Monday, December 6, 2010

व्हिसा !!




व्हीसा स्टॅंप झाल्यावरती एकच धावपळ उडून गेली
भावितव्याच्या स्वप्नानी रे तहान भूक हरवून गेली
भेटी झाल्या, खरेदी झाली, बॅगसुद्धा भरुन झाली,
सारख़्या सूचना देता-देता आईची धांदल उड़ून गेली,
तासामागून तास गेला अन् फ्लाइटची वेळ जवळ आली,
निरोप द्यायला सवंगड्यांनी गर्दी केली,
कौतूक आणि काळजी बाबाच्या चेह-यावर दिसुन गेली,
पाठ फिरता तुझी, त्यांची पापणी सारं बोलून गेली,
अरे आपली माती आपली माणसं देश आपला विसरु नको,
सीलिकॉन वॅलित जा पण सह्याद्रीला विसरु नको,

विमान उडालं तेव्हा एक-एक डोळा पाण्यानं भरला असेल,
नकोच ज़ायला परदेशात एकदा नक्कीच वाटल असेल,
अरे आकाक्षाच्या पंखानी अश्रुनाही जखडूंन टाकल असेल,
लिंकनचे शब्द आठव अश्रु ढाळायला लाजू नकोस,
गीतेतले शब्द आठव हातपाय गाळून बसु नकोस,
अरे अटकेपार झेंडे लाव पण मायमराठी विसरु नको,
सीलिकॉन वॅलित जा पण सहयाद्रिला विसरु नको.
अरे अन्न दिलं, वस्त्र दिलं, सह्याद्रीनंच ओसरी दिली,
आई बापानं कष्ट करून, शिक्षणाची शिदोरी दिली,
गूरुजनानी संस्कार दिले, गावक-यानी यारी दिली,
अरे टपरीवरच्या अप्पानेही वेळोवेळी उधारी दिली,
देश सुटला पोटासाठी बंध इथले तोडू नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

पोटापाण्यासाठी मित्रा दहा दिशांना जायला हवं,
दिशा देण्या प्रवाहाला प्रवाहापुढ़े पळायला हवं,
कासवासारखं विश्वासानं एकेक पाउल टाकायला हवं,
अरे आठव्या घरच्या प्यादयासारखं वज़ीर म्हणून जपायला हवं,
एखाद स्वप्न देशासाठी आपणही पहायला हवं,
व्यावसायिकतेच्या दूनियेत या भावनानाही जपायला हवं,
नमस्कार सांग लिबर्टीला, पण आई भवानी विसरु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सहयाद्रिला विसरु नको.
स्वर्गसुखं सगळी मित्रा हात जोड़ून उभी असतील,
भूरळ पाडतील तुला मित्रा आणि मग मर्यादेला हसत बसतील,
मंद मंद उजेड़ात कुठंतरी पार्टयासुद्धा होत असतील,
रॉक एन्ड रोलवर बेभान हो, पण ताल लताची विसरु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

पंखात शक्ती आल्यावरती पाखरं दूर उड़ून जातात,
आई-वडिलांच्या घ़रटयात मग आठवणीची भुते रहातात,
अरे आठवणीची भुते आईला रोज अश्रुची भेट देतात,
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोपसूध्दा पळवून नेतात,
आईच्या चरणी परत ये, स्वर्गात सुध्दा रमु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

वाट पहात मित्र तुझी पानपट्टीवर थांबला असेल,
मग तुझ्या वाटणीचा ग्लास पार्टीत तसाच उरला असेल,
बॅट घेवुन पिंटया एकटाच मैदानात उतरला असेल,
तुझ्याविना संघ महोदया फायनल मॅच हरला असेल,
अरे भेटीसाठी तुझ्या प्रत्येकजण आतुरला असेल,
आणि आठवणींनी गावच्या तुझाही उर भरला असेल,
भरारी मार उंच आकाशी पण मातीचं नात तोडु नको,
वाटत असेल तूलाही मित्रा सहयाद्रित परत यावं,
कामधंदे सोडुन सगळे डोंगरदरीत फ़िरत रहावं,
निशाचरासारखं गुपचुप रात्री रोज बाहेर फिरत रहावं,
क्रिकेट खेळावं डोंगरावरती दमुन भागुन गावात यावं,
झंकारची भेळ खावी, अन् कृष्णामाईच पाणी प्यावं,
अरे एक़्वाफ़िनाच पाणी पी, पण कृष्णामाईला विसरु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

परवाच पाहिलं मित्रा आपला सह्याद्रीच रडत होता,
त्याचा म्हणे हिरा कूणीतरी पळविला होता,
भवितव्याची स्वप्नं दाखवून राणीच्या मुकूटात ठेवला होता,
प्रकाशाला त्याच्या आता सह्याद्रीच पारखा झाला,
सह्याद्रीच्या बुरुजा असा आयत्यावेळी ढळू नको,
बिझनेस वॉरच्या योध्दा असा मैदान सोडून पळू नको,
मग नुसताच आवंढा गिळू नको, नुसतीच मुठ वळू नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

सह्याद्रीच्या कुशीत मित्रा मोठी रत्न होवून गेल्येत,
देशासाठी नररत्नानी सर्वस्वाची होळी केली,
अरे आपल्यालाही ज्या सह्याद्रीनं विश्वास दिला, प्रेरणा दिली,
त्याचीच मांडी आज का रे फूटकया काचांनी भरुन गेली?
असेल देश ग़रीब आपला, कचरा म्हणून हिणवू नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सहयाद्रिला विसरु नको.

वडील रागावणार नाहीत हवं तर, तू फक्त परत ये,
आई सूचना करणार नाही हवं तर, तू फक्त परत ये,
मित्र उधा-या मागणार नाहीत हवं तर, तू फक्त परत ये,
शेजारीही चुगल्या करणार नाहीत हवं तर, तू फक्त परत ये,
मॅच अर्धी राहिली मित्रा, तू फक्त परत ये,
तुझीच बॅटिंग पहिली मित्रा,तू फक्त परत ये !!

No comments:

Post a Comment