Wednesday, June 8, 2011
स्त्री व सृष्टी
वर्षां संपूर्ण आयुष्य निसर्गाशीच बांधलेलं असल्यामुळे आणि स्वत: सर्जनक्षम असलेली स्त्री सृष्टीच्या निर्माणक्षमतेला न दुखावता मानवी जीवन समृद्ध करेल, असा विश्वास असल्यामुळे वेदपूर्व आणि वेदकाळातही स्त्रीचं सामथ्र्य व सृष्टीचं आरोग्य अबाधित राहिलं. आज पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणि त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना स्त्री व सृष्टी यांच्यातल्या या नात्याचं पुनरुज्जीवन व्हायला हवं. उद्या जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्त काही विशेष लेख-
पर्यावरण दिन दरवर्षीच येतो आहे. ‘सृष्टी वाचवा’ अशी हाकही जगाच्या कोपऱ्यांतून पुन:पुन्हा येते आहे. पण काही किरकोळ अपवाद वगळता ही हाक बहुतांशी फोल ठरते आहे. या हाकेला उत्तर देण्याची जबाबदारी फक्त शासनकर्त्यांची नव्हे, हे फक्त पर्यावरणवादी मंडळींचं राखीव क्षेत्रही नव्हे, तुमच्या-माझ्या प्रत्येकाच्याच रक्तातले अंत:प्रवाह या हाकेनं खळखळून वाहायला हवेत. पण सृष्टीची ही हाक ऐकून खरं जर कुणाचं भान जागं व्हायचं असेल तर ते आपल्या अधिकारांसाठी ठामपणे झगडणाऱ्या, कर्तृत्वाची अनेक क्षितिजं पार करत आभाळापर्यंत पोहोचणाऱ्या स्त्रीचं. याचं कारण, तीच सृष्टीची लेक आहे- सर्जनशील आणि सोशिक, कणखर आणि क्षमाशील, सुपीक, समृद्ध आणि संपूर्ण विश्वाला पोसणाऱ्या आणि विश्वाचा भार पेलणाऱ्या भूमीची ती समानधर्मा आहे.
सृष्टीच्या आणि स्त्रीच्या, भूमीच्या आणि स्त्रीच्या एकरूपतेची ही खूण आज एकविसाव्या शतकातल्या स्त्रीच्या मनातून कदाचित पुसली गेलीही असेल. विस्तीर्ण अवकाशात झेपावताना भूमीशी असलेल्या नात्याचा विसर तिला पडलाही असेल. तिनं थोडं मागे वळून बघितलं तर तिला अगदी सहज पटेल तिची ही ओळख. तिनं जपू नये जाचक पारंपरिकता, तिनं अडकू नये कर्मकांडात, व्रतवैकल्यं पार पाडून तिनं झिजवू नये स्वत:ला आणि सण-उत्सवांमधल्या उपचारांचं अंधानुकरणही करू नये तिनं. पण या परंपरेमागचा अर्थ आणि त्या अर्थाच्या मुळाशी असलेलं स्त्री आणि भूमी यांच्यातलं साधम्र्य तर तिनं नक्की जाणून घ्यावं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्वत:ला सिद्ध करू पाहताना आणि पर्यावरणाच्या प्रश्नांवर उत्तरं शोधतानाही हे साधम्र्य कदाचित तिचं आंतरिक सामथ्र्य वाढवू शकेल.
आजच्या विज्ञाननिष्ठ युगात स्त्री-पुरुष समानतेचा आणि पर्यावरणपूरक अशा शाश्वत विकासाचा पाया रचताना प्राचीन परंपरेकडे डोळेझाक करणं कुणालाच श्रेयस्कर ठरणार नाही. कारण संस्कृतीची वाटचाल सुरू राहते तीच मुळी नव्या जुन्यांच्या संघर्ष आणि समन्वयातून. डॉ. इरावती कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ही सतत स्वीकाराची प्रक्रिया आहे. एका गोष्टीचा स्वीकार आणि दुसरीचा कायमचा त्याग, असा प्रकार संस्कृतीच्या घडणीत कधी दिसून येत नाही.’ त्यांनी जिला ‘नवस्वीकृती’ (aglomeration) म्हटलं आहे, ती ही प्रक्रिया स्त्री आणि पर्यावरण या दोहोंसाठी तर अधिक पोषक आहे. प्राथमिक कृषिजिवी समाजातलं स्त्री आणि सृष्टी यांच्यातलं साहचर्य आज डोळसपणानं समजून घेण्याची गरज आहे, ती यासाठी.
ज्या काळात अन्न हीच जगण्याची मुख्य प्रेरणा होती, त्या काळात नवनिर्मितीची शक्ती असलेल्या भूमीला आणि त्याच शक्तीमुळे अर्भकाला जन्म देणाऱ्या स्त्रीला लोकमानसात गौरवाचं स्थान होतं. भूमीप्रमाणेच सर्जनशील, उदार, सोशिक, अनाग्रही आणि समर्पणशील असलेली स्त्री हीच त्या समाजाचा केंद्रबिंदू होती. तिला निर्णयाचं स्वातंत्र्य होतं. जमिनीला न दुखावता तिच्यातून उत्पादन घेणं, त्या उत्पादनाचं कुळात- समूहात वाटप करणं आणि समूहाचं व्यवस्थापन करणं हे स्त्रीचेच अधिकार होते. शेतीचा शोधच मुळी तिनं लावला. नांगराच्या मदतीनं शेतीला सुरुवात होण्यापूर्वी शेतीची सगळी कामं स्त्रीच्या पुढाकारानंच होत होती.
सर्जनाचं नेमकं मर्म जाणणाऱ्या स्त्रीच्या आणि भूमीच्या साहचर्यामुळे भूमी आपल्याला अन्नधान्याची समृद्धी देते, अशी श्रद्धा त्या आदिम समूहांच्या मनात साहजिकच निर्माण झाली आणि म्हणून या लोकमानसानं स्त्रीला भूमीरुपात पाहिलं. भूमीला स्त्रीमध्ये बघून भूमीच्या सुफलीकरण विधींचा अधिकार स्त्रीकडे सोपविला. नागपंचमी आणि श्रावणातली विविध व्रतं, गौर-गणपती, नवरात्र, भोंडला, भुलाबाई, इनाई, भराडी गौर, शांकभरी, वसंतोत्सव, चैत्रगौर, अक्षयतृतीया, कानबाई यांसारख्या भारतभर सगळीकडे विविध प्रकारे साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सव आणि व्रतवैकल्यांमागे जमिनीची सुफलनाची शक्ती वाढावी, ही प्राथमिक कृषिजीवी संस्कृतीची श्रद्धाच आहे. जिच्याजवळ उदंड निर्मितीक्षमता आहे, अशा स्त्रीनं भूमीच्या समृद्धीसाठी प्रतिकात्मक विधी करण्याची प्रथा शेतकरी समाजात आजही टिकून आहे. भरपूर पीकपाणी यावं म्हणून पेरणीची सुरुवात स्त्रीनं करावी, असा संकेत आहे. तिफणीची पूजा तिच्या हस्तेच केली जाते. झाडाचं पहिलं फळ स्त्रीला दिलं जातं.
संपूर्ण आयुष्य निसर्गाशीच बांधलेलं असल्यामुळे आणि स्वत: सर्जनक्षम असलेली स्त्री सृष्टीच्या निर्माणक्षमतेला न दुखावता मानवी जीवन समृद्ध करेल, असा विश्वास असल्यामुळे वेदपूर्व आणि वेदकाळातही स्त्रीचं सामथ्र्य आणि सृष्टीचं आरोग्य अबाधित राहिलं. स्त्रियांनीच राखलेली आणि फक्त स्त्रियांनाच प्रवेश असणारी सहा-आठ हजार वर्षांपूर्वीची मातृवनं असोत, भूमी रजस्वला आहे, असं मानून शेतीची कामं चार दिवस बंद ठेवणारा अंबुवाची उत्सव असो किंवा नदीची खणा-नारळानं ओटी भरण्याची प्रथा असो, परंपरेतल्या या सगळ्या संकेतांमागे स्त्री आणि सृष्टी यांच्या नात्याची घट्ट वीण आहे. तसंच स्त्रीला उपजत असलेलं निसर्गाच्या रक्षणाचं व संवर्धनाचं अचूक भान आहे.
माणसाची वैज्ञानिक दृष्टी जसजशी विकसित होत गेली आणि बी पेरल्यापासून धान्य तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया त्याला जेव्हा नेमकी उमगली, तेव्हा निसर्ग जपण्यासाठीच्या या सगळ्या पारंपरिक संकेतांचा गाभा असलेली श्रद्धा हरवली. जीवनशैलीचा सहज आणि अटळ भाग असलेल्या चालिरितींना धार्मिक उपचारांचं स्वरूप आलं. आजचे सण, उत्सव, व्रतवैकल्यं ही सत्त्व नष्ट झालेल्या फोलपटांसारखी वाटू लागतात, ती यामुळे. पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणि त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना स्त्री आणि सृष्टी यांच्यातल्या या नात्याचं पुनरुज्जीवन व्हायला हवं.
हे करायचं तर तिला परत मागच्या दिशेनं वाटचाल करण्याची गरज नाही. सृष्टीचं मर्म तिला उमगलेलं आहेच. निसर्गसंवर्धनाची परंपरेनं मिळालेली जाणीव तिच्या रक्तातून वाहते आहेच. पण आजच्या काळाला अनुरुप असा या जाणिवेचा मुक्त आविष्कार आता दिसायला हवा. तिनं स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला भवतालाशी पुन्हा एकदा जोडून घ्यायला हवं. घरगुती कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यापासून ते पाणी, इंधन वाचवणं आणि परिसरातील हिरवाई टिकवणं-वाढवणं यासाठी तिला वेगळा वेळ देण्याचीही गरज नाही. कर्तृत्वाच्या इतर क्षेत्रात भरारी मारतानाही तिनं भूमीशी, सृष्टीशी असलेल्या नात्याची प्रखर जाणीव ठेवली तरी बदल घडू शकतो. ‘स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं’, असं म्हटलं जातं. तसंच निसर्ग संवर्धनाची दृष्टी घरातल्या स्त्रीनं बाळगली तर कुटुंबाची आणि पर्यायानं समाजाची जीवनशैलीही पर्यावरणपूरक होऊ शकते.
अर्थात, पर्यावरणाच्या आजच्या अनेक प्रश्नांचं स्वरूप पाहता, केवळ व्यक्तिगत प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत, हेही खरंच. म्हणून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधासाठी किंवा त्यांच्या हक्कांसाठी उभी राहणारी संघटित ताकद पर्यावरणावर घाला घालणाऱ्या शासकीय धोरणांच्या आणि प्रकल्पांच्या विरोधातही आता उभी राहायला हवी. स्थानिक वाणांचं उच्चाटन करून या मातीला आणि इथल्या समृद्धीला लुटणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात लढणाऱ्या आणि ‘नवधान्य’ कार्यक्रमाद्वारे स्त्री आणि सृष्टीला नवचैतन्य देऊ पाहणाऱ्या डॉ. वंदना शिवा असोत, आफ्रिकेतल्या हरित चळवळीची अध्वर्यू वांगारी माथाई असोत किंवा विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडणाऱ्या प्रकल्पांविरुद्ध लढा देताना जिला स्वत:चं बलिदान द्यावं लागलं, ती ‘ग्रीन पीस’ संघटनेची प्रणेती पेट्रा केली असो, या सगळ्यांनी सृष्टीची हाक ऐकली आहे आणि आपापल्या पद्धतीनं त्या हाकेला मन:पूर्वक उत्तरही दिलं आहे. आता तुमच्या-माझ्यासारख्या प्रत्येकीनं असंच ठाम पाऊल उचलायला हवं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment