मागे एकदा मी न्यायालयाने ‘ बैलगाडा शर्यती ’ वर घातलेल्या बंदीचा निषेध नोंदवताना “ बैलगाडा शर्यत ” हा लेख लिहिला होता. तेव्हा मी बैलाच आणि शेतकऱ्याच नातं किती जिव्हाळ्याच असतं यावर लिहिण्याच नक्की केलं होतं.
मी इंजिनीअरींगला असतानाची गोष्ट. आम्हाला शेती कामासाठी एक बैल कमी पडत होता म्हणून आम्ही एक नवा बैल विकत आणायचं ठरवलं. चुलत्यांसोबत मी काश्तीच्या जनावरांच्या बाजारात गेलो. तिथून आम्ही चांगला उंचापुरा, खिल्लारी जातीचा बैल विकत घेतला. त्याची शिंगही लांबलचक आणि अणकुचीदार. माझा तेव्हाचं वय विशीच. त्याचं नाव मी राजा ठेवलं.
गावाकडची जनावर शेतकऱ्यांच्या सहवासात वावरणारी. नेहमी धोतर, सादर आणि पागोटं पाहणारी. त्यांना शहरी पेहरावाची प्यांट शर्टची सवय नसते. सहाजिकच ते शहरी माणसाला जवळ फिरकू देत नाहीत.
पण राजानं मला स्विकारलं. त्याला वैरण टाकणे, पाणी पाजणे, पेंड घालणे, हि काम मीच करायचो. त्याला नांगराला, औताला, बैलगाडीला जुंपण्याच कामही मलाच कराव लागायचं.
त्याचं आणि माझ एवढ मेतकुट जमलं कि तो माझ्य्शिवाई कुणालाही हात लावू देईना. अगदी माझ्या चुलत्यांनाही. माझे चुलते त्याला वैरण घालायला गेले कि त्याने शिंग उगरलच म्हणून समजावं. पण माझ्या त्याच्यात कुठलं नातं निर्माण झालं होतं कुणास ठाऊक. मी मात्र त्याच्या अवती भवती बिनधास्त वावरायचो .
आमच्याकडे संध्याकाळी बैलांना गव्हाची कणीक खाऊ घालायची परंपरा होती. पण राजाला कणीक खाऊ घालायचं कामही मलाच करावं लागायचं. मीही अगदी पोटच्या मुलाला आईनं भरवाव तसं त्याला भरवायचो. त्याच्या पुढ्यात बसायचो. कणकेचे बारीक मुठीएवढे गोळे करायचो. आणि अगदी त्याच्या मुखात घास द्यायचो. त्याच्या रखरखीत जिभेचा स्पर्श मला अगदी मोरपिसासारखा वाटायचा.
मी तसा शहरातच लहानाचा मोठा झालेलो. गावाशी माझं नातं सुट्टी पुरतंच. शाळा असो अथवा सुट्टी असो पण आईचा ओरडून घसा बसेपर्यंत मी काही अंथरुणातून बाहेर निघायचं नाव घेत नसायचो. आणि रात्री एकदा अंथरुणात झोकून दिल्यानंतर सकाळी सूर्य चांगला हातभार वरती येई पर्येंत उठायचो नाही. हि सगळी झोप अगदी गाढ असायची. इतकी कि कुंभकर्णानही आम्हाला लवून मुजरा करावा.
पण इथं राजाच्या सहवासात माझ्या झोपेतला गाढपणा कुठं हरवला कुणास ठाऊक. गावाकडे मला राजाची काळजी असायची. माझ्या चुलत्यांना आम्ही आण्णा म्हणायचो. त्यांना राजा जवळपासही फिरकू द्यायचा नाही. मग त्याला रात्री दोन वाजता, पहाटे पाच वाजता वैरण टाकण्याचं काम कोण करणार ? सहाजिकच राजासाठी रात्री अपरात्री उठण्याची वेळही माझ्यावरच आली. इतके दिवस अखंड गाढ झोपेची सवय. पण इथं राजासाठी मी ठरल्यावेळी न चुकता उठायचो. कोणीही आवाज दयावा लागायचा नाही. पण जाग आल्यावर घड्याळात पाहिलं तर बरोबर रात्रीचे दोन किवा पहाटेचे पाच वाजलेले असायचे.
आठ महिन्यात मला नौकरी मिळाली आणि मी पुन्हा पुण्यात परतलो. राजाला कुणास ठाऊक, कशी पण भनक लागली होती. त्याचे डोळे भरून आलेले होते. त्याच्यातला उत्साह मावळला होता. पुढ्यातली वैरण दातातही धरत नव्हता.
माझी अवस्थाही त्याच्यासारखीच झालेली. त्याची आणि माझी भेट मी पुन्हा मोठ्या सुट्टीवर आल्यावरच होणार होती. मी त्याला जड अंतकरणानं वैरण आणि पाणी करीत होतो. निघायच्या आदल्या दिवशी त्याला तेलात माळून कणीक खाऊ घालायला गेलो पण पठ्ठ्यानं एक घास शिवला नाही. त्या रात्री मीही जेवलो नाही.
दुसऱ्या दिवशी मी पहाटेच निघलो, कुणास ठाऊक कसं पण मी दूर निघाल्याच त्याला कळलं होतं. मी घराबाहेर पाउल टाकताच तो गोठ्यात चटदिशी उभा राहिला. दावणीला जोर देऊ लागला. त्याची तडफड बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मनात कालवाकालव झाली. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गळ्यात पडून मुसमुसून रडलो. पाय निघत नव्हता तरी निघालो. शहरात आलो नौकरीत रमलो एक यंत्र झालो. बर्याच महिन्यानंतर गावाकडे आलो. पहातोय तर राजा दावणीला नाही.
आण्णांना विचारलं तर म्हणाले,” आरं, तू गेलास आणि बाईलीच कुणालाच हात लावू दिईना. वैरण आमी लांबूनच घालयचो, आणि पाणी सुदिक लांबूनच दावायचो. पण दावणीतून सोडून कामाला जुपायाची काय आमची हिम्मत हुईना. आखरी त्याच्या मूळ मालकाला सांगावा धाडला. घेतल्या कि मतीला दोन हजार रुपय खोत खावून दिवून टाकला.”त्यानंतर कितीतरी वर्ष सुट्टीला गावी गेलो कि राजाच्या रिकाम्या दावणीकड मी पहायचो आणि त्याच्या माझ्यातलं एक नातं माझ्या मनात गजबजून यायचं.
आपल्या ब्लॉगवर मला माझ्या ' बैल आणि मी ' तसेच ' बाबा काठी टाकून द्या ' या दोन पोस्ट सापडल्या. आपण कृपा करून या पोस्त त्वरित काढून टाकाव्यात. ' रे घना ' आणि ' रिमझिम पाऊस ' हे दोन्ही ब्लॉग माझे असून. या ब्लॉगवरील कोणत्याही पोस्ट कोणालाही आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करता येणार नाहीत. फार तर ईमेल अथवा शेअर करून आपण या पोस्ट इतरांना पाठवू शकता.
ReplyDelete