Thursday, December 2, 2010

भंडारदरा परिसरातील निसर्गसौंदर्य !!

 
 भंडारदरा व परिसरातील निसर्गसौंदर्याचा अनमोल नजराणा पाहताना "ऋतू हिरवा, ऋतू बरवा...' या ओळी ओठावर येतात. येथे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. हिरव्यागार वृक्षराईच्या कुशीतुन खळखळणाऱ्या धबधब्यांची मालिका, थंडगार झोंबणारा वारा, शुभ्र धुक्‍याने लपेटून घेतलेले रस्ते पाहताना मनाला मिळणारी शांतता, एक अवर्णनीय व अविस्मरणीय अनुभव ठरतो.

या परिसरात पर्यटकांसाठी पंचतारांकित सोयी नाहीत, मात्र ग्रामीण महाराष्ट्राचे दर्शन घडते. एका बाजूला निसर्गाचे मनमोहक रूप व दुसऱ्या बाजूला तेथील कष्टमय, खडतर लोकजीवन पाहायला मिळते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले साहसी पर्यटक व गिर्यारोहकांना साद घालणारे व सर्वांत उंच असणारे १६४६ मीटर उंचीवरील कळसुबाईचे शिखर येथे आहे. शिवकाळात शत्रुपासुन स्वराज्याचे संरक्षण करून, टेहेळणी मनोऱ्याचे काम करायचे ते कळसूबाई शिखर. येथे अगस्ती ऋषींचा पुरातन आश्रम असून, प्रभू रामचंद्रांनी भेट दिल्याचे सांगितले जाते.

प्रवरा नदीवर बांधलेल्या भंडारदरा धरणाचे दूरपर्यंत पसरलेले पाणी पाहण्याचा आनंद अवर्णनीय बनतो. धरण भरल्यानंतर कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेण्याचा आनंद पर्यटक मनसोक्त घेतात. याच परिसरात १७० फूट उंचीवरून खाली कोसळणारा रंधा तसेच अंब्रेला, नेकलेस आदी फॉलची मालिका डोळ्यांचे पारणे फेडतात. तर अमृतेश्‍वराचे मंदिरात मनाला शांती मिळते. याच हिरव्या वृक्षवेलींनी नटलेल्या वनराईत बिबट्यांचा असलेला संचार ऐकून ते पाहण्याची उत्कंठा जागृत होते, तसेच अंगावर काटाही उभा राहतो.

याच भागातील निसर्गरम्य रतनगड, साधन व्हॅली, रांगड्या अलंग-मदन-कुलंग पर्वत शिखरांच्या रांगा हजारो पर्यटकांच्या आकर्षण बनलेल्या आहेत.





















No comments:

Post a Comment