Monday, August 6, 2012

पाऊस

पाऊसPrintE-mail
अरुणा ढेरे ,रविवार,५ ऑगस्ट २०१२ 
वेडावल्यागत धिंगाणा घालणारा पिसाट पाऊस.. 
दाही दिशा झडीनं गारठून, हुडहुडत पाय पोटाशी घेत आक्रसलेल्या.. 
धरतीच्या अंगात जणू देवचार संचारलेला.. 
ती अनिवार, अर्निबध 
स्वत:शीच घुमतेय.. 
कोसळत्या पाऊसधारांचा धुकट, तलम पडदा सर्वागी लपेटून मिचमिच्या डोळ्यांनी झाडं, रान, वाटा तृप्तीनं जडावल्यात.. 
पण पोटपाणी कुणाला चुकलंय, म्हणताना गुरांना घेऊन रानाची वाट धरलेला एकट गुराखी.. 
कच्च ओलाचिंब.. 
डोईवर कांबळ्याची खोळ.. 
या पाऊसखाईत 
गुरं राखायचं म्हणजे..! 
वाटेवरच्या खळाळ पाण्यात तडतडणाऱ्या सरींच्या अगणित भिंगऱ्यांनी सूरमयी लयीत 
ताल धरलेला.. 
मनही ओलंचिंब..
रुंजी घालणाऱ्या अलवार, ओलेत्या आठवणींनी..   
चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या या ओल्याकंच चित्रासारखं.
पाऊस सुरू व्हायचा तेव्हा शाळाही नुकती सुरू झालेली असायची. नवा वर्ग, नव्या बाई हव्या तर असायच्या; पण हवा असायचा मन ओढून घेणारा पाऊसही. अंगणातल्या मातीवर थेंबांचे गोल उमटत राहायचे. मग हळूहळू सगळं तुडुंब तळंच व्हायचं. कडेनं लावलेल्या हजारी मोगऱ्याच्या रुंद पानांवर आणि जाईच्या लांबसर कळ्यांवर पाऊस सडसडत राहायचा. शाळा सुटून छत्रीतून अर्धे भिजत घरी येईतो संध्याकाळ झालेली असायची. नदी घरामागेच. तिचं पाणी दिवसागणिक वाढत असायचं. हळूहळू घरी यायचं ते पुराचं पाणी पाहतच. दोन्हीकडच्या घाटांवरून पाणी थेट वाडय़ाच्या दारापर्यंत यायचं.
मग रात्री उशिरापर्यंत घरी जुन्या आठवणी काढत मोठी माणसं जागत, गप्पा करत असायची. आठवणी गावाकडच्या पावसाच्या, पावसात चुकलेल्या गुरांच्या, हलाखीच्या दिवसांत तग धरून राहिल्याच्या, गमावलेल्या माणसांच्या असण्याच्या-नसण्याच्या, पानशेतनं गिळून टाकलेल्या चार काडय़ांच्या संसाराच्या.. कधीतरी ते बोलणं ऐकता ऐकताच झोप लागायची. आणि पहाटे पहाटे बाहेरच्या पावसाची लय धरून आई-आत्यांच्या दळणाच्या ओव्या ऐकत जाग यायची तेव्हा त्या गाण्याला जी एक उदास करणारी गलबल असायची, तिचा अर्थ कळतो आहेसं वाटायचं.
पूर पाहायला जाऊ नये असं तेव्हा त्या दोघी आम्हाला सारखं बजावत असायच्या. ‘अगं, बाई आहे ती नदी म्हणजे! नाही जाऊ पाण्याच्या पहिल्या भराच्या वेळी..’ त्या म्हणायच्या.
झाडं झराडती, इजा कराडती
धरणीबाई गं, आला आला तुझा पती
अशी ओवी मी पुढे.. पुष्कळ पुढे ऐकली, तेव्हा त्या वेळी आई-आत्यांच्या तोंडची नदीची ओवी मला सहज उमगली. त्यांच्यासाठी धरणीबाई आणि नदीबाई- दोन्ही बायकाच आणि एकरूपच. त्या म्हणायच्या-
नदीला आला पूर, नका जाऊ पाह्य़ा
तिच्या गं शेजेवर आलासे मेघराया
जमिनीला काय किंवा नदीला काय, पावसाची कशी विलक्षण ओढ जडली आहे, हे कळायला मधे बरीच र्वष गेली. त्या वर्षांवर पाऊस बरसत राहिला होता. म्हणून पुष्कळ काही कविता म्हणून उगवूनही येत राहिलं.

एकदा मी आणि शांताबाई शेळके- आम्ही चिपळूणला निघालो होतो. ऑगस्टमधली व्याख्यानमाला. पाऊस सगळ्या वाटेवर गडद भरून राहिलेला. आम्हाला ‘मेघदूता’ची आठवण झाली. बारहमासा, चौमासासारख्या पारंपरिक गाण्याच्या प्रकाराला कवीनं- एखाद्या अभिजात प्रतिभावंत कवीनं स्पर्श केला की काय अनोखं निर्माण होऊ शकतं ते ‘मेघदूता’त पाहावं. शांताबाईंचा काळ ‘मेघदूता’च्या प्रेमात पडलेल्या कवींचा. तोपर्यंत बोरकर, कुसुमाग्रज, बापट- कितीकांनी ‘मेघदूता’ला मराठीत आणलेलं. पुढे शांताबाईंनीही आणलंच.
आम्ही साऱ्या प्रवासभर ‘मेघदूत’ आठवत, म्हणत गेलो. धूर, पाणी, वीज आणि वारा यांनी बनलेला तो- म्हटलं तर अर्थहीन आकार! आणि कालिदासानं आपल्या प्रतिभास्पर्शानं त्याला दिलेलं चैतन्यमय रूप- कविता म्हणजे तरी दुसरं काय असतं? वेगवेगळ्या पोतांचे, जातींचे, आकार-प्रकारांचे निर्जीव शब्द आणि कवीनं रसद्रव्यांनी भरून त्या शब्दांना आणलेलं जिवंतपण.. त्यांच्यातून उगवून आणलेले चैतन्याचे कोंब! त्या पावसानं ओथंबलेल्या ओल्या प्रवासात मला कवितेचं जणू रूपरहस्यच कळून आलं.
परत येताना वरंधा घाटात पाऊस इतका बेभान कोसळत होता, की थांबलोच. डोंगरकडय़ांवरून प्रचंड गर्जना करत पाण्याचे लोट खाली धावत निघालेले. दरीत ढगांची गर्दी. वर मुजोर पावसाचे सपकारे. त्या पावसाचा आवेग जबरदस्त होता. खिळवून टाकणारी ती उग्रता अवाक् करणारी होती. विजेची एक रेघ अशी लखलखून उमटली, की अर्थशून्यतेचा प्रचंड गोल तडकला आणि पंचमहाभूतांच्या शक्तीचं अद्भुत एखाद्या दिव्य भासासारखं दिसून गेलं.

आंध्रात होतो. वडिलांच्या संशोधनाच्या निमित्तानं प्रवास करत होतो. एका अपरिचित घाटमाथ्यावर पोचलो आणि पाऊस असा कोसळला, की मागचे-पुढचे रस्ते त्यानं बंदच करून टाकले.
त्या रात्री एका अनोळखी घरात- पुरुषमाणूस बाहेरगावी असतानाही आम्हाला रात्रभराचा आसरा मिळाला. साधं, गरम कढीभाताचं जेवण मिळालं. आम्हाला त्यांची भाषा अवगत नव्हती आणि आमची भाषा त्या घरातल्या म्हातारीला आणि तिच्या जवळच्या तरुण मुलीला समजत नव्हती. पण तसं तरी कसं म्हणावं? बाहेर तुफान कोसळणाऱ्या पावसानं आमची असहायता (पान १ वरून) त्यांना समजावली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पाणी ओसरलेलं पाहून आम्ही पुढे निघालो तेव्हा किंचित भुरभुरत्या पावसात त्या घरातली म्हातारी आम्हाला हसतमुखानं निरोप देत दाराशी आली होती. सत्य कवितेबाहेर पडलं होतं आणि आमच्यासाठी हात हलवून आशीर्वाद देत होतं.

एका भल्याथोरल्या उद्यानातून फिरत होते. कितीतरी प्राणी आणि पक्षी पिंजऱ्यांमधून ठेवलेले. पाऊस येणार असं वाटत होतं; पण आला नव्हता. सगळीकडून निळसर अंधाराचा झाकोळ आलेला. सूर्य हिऱ्यांच्या करंडय़ात ठेवल्यासारखा आणि त्याच्या उजेडाला सगळीकडून मेघांचा सावळा संभार रोखून धरत असलेला. अचानक समोर आला तो पिंजऱ्यातला पांढरा मोर. आपलं एकूण एक पीस फुलवून तो धुंद थरथरत होता. सगळ्या पिसाऱ्यात एक नाजूक लहर सळसळत असल्यासारखं वाटत होतं. तरलता ही खरं तर सारखी निसटणारी गोष्ट; पण त्या क्षणी तिथे ती त्या मोराच्या अवघ्या देहात उमटून होती.
पाहताना डोळ्यांत एकदम पाणीच आलं. वाटलं, की भोवतालाच्या बंधनांचा, कुरूपतेचा, दुखाचा, निर्थकतेचा, जडतेचा विसर पाडणारी एखादी उत्कट हाक असते. कवीला ती ऐकू यावी लागते. मग बाकी सगळं नाहीसं होऊ शकतं. उरतो तो फक्त ओथंबलेपणा, ती हाक आणि ती तरलतेची थरथर.
जीवनाचा अर्थ फक्त ‘असणे’ एवढा थोडाच आहे?

पाऊस आता आवडीनिवडीच्या पलीकडेच असतो. ज्याच्यावाचून जगण्याला जगणं म्हणता येत नाही, असा. ज्याच्यावाचून संपूर्ण होण्याचं स्वप्न पाहता येत नाही, असा. कथेतल्या, कादंबरीतल्या, कवितेतल्या, ज्या ज्या प्राण्या-पाखरांना आणि माणसांना मी मनात थांबवून ठेवते, त्यांना सगळ्यांना पाऊसकाळात मनाबाहेर येऊन भिजू देते.
त्यातलंच कुणी कधी काळाची झाकली मूठ उघडतं. आत गारेसारखं गेलेलं आयुष्य असतं. बघता बघता तेही विरघळतं. पण तो क्षणात नाहीसा होणारा शुभ्रपणा अगदी शांत करून जातो.
कधीतरी आपण उभे असतो ताम्हिणी घाटात किंवा कासच्या पठारावर, किंवा नीलगिरीच्या, विंध्याच्या, हिमालयाच्या एखाद्या डोंगरमाथ्यावर आणि पाऊस भरून येतो. मनाच्या ओसाडपणावर बारीक तुषारांचा वर्षांव होतो. काहीच नवं उगवणार नाही असं वाटत असताना खडकासारख्या अचलपणातून काहीतरी पाझरत येतं. सुखाचं अगदी कोवळं पान कुठेतरी हललंसं वाटतं. वाटतं, की जगण्यावर आसक्तीचे, संबंधांचे, आपुलकीचे, मोहांचे लहान लहान फुलोर येतात म्हणून तर जीवशक्ती अमर आहे याची कृतज्ञता वाटते.
पाऊस पडत राहतो. वाटतं की, बाहेर कुठेतरी कुणाच्या तरी मनात हा नक्की वाजत असणार. ह्य़ाचं न येणं आणि ह्य़ाचं येणं, ह्य़ाचं मोडणं आणि घडवणं या सगळ्यानं कुणाकुणाच्या आत.. अगदी आतमध्ये काहीतरी उलथापालथ होत असणार.  चिखलानं भरलेल्या पायांनी हा कुणाच्या तरी काळजांवरून चालत जाणार आणि नव्या गाण्याचे, चित्रांचे, कवितांचे कळभरले आवाज तिथून उमटत राहणार.
ते आवाज ऐकू यावेत यासाठी म्हातारा काळ तर नेहमीच उत्सुक असणार आहे..
 

No comments:

Post a Comment