Monday, August 6, 2012

पाऊस पानोपानी.....



पाऊस पानोपानी
यंदा पावसानं दिलेल्या प्रदीर्घ ओढीनं समस्त जीवसृष्टीच्या डोळ्यांत पाणी आलंय. अजूनही त्याचा रुसवा गेलेला नाही. उन्हानं करपलेल्या काळ्या आईच्या सांत्वनासाठी नुकताच तो येऊन गेला खरा. तसा अधूनमधून तो आशेची किरणं दाखवतोयही; पण त्याच्या मनी काय आहे कुणास ठाऊक! अशी सारी उदासवाणी परिस्थिती भोवती असताही ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाऊसकवितांच्या आवाहनास मात्र कविजनांनी कवितांचा उदंड पाऊस पाडून आम्हास अक्षरश: ओलंचिंब केलं. साधारण दीड ते दोन हजार कविता प्रतिसादादाखल आमच्याकडे आल्या.
आधीच घोषित केल्यानुसार ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी चिकित्सक चाळणी लावून त्यातल्या निवडक कविता आमच्या स्वाधीन केल्या. या निवडक कविता ‘पाऊस पानोपानी’ या विशेषांकात आम्ही प्रसिद्ध करीत आहोत..

माझा पाऊस
पाऊस सगळय़ांचाच असतो
सगळय़ांनी तो भोगलेलाही असतो.
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस
कधीतरी भोगलेला आहे
झेललेलाही आहे.
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण.
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही,
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा.
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे..
मला फक्त
दिसायचा
तिच्या डोळय़ांतील
पाऊस.
तोच पाऊस
मला आठवतो.
तोच पाऊस
मला माहीत आहे.
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेश
अश्रू, हंबरडा
आणि
मूक विलाप..
माझ्या आईचा.
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याच्या अर्थहीन
थेंबांचा आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा..
- एहतेश्याम देशमुख,
मेहरुण, जळगाव

कास्तकाराचा पाऊस
आम्हास कास्तकाराईच्या डोक्स्यावर
तुहय़ा मेहेरबानीची चुंबर देजो, बस्स!
सप्पा अन्न धान्य पिकवाचा
जिम्मा पेलून घेऊ बाप्पा

मंग कायले अमेरिकेचा
लाल मिलो मांगवा लागते?

तूच रुसलास त गडय़ा
कर्जाचा डोंगर आन
नापिकीच्या हालतीने
फासीच घेवा लागल

तू करतेस धिंगाना आन
आमचा होते सत्यानास
तू करतेस मिजास आन
आमचा सुपडा साफ

जिंदगीनीची ऐसी तैसी पायन्यापरीस
मरावा नाई त का करावा?

या बहय़ताड जमान्यात
सबसिडीवर भेटते कार
दुष्काळीचा सातबारा देवाले
पटवारी मांगते रुपये हजार

तिगस्ता तुहय़ा मस्तीन सोयाबीन गेला
गुदस्ता एका पान्यान सप्पा धान मेला

अमदा तरी सरम ठेवजो
मनाजोगता वक्तावर येजो
तू तोंड कारा करून, आमच्या
जिंदगीले चुना नको लावजो
- राजन जयस्वाल,
नागभीड, चंद्रपूर

खेळ..
आठवणी कोसळत राहतात
मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या
प्रत्येक थेंबासोबत
भूतकाळाच्या ढिगाऱ्यावर.
त्यातून पुन्हा उगवतात
नव्या आठवणींचे कोंब.
पाऊस थांबत नाही
भूतकाळाचा ढिगारा जमीनदोस्त होतो
नव्या आठवणींना उगवण्यासाठी.
मी पाहात राहतो
प्रारब्धाचे खेळ..
घराच्या पत्र्यावर तडतडणाऱ्या
संगीत पावसाच्या साक्षीने.
- संजय जाधव,
देवपूर, धुळे.

सुखांतिका


निवळत गेला उन्हात हलक्या पाऊस वेडापिसा
उमटून गेला मातीवरती त्याचा हिरवा ठसा
दरीतले बेधुंद धुकेही भोवळ येऊन पडे
पंख भिजवुनी एकल पक्षी मोहिनीतला उडे
नभी कुंचले फिरवत उडते पावसातली परी
निळे रुपेरी मेघ निघाले काळ्या वाटेवरी
आभाळाने सुखान्तिकेचा मजकूर लिहिला नवा
मऊ अभ्रकी थरांत झिरपे ओथंबून गारवा
घनात फुलवून गूढ पिसारे मोर नाचले तिथे
रत्न उमलले शून्यामधुनी अशी झळाळी फुटे

अजून पडतो मनात पाऊस, तुला ठाउके नाही
थेंबाथेंबामधुनी हलकी करवत फिरवत राही
- जयश्री हरि जोशी, विक्रोळी (प.)
पाऊसवेणा
थंड तुषार अंगावर झेलत
कार्यालयाच्या काच तुटलेल्या खिडकीतून
मी अनुभवतो पाऊस
शिरशिरत, शहारत, रोमांचित होत
कितीतरी वर्षांनंतर..
पाऊस म्हणावं तसा वागतच नाही हल्ली
आभाळ भरून आलं
की मी बापाला विचारतो मोबाइलवर-
‘तिकडे पाऊस आहे का?’
‘नाही. कडक ऊन पडलंय..’
बापाचा निर्जीव सूर.
माझी उदासी मग अधिकच गडद
गच्च आभाळ भरून दाटलेल्या काळोखागत
हुरहुर लावणारी, अस्वस्थ करून टाकणारी
काळजीनं काजळी धरल्यागत बापाचा चेहरा
डोळय़ांत उतरत जातो, नि डोळे बाप होऊन जातात..
तजवीज करून पेरणीसाठी जुळवलेले बी-बियाणे
दिवस दिवस कार उन्हात लायनीत थांबून
मोठय़ा कष्टानं मिळवलेली खताची पोती
अलीकडे प्रकृती बरी नसतानाही
कृशतेच्या खुणा अंगावर लेवूनही
शेतीची तळमळ मुळीच कमी होत नाही
बापाची..
बाप..
आयुष्यभर कष्टून, झिजून
उभारत राहिला आमच्या सुखाचा खोपा..
अन् आम्ही मात्र खोप्याच्या काडय़ा हिसकावून
बांधलीत सिमेंटची घरं
शहरात..
कुठं स्लॅबमधून ठिबकलं तर
सीलिंगचा शो जाईल याची असते आम्हाला काळजी
अन्
पाऊस नाही म्हणून
बाप पोळतो आहे उन्हाच्या जाळानं
याचा मागमूसही नसतो..
‘पाऊस पडतोय इकडे.. खूप चांगला..’
बापाचा मोबाइलवरचा आवाज
आनंदाच्या कंपनांसह थेट माझ्या काळजात..
तुषारांहून अधिक रोमांचतो मी
माझ्या डोळय़ांतलं तेज लपवता येत नाही मला
वाळून कोळ होत आलेली माती
पावसाच्या धारांनी सुखावली असेल..
भेगांच्या जखमा बुजताना
कृतार्थ होत असेल.
जमीन ओलांडून पाण्याचा लोट
मन्याडीच्या दिशेने आतून धावत असेल..
वाहणं विसरून गेलेली मन्याड
आर्त-विव्हळ वाहण्यासाठी स्वागतात असेल.
अन् पाऊस उतरतो डोळय़ांत
माझ्याही नकळत..
- व्यंकटेश चौधरी,
नांदेड

काठी ढगाला डसू दे
गावात घुसावेत हजार दरोडेखोर तसा धाक होता पावसाचा..
काळेभोर ढग अंधार करायचे गावावर तेव्हा
घरांच्या अंगांवर उभा राही काटा.
झोप मरायची. स्वप्नं करपायची. संसार रस्त्यांवर यायचा.
चूल बंद व्हायची.
नवऱ्यानं झोडपून काढावं असा जेव्हा कोसळे पाऊस तेव्हा-
झोपडय़ात नांदणारी तांदळाबाई पावसाच्या नावे
टबाटबा बोंबलायची-
‘‘आरं दुस्मना, जगू देतू का नाय?
पीठमीठ चिखल झाला
झोपडय़ात पाण्याचा डव्ह झाला
भाकरीची दुरडी गेली वाव्हून
सापइच्चू आथरुणात आले मेले
आरं बाबा, घरच झालं हीर..’’

बैलांच्या खुरांजवळच्या जखमा सडत
वासरूलेकरं नाल्याच्या पुरात जिरतमरत
आंग झाकाय धडुतं नसं आणि पोट विझवायला अन्न!
पाऊस यायचा लक्ष तोंडांचा राकीस बनून.

मरणमार पाऊस झाला की :
शाळा बंद. मास्तरचं तोंड न पाहण्याचा आनंद मुलांवर उमटे.
बंबाट पाऊस झाला की :
पाखरांची हिरवीजांभळी मस्ती आभाळाला सजवायची.
बंदुकांतल्या गोळय़ा बरसाव्यात असा यायचा पाऊस तेव्हा
झाडांचं हिरवं साम्राज्य गुणाकारानं हिरवं व्हायचं..

आता पोट फाटावे असे आभाळ का फाटत नाही?
धोंडा माती यांना ओली लिपी तो का देत नाही?
मातीखाली बिया टोचणाऱ्या हातांना तो बळ का देत नाही?
माळरान उलथू दे. झाडपान झडू दे. काळप्रेत सडू दे.
आंधळी रात्र मरू दे. बैलशिंग ढगाला टोचू दे.
कुणब्याची काठी आभाळाला डसू दे. कायबी होऊं दे..
पण पावसा, हत्ती पिसाळल्यागत तू ये..
- केशव सखाराम देशमुख, नांदेड

पाऊस


तू तिथे डोंगराच्या कुशीत, ढगांच्या गोधडीत
स्वत:ला लपेटून पहुडलेला
आणि मी इथे कासावीस
उघडय़ा मोकाट वाऱ्याने गुदमरलेला

तू तिथे पानाफुलांच्या कानाशी
हुळहुळत त्यांना खेळवणारा
आणि मी इथे वैशाखाच्या उष्ण झळांशी
भर दुपारी झटपटणारा

तू तिथे एकेक गुपित उलगडत
पालटून टाकतोस रंग सारा
मी इथे जपत राहतो, लपत राहतो
बंद कुपीत झाकत स्वत:ला

मला भिजवण्याचा जिवापाड आटापिटा
व्यर्थ जातोच हे माहीत असताना
असा का वागतोस माहीत नाही
हे तुझं चिडवणं, खिजवणं
की अजून काही? माहीत नाही.

की पोटच्या सगळय़ा मायेनिशी माझ्यावर बरसल्यावर
माझ्या शुष्क डोळय़ांतलं आटलेलं पाणी
स्वत:च्या डोळय़ांत शोधतोस?
माहीत नाही.
- सोनल कर्णिक-वायकुळ,
दहिसर.
पाऊस : आठवणींचा


पावसात एक बरं असतं
भिजून घेता येतं
भिजता भिजता आतून आतून
रडून घेता येतं

कोसळता सरी ओठांवरती
अधीर होते मन
थेंबाथेंबातून साजरा होतो
आठवणींचा सण
ओल्या मातीत आठवणींच्या मग रुजून येता येतं..
भिजता भिजता..

आठवत राहतात तिलाही मग
हुळहुळणारे गाल
टिचभर छत्री टपटपणारी
अन् भिजलेला रुमाल
चिंबओल्या रुमालानं तिच्या डोकं पुसून घेता येतं..
भिजता भिजता..

आसू, हासू, आशा, हुरहुर
पावसाला सारं कळतं
मेंदीभरल्या तळहातावर
पावसाचं तळं जळतं
विरहाची काडी सुलगावून त्यात जळून घेता येतं..
भिजता भिजता..

सरतो पाऊस, फिटते धुके
वास्तवाचे पडते ऊन
मन म्हणते- चल रे गडय़ा,
आपल्या घरी आपणहून
पागोळय़ांचे बनून थेंब रेंगाळत राहता येतं
भिजता भिजता आतून आतून रडून घेता येतं..
पावसात एक बरं असतं..
- मिर्झा अन्वर अहमद,
 शहापूर.
संध्याकाळचा पाऊस


ढगांनी गच्च दाटलेलं निळसर राखाडी आकाश
क्षितिजाच्या समांतर रेषेवर ऋतुलहरीनुसार कलंडताना
सांध्यसूक्ताचा आरंभ करत कोसळू लागतो अपरंपार पाऊस
आठवणींचे नितळकाच संदर्भ घेऊन

शरीराच्या सतारीवर मेघमल्हाराची बंदिश छेडताना
उमलवतो पाऊस इंद्रियांच्या निबीड अरण्यातले स्पर्शपिसारे
नि निनादतात तिच्या गळय़ातून पाझरलेल्या आरोह-अवरोहांचे सूर
त्वचेच्या प्रत्येक ओल्याशार रंध्रातले पर्जन्यगीत होऊन

संध्याकाळच्या झिरमिरत्या काळोखात
समजूतदार पुराणपुरुषांसारखी मातीत पाय गच्च रोवलेली झाडं
सजवून घेतात फांद्यावर ‘तिच्या’ आठवणींच्या लक्षावधी काजव्यांची पालखी
पावसाचं सांजस्वगत माझ्यासमोर हळुवार गुणगुणताना..

‘तिच्या’ मुलखातून ऐकू येतात
विरहव्याकुळ रानमोरांचे आर्त पुकारे दहा दिशा सांजवताना
नि पावसाची द्रुतलय अधिकच जोर धरू लागते
माझ्या मेंदूच्या पेशींमधल्या अवकाशात ‘तिच्या’ आठवणींचे ढग
गच्च दाटून येतानाच्या प्रत्येक संध्याकाळी..!
- विनय पाटील
भरपावसातलं अजिंठा..
चिंब भिजलेले अजिंठय़ाचे डोंगर
धुंवाधार पाऊस
प्रचंड गारठा
अन् त्यात गोठलेलं अजिंठा..
    डोंगरमाथ्यावर
    धबधब्यांची दुधाळ कारंजी
    भिजलेली झाडं
    त्यावर गारठून थिजलेली माकडं
    पाखरांच्या पंखांवरही
    शेवाळ साठलेलं..
कुणीसं धावत पुढे आलं
स्वत: पावसात भिजत
आपली छत्री मला देत म्हणालं-
असा धुंवाधार पाऊस
कैक वर्षांत झाला नव्हता
छत्री घ्या नि निवांत फिरा अजिंठा
फक्त वीस रुपये द्या छत्रीचे
भाडय़ाचे पैसे मिळतात
पोरंबाळं दोन घास खातात
पावसात भिजून मी काय मरतो थोडाच?
खूप बघा लेणी;
अन् लेण्या-देण्याचा व्यवहार!
   
    पहिल्या नंबरच्या गुहेतला
    सरकारी रखवालदार
    भ्रष्ट दात विचकत म्हणाला-
    फक्त दहा रुपये द्या साहेब
    तुम्हाला गंमत दाखवतो.
    आणि दाखवतो पगारासोबत आम्ही
    आणखी काय काय खातो.

पलीकडे कुणी एक ती
अगदी एकटी
सोळा नंबरच्या गुहेपाशी
चित्रातल्या आरशात
त्याचं प्रतिबिंब पहात
अन् बेइमान नजरेनं
माझ्याकडे बघून हसत..

कोपऱ्यात एक गुलुगुलु जोडपं
सतरा नंबरच्या गुहेपाशी
हस्तिदंताचा हट्ट धरणाऱ्या
राजकन्येच्या शोधात
एकमेकांना छत्रीत घेऊन
छत्रीचाच आडोसा करत..

चिंब भिजलेले अजिंठय़ाचे डोंगर
माथ्यावरल्या धबधब्यातून
रिते होत होते
वाघुरा नदीत..
अन् वाघुरीची चिरंजीवी चंद्रकोर
मर्त्य जगाकडे पाहून
फेसाळून हसत होती
म्हणत होती-
अखेर सारेजण येणार
फिरत फिरत गोल गोल
सव्वीस नंबरच्या गुहेपाशी
जिथे आहे पहुडलेलं
पृथ्वीवरचं अंतिम सत्य
भगवान बुद्धाचं महानिर्वाण!
    - सुहास द. बारटक्के,  चिपळूण

निळं पाखरू


बाहेर पानाफुलांवर रिमझिमताना
माझ्या मनात मात्र चालू असतं
त्याचं धुंवाधार तांडव

पूरच येतो मग.. अगदी महापूर!
वाहत जाते मी त्यात
अपरंपार
जराशानं तो उसंत घेतो
पण तोवर
खूप सारी पडझड झालेली असते

काहीच तर उरलं नाही
असं वाटत असताना
दूरवर एका उन्मळून पडलेल्या
झाडाच्या फांदीवर
दिसतं मला एक निळं पाखरू
चोचीत हिरवी काडी घेऊन बसलेलं,
नोहासारखीच माझी आतली सृष्टी
तगवीत असलेलं.
- संगीता अरबुने, वसई
काय माहीत?


पाऊस कोसळून
जातो.
कुठे जातो?
त्याचा पाठलाग कसा करायचा?
तो जे घेऊन जातो ते
माझं नसतं.
तरी त्याविना जगणं
पोकळ वाटतं.
तो गेलेला पाऊस
परत येत नाही.
मी वाट पहातो.
अनेक पावसाळे येतात, जातात
पण तो पाऊस येत नाही.
आता हे जगणं
माझं की
त्या पावसाचं?
उरतं फक्त एक गाणं-
‘येरे येरे पावसा..’
कुणाचंच नसलेलं.. किंवा सगळ्यांचंच असलेलं?
काय माहीत!
- रवींद्र लाखे, कल्याण
पाऊस असा हा..
आले आभाळ भरून, लागे पावसाची धार
मन कावरे बावरे, उरी उठवी काहूर
ओल्याकंच मिठीतील, वेडावती आठवणी
पावसाची रिमझिम, दाह वाढवी अजुनी
पहिल्याच पावसाने, असा मांडला कहर
आले शहारून अंग, मन झाले सैरभैर
अंकुराला गोंजारित, मुक्त मनाने बरस
जवळीक साधणारा, हवाहवासा पाऊस
- डॉ. धुंडिराज शं. कहाळेकर,
कोल्हापूर

पुन्हा पाऊस वळला..
पाठमोरा होता होता पुन्हा पाऊस वळला
दिलाशाचे मंद हासू रानी सांडुनिया गेला ।।धृ।।

नाचणाऱ्या पावलांनी बाळवारा वनी आला
पाचोळय़ाचे भिरभिरे फिरवीत उधळला
संगे गिरकी घेताना पंख फुटले धुळीला..

रानझरी खुदकली गरतीचा साज ल्याली
सानओहोळ कुशीत घेऊनिया झेपावली
सांगे कडेकपारींना- ‘आला मुऱ्हाळी न्यायला..’

घळीतून कारवीचे निळे सूर ओघळले
आवतन मधुदाट कुणी वेचले, टिपले
निळय़ा पावरीचा सूर आज समेवर आला..

रानअळू खुळावले सुखभारे हिंदोळले
कुणी पर्णकायेवर चंद्रमणी खेळविले
चाळा रानझुळकेचा गोड छळुनिया गेला..

सोनसळी कांतीवर पंखस्पर्श थरारला
सोनकीच्या बिंबासवे मेघ निळुला डुंबला
रंगभासांची कंपने, ऋतू झिम्म शहारला..

धारावत्या ओळींतून थेंब नितळ ओवले
वेशीवरती स्वप्नाच्या शब्द पाकोळय़ांचे झाले
मल्हारल्या कवितेत प्राणगंध ठिबकला..
- माणिक वांगडे, मुंबई

पाऊसधारा
    पाऊसधारा
    अंगावर झेलीत
    इंद्रधनुष्य
    पाहत होतो
ऊन-पाऊस
खेळताना
धरती संगे
नाहत होतो
    नवा रंग
    नवा गंध
    मनास नवेपण
    देऊन जातो
निसर्ग सारा
मोहरताना
हिरवा धडा
वाचत राहतो
    झटकून टाकी
    मरगळ सारी
    पाऊस हसरा
    लवून पाहतो
मनास फुटे
नवी पालवी
अंतरंगी
बहरत राहतो
- एकनाथ आव्हाड,
चेंबूर.

गोवर्धन
घन झुकले रानात
    घन भिनले मनात
घन मेघदूत झाले
    माझ्या आषाढबनात

घन वाऱ्यावरी डोले
    घन विजेसंगे बोले
माझ्या अधीर अंतरी
    घन लपंडाव खेळे

घन काजळात न्हाले
    घन कृष्णरूप ल्याले
त्यांच्या वर्षांवात माझे
    अंग गोवर्धन झाले!
- डॉ. विद्याधर करंदीकर, कणकवली.

आज भिजला पाऊस..
बेभानल्या वाऱ्यासंगे, भान हरला पाऊस
थेंब थेंब गोंदवुनी, आज भिजला पाऊस

आभाळाने धरलेले, काळे ढग हे उराशी
माझी जाणून असोशी, उधाणला हा पाऊस

कसा ग्रीष्म मी साहिला, त्याला ठाऊक असावे
झळा विझवाया साऱ्या, आज कोसळे पाऊस

मेघमल्हाराचे सूर, कसे, कोणी आळवले
सुरावरी त्या भाळुनी, आज नादला पाऊस

झाडे वेली झिंगताना, जणू सचैल नाहल्या
पिसाऱ्यातुनी हिरव्या, आज गायला पाऊस

आली प्रार्थना या कानी, पेरलेल्या बियाण्याची
आला हिरव्या कोंबांना, जीव द्यायला पाऊस

धूळ चिडीचीप झाली, कात टाकली घरांनी
आनंदाश्रू अवघ्यांचे, आज प्यायला पाऊस

आल्या नव्हाळीच्या कळा, मन धुंद कुंद माझे
माझ्या लेखणीमधून आज झरला पाऊस

आज भिजला पाऊस.. आज भिजला पाऊस..
- आनंद श्रीधर सांडू, चेंबूर.

कसा वागतो पाऊस
डोंगराच्या डोक्यावर  कसा नाचतो पाऊस
नदीमध्ये नागव्याने,  कसा हासतो पाऊस
वेडे उनाड वासरु  बागडते रानोमाळ
घुंगराच्या तालावर,  कसा वाजतो पाऊस
भयभीत ओलीचिंब  श्वास टाकते धरणी
आडरानी एकटीला,  कसा गाठतो पाऊस
गर्द गर्भार नदीचा  डोह तुडुंबला पोटी
ओणावून उरीपोटी,  कसा भेटतो पाऊस
कातळाला भिजवून  गवताला लोळवून
कडय़ावरून दरीत  उडी टाकतो पाऊस
मिट्ट काळ्या काळोखात  बेडकांची बडबड
ओलेत्यानं येरझारा,  कसा घालतो पाऊस
झोंबाझोंबी अंगोपांगी  कोसळून झाल्यावर
नामानिराळा त्रयस्थ,  कसा वागतो पाऊस
पाण्या-माती भेटवून  सारे रान पेटवून
हिर्वी शाल पांघरुन,  शांत झोपतो पाऊस
- साहेबराव ठाणगे, वाशी.



पाऊस अजून पडत होता
अंधाराच्या कुशीत शिरून
पाऊस अजून रडत होता
कधीच सरली रात्र तरीही
पाऊस अजून पडत होता

काही श्वास तगून होते
बाकी सारे गाडले गेले
मातीच्या ढिगाऱ्याखाली
पाऊस अजून कण्हत होता

रात्रीत हरवले बालपण
विसरावी अशी ती आठवण
हरवलेले, विसरलेले
पाऊस अजून शोधीत होता

कधीतरी संपले अश्रू
आक्रोशही आटून गेले
विझलेल्या चितांवर
पाऊस अजून पडत होता..
- नीला सत्यनारायण, मुंबई.
पावसा, तू हो अवलिया
अविरत कोसळतोय पाऊस
नि मी ऐकतोय नाद उदासीचा
पावसाला अंगभूत लय वियोगाची
पाऊस बरसतोय का समरसून?
पाऊस चैतन्यमयी
सर्जनाला साद घालणारा
मीलनोत्सुक
पावसाची प्रतीकं झालीयत छिन्नविच्छिन्न..
देह-मनातली दरी वाढत चाललीय पावसातून
अंतरीचा मोर सजग होत नाहीय संततधारेतून
तरारलेली ही परकी रोपं
पावसानं गिळंकृत केलंय आश्वासक क्षितीज

पावसा, तू हो अवलिया धुंवाधार
वाहून जाऊ दे हे विषादपर्व
तुझ्या स्पर्शाने होऊ दे वृक्ष निर्भय अन् पाखरं तृप्त
प्रमादशील भूमीवर फिरू दे तुझे हात क्षमाशील
तू होऊन ये कैवारी उपेक्षेच्या प्रदेशात
न्याय दे बीजारोपणाला

पावसा, होऊ दे संवाद तुझ्या-माझ्या प्राणांचा
प्रीतिधारांत न्हाऊ दे सचैल
व्याकुळ अस्तित्वाला
नवा जन्म घेतलेल्या निरागस पावसा,
तू हो सहृदय
मला ग्रीष्मपुत्राला
घे तुझ्या सजल कुशीत..
- प्रा. प्रकाश खरात, मालाड (प.)

No comments:

Post a Comment