकारांचे निर्जीव शब्द आणि कवीनं रसद्रव्यांनी भरून त्या शब्दांना आणलेलं जिवंतपण.. त्यांच्यातून उगवून आणलेले चैतन्याचे कोंब! त्या पावसानं ओथंबलेल्या ओल्या प्रवासात मला कवितेचं जणू रूपरहस्यच कळून आलं.
परत येताना वरंधा घाटात पाऊस इतका बेभान कोसळत होता, की थांबलोच. डोंगरकडय़ांवरून प्रचंड गर्जना करत पाण्याचे लोट खाली धावत निघालेले. दरीत ढगांची गर्दी. वर मुजोर पावसाचे सपकारे. त्या पावसाचा आवेग जबरदस्त होता. खिळवून टाकणारी ती उग्रता अवाक् करणारी होती. विजेची एक रेघ अशी लखलखून उमटली, की अर्थशून्यतेचा प्रचंड गोल तडकला आणि पंचमहाभूतांच्या शक्तीचं अद्भुत एखाद्या दिव्य भासासारखं दिसून गेलं.

आंध्रात होतो. वडिलांच्या संशोधनाच्या निमित्तानं प्रवास करत होतो. एका अपरिचित घाटमाथ्यावर पोचलो आणि पाऊस असा कोसळला, की मागचे-पुढचे रस्ते त्यानं बंदच करून टाकले.
त्या रात्री एका अनोळखी घरात- पुरुषमाणूस बाहेरगावी असतानाही आम्हाला रात्रभराचा आसरा मिळाला. साधं, गरम कढीभाताचं जेवण मिळालं. आम्हाला त्यांची भाषा अवगत नव्हती आणि आमची भाषा त्या घरातल्या म्हातारीला आणि तिच्या जवळच्या तरुण मुलीला समजत नव्हती. पण तसं तरी कसं म्हणावं? बाहेर तुफान कोसळणाऱ्या पावसानं आमची असहायता (पान १ वरून) त्यांना समजावली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पाणी ओसरलेलं पाहून आम्ही पुढे निघालो तेव्हा किंचित भुरभुरत्या पावसात त्या घरातली म्हातारी आम्हाला हसतमुखानं निरोप देत दाराशी आली होती. सत्य कवितेबाहेर पडलं होतं आणि आमच्यासाठी हात हलवून आशीर्वाद देत होतं.

एका भल्याथोरल्या उद्यानातून फिरत होते. कितीतरी प्राणी आणि पक्षी पिंजऱ्यांमधून ठेवलेले. पाऊस येणार असं वाटत होतं; पण आला नव्हता. सगळीकडून निळसर अंधाराचा झाकोळ आलेला. सूर्य हिऱ्यांच्या करंडय़ात ठेवल्यासारखा आणि त्याच्या उजेडाला सगळीकडून मेघांचा सावळा संभार रोखून धरत असलेला. अचानक समोर आला तो पिंजऱ्यातला पांढरा मोर. आपलं एकूण एक पीस फुलवून तो धुंद थरथरत होता. सगळ्या पिसाऱ्यात एक नाजूक लहर सळसळत असल्यासारखं वाटत होतं. तरलता ही खरं तर सारखी निसटणारी गोष्ट; पण त्या क्षणी तिथे ती त्या मोराच्या अवघ्या देहात उमटून होती.
पाहताना डोळ्यांत एकदम पाणीच आलं. वाटलं, की भोवतालाच्या बंधनांचा, कुरूपतेचा, दुखाचा, निर्थकतेचा, जडतेचा विसर पाडणारी एखादी उत्कट हाक असते. कवीला ती ऐकू यावी लागते. मग बाकी सगळं नाहीसं होऊ शकतं. उरतो तो फक्त ओथंबलेपणा, ती हाक आणि ती तरलतेची थरथर.
जीवनाचा अर्थ फक्त ‘असणे’ एवढा थोडाच आहे?

पाऊस आता आवडीनिवडीच्या पलीकडेच असतो. ज्याच्यावाचून जगण्याला जगणं म्हणता येत नाही, असा. ज्याच्यावाचून संपूर्ण होण्याचं स्वप्न पाहता येत नाही, असा. कथेतल्या, कादंबरीतल्या, कवितेतल्या, ज्या ज्या प्राण्या-पाखरांना आणि माणसांना मी मनात थांबवून ठेवते, त्यांना सगळ्यांना पाऊसकाळात मनाबाहेर येऊन भिजू देते.
त्यातलंच कुणी कधी काळाची झाकली मूठ उघडतं. आत गारेसारखं गेलेलं आयुष्य असतं. बघता बघता तेही विरघळतं. पण तो क्षणात नाहीसा होणारा शुभ्रपणा अगदी शांत करून जातो.
कधीतरी आपण उभे असतो ताम्हिणी घाटात किंवा कासच्या पठारावर, किंवा नीलगिरीच्या, विंध्याच्या, हिमालयाच्या एखाद्या डोंगरमाथ्यावर आणि पाऊस भरून येतो. मनाच्या ओसाडपणावर बारीक तुषारांचा वर्षांव होतो. काहीच नवं उगवणार नाही असं वाटत असताना खडकासारख्या अचलपणातून काहीतरी पाझरत येतं. सुखाचं अगदी कोवळं पान कुठेतरी हललंसं वाटतं. वाटतं, की जगण्यावर आसक्तीचे, संबंधांचे, आपुलकीचे, मोहांचे लहान लहान फुलोर येतात म्हणून तर जीवशक्ती अमर आहे याची कृतज्ञता वाटते.
पाऊस पडत राहतो. वाटतं की, बाहेर कुठेतरी कुणाच्या तरी मनात हा नक्की वाजत असणार. ह्य़ाचं न येणं आणि ह्य़ाचं येणं, ह्य़ाचं मोडणं आणि घडवणं या सगळ्यानं कुणाकुणाच्या आत.. अगदी आतमध्ये काहीतरी उलथापालथ होत असणार.  चिखलानं भरलेल्या पायांनी हा कुणाच्या तरी काळजांवरून चालत जाणार आणि नव्या गाण्याचे, चित्रांचे, कवितांचे कळभरले आवाज तिथून उमटत राहणार.
ते आवाज ऐकू यावेत यासाठी म्हातारा काळ तर नेहमीच उत्सुक असणार आहे..