Wednesday, December 15, 2010

काकडा...

 
... कार्तिकातली थंडी, त्यामुळे जाग आली तरी पांघरूणात गुरफटून पुन्हा झोपायची होणारी अनिवार इच्छा आणि एकदम देवळातली घंटा ट्ण्ण्ण्ण्ण्ण अशी वाजायची. एवढ्या पहाटे कोण आलंय हे बघायला माजघराचं दार किलकिलं करून पाहिलं, तर शेजारच्या जोशी आज्जी आलेल्या असायच्या. आणि आईला 'जयू, कुठवर आला काकडा?' असा प्रश्न असायचा. मग मात्र माझी झोप कुठे अगदी लांब पळून जायची. पटदिशी आवरून अर्ध्या तासाच्या आत, मी सोवळं नेसून देवघरात हजर! इकडे तोवर आईची पूजा निम्म्यावर आलेली असायची. कृष्णमहाराजांना पंचामृताचं स्नान चालू असायचं. आमचं देऊळ देवीचं, पण देवांच्या राज्यातही पुरुषप्रधानता असावी, म्हणूनच की काय, काकडा हा देवीचा नसतो, देवाचा असतो.
माझी आजी भक्तिपर कवनं रचायची आणि ती पूजेच्या वेळी म्हणायची. स्वतः केलेली कवनं आणि जवळ असलेला पारंपरिक कवनांचा साठा, ह्यामुळे विठोबाच्या किंवा रामाच्या वगैरे देवळात गेलं तरी तिची भजनं म्हणायची हौस काही फिटायची नाही. मग एक दिवस तिने ठवरलंच. आपलं स्वतःचं देऊळ आहे ना, मग कशाला उगाच दुसरीकडे जायचं. आपल्याच देवळात काकडा सुरू करायचा.आमच्या देवात कृष्णाची एक खूप सुंदर मूर्ती आहे. त्याच कृष्णाचा काकडा करायचा असं आजीनं ठरवलं आणि मग त्या वर्षापासून आमच्या घरात काकडा सुरू झाला. माझ्या आजीने सगळी गाणी वगैरे आईला शिकवली, त्यामुळे आजी गेल्यानंतरही आईने काकडा करण्यात खंड पडू दिला नाही. त्यामुळेच लहानपणापासून अनेक वर्षं मी एक नितांतसुंदर अनुभव घेऊ शकलो. 'यथा देहे तथा देवे' म्हणजे नक्की काय, हे त्यामुळेच उमगू लागलं.
मी : 'आई अगं उठवलं का नाहीस? कॄष्णाला उठवताना म्हणतात ती सगळी गाणी गेली की माझी.
आई न बोलताच, 'पंचामृती, स्नान घालू अंबेप्रती, सुवासिक तेले अंगा लावुनी, दहि-दूध-तूप-मधु-शर्करा घेउनी....' असं देवीच्या पंचामृतस्नानाचं गाणं म्हणत पूजेतल्या शंखाकडे बोट दाखवायची. थोडक्यात, 'ऊठ, ऊठ म्हणून तुझ्या नावाने शंख केला, पण तू काही उठला नाहीस' असा त्याचा अर्थ. शंखाच्या आवाजानं न उठणारा मी, घंटेच्या आवाजानं जागा व्हायचो, त्यामुळे देवघराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या शंकराची, मारुतीची आणि गणपतीची पूजा राहिलेली असायची, ती जबाबदारी माझ्यावर यायची. मी पूजेचं सामान घेऊन बाहेर आलो की जोशी आजी न चुकता माझा गालगुच्चा घ्यायच्या. (मला ते मुळीच आवडायचं नाही. मी सोवळ्यात आहे असं त्यांना कितीतरी वेळा सांगायचो. पण त्या फक्त हसायच्या. आता मला ह्याचं हसू येतं) माझी शंकराची, मारुतीची पूजा उरकतेय, तोवर आई प्रसादाची खिचडी करायला स्वयंपाकघरात गेलेली असायची.
आई नैवेद्याचं ताट घेऊन आली की मग कृष्णमहाराजांच्या विनवण्या करायच्या. दिवाळी जवळ आलेली असल्यामुळे ह्या नैवेद्यात दिवाळीच्या फराळासाठी होणारे पदार्थ एक एक करून हजेरी लावायचे.
'घ्या थोडा उपहार, दयाळा घ्या थोडा उपहार,
पाट रुप्याचा बैसायाला, रांगोळी मनोहार, दयाळा घ्या थोडा उपहार |
करंजी, मोदक, लाडु अनरसा, जिलबीही चवदार, दयाळा |
घिवर, बुंदी, मांडे, चिरोटे, ताक ठेविले गार, दयाळा घ्या थोडा उपहार |
किंवा,
रुसु नको कृष्णा, ये बैस पाटी,
घालीते तुजला रांगोळी मोठी |
भोजनसमयी रुसलासी का गा?
काय हवे ते माग श्रीरंगा,
लाडू, जिलबी, खीरीची वाटी, ही तुजसाठी ||१||
सर्वाहूनी तूझी महिरप थोर,
दोन्ही बाजूला नाचती मोर,
पोपट-मैना, वेलांची दाटी, ही तुजसाठी ||२||
राजीवनेत्रा, सुहास्यगात्रा,
चुकवी माझी संसारयात्रा,
लक्ष्मी विनवी हे जगजेठी ||३||
ही आणि अशी अनेक खूप भावपूर्ण पदं मी ऐकायचो. नुसतं ऐकतच रहावंसं वाटायचं. खरोखरीच, कृष्ण नावाचं एक खोडकर मूल आईला हैराण करतंय, आणि तरीही ती तितक्याच प्रेमानं आणि कधी लटक्या रागानं त्याला समजावतीये असंच त्या गाण्यातून वाटायचं.
समोर आहे ती केवळ मूर्ती नाही, साक्षात कृष्ण आला आहे, आणि मग त्याला मी कुठं ठेवू आणि त्याच्या पूजेसाठी काय काय करू असं झाल्याचा भाव सगळ्याच गाण्यांमधून असायचा.
मला बर्‍याचदा वाटतं, की राम हा वंद्य आहेच, पण त्याच्या मर्यादापुरुषोत्तमत्वामुळे तो तेवढा जवळचा नाही वाटत जेवढा कृष्ण वाटतो.
बघा ना, कृष्णाचं देवत्व कळायला आधी त्याच्या खोड्या पहाव्या लागतात, त्याला उखळाला बांधावाच लागतो, 'माती खाल्लीस?' म्हणून रागे भरावे लागतात, 'खोटं बोलतोस? उघड तोंड' असं धाकात घ्यावं लागतं, आणि मग कुठे तो विश्वरूप दाखवतो. तो त्याचं नाव सार्थ करतो. कृष्ण! जो आकृष्ट करतो, तो कृष्ण.
ह्या काकड्याच्या गाण्याचे शब्द म्हणाल तर ते साधेच, पण त्यातून जीव-शिव, तत्पद-त्वंपद इत्यादी उपनिषदाची भाषा आणि मानवी मनाच्या लक्षणांबद्दलची प्रभावी रूपकं बेमालूमपणे यायची.
'माय मिथ्या ब्रह्मचि सत्य, ऐसे बोलति सद्गुरुनाथ,
उपनिषदी हा सिद्धांत, निजवस्तु करा तुम्हि प्राप्त,
मनि धरू नका काहि शंका, श्रीहरिवर वारा पंखा,
द्या यमपुरीला धोका, श्रीहरिवर वारा पंखा |
बोधाची करुनी दांडी, विषयाची मुरडुन मुंडी,
वासना समूळचि खंडी, हरिदासा कोणि न दंडी,
वहा विठ्ठलप्रेमे बुक्का, श्रीहरिवर वारा पंखा |
भावाची झालर केली, भक्तीची मोती ओविली,
वैराग्याचा वाळा, त्रिगुणाची गुंफण त्याला,
तत्पदे-त्वत्पदांची असिपदी ऐक्यता झाली
गुरुवाचुनि न मिळे शिक्का, श्रीहरिवर वारा पंखा |
ऐसा पंखा जो वारिला, देहबुद्धि-ताप हारिला,
चित्ताचा रुमाल केला, मोहाचा घाम पुसियेला,
हे द्वैत मारुनी टाका, श्रीहरिवर वारा पंखा |
असे सगळे स-गीत उपचार घेऊन झाले की मात्र कृष्ण कुमार-वयात यायचा. यशोदेची गाणी हळू हळू कमी होत राधेची गाणी यायची. बहुतेक ग. दि. मांनी लिहिलेलं हे गाणं माझी आजी म्हणायची,
'घनश्याम नयनी आला, सखे मी काजळ घालू कशाला?' पहिल्या चरणातल्या कल्पनेनेच ऐकणारा नि:शब्द.
मग ती राधा सखीला सांगते, की मी काजळ, मेखला, इ.इ. का नाही घालत. काजळ नाही घालत, कारण माझ्या डोळ्यातच तो घनश्याम आहे. मेखला नाही बांधत कारण त्याचे हात अजून मला कमरेभोवती जाणवतात. आणि माझं संपूर्ण शरीरच रोमांचांनी नटलंय, मी हिरे-माणके वाया कशाला घालवू? आणि ह्या कान्ह्याची मुरलीच इतकी मादक आहे, की तिच्या स्वरांनीच मी सगळा शृंगार केलाय. मग आता मला सांग, मला वेगळं नटायची काय गरज? राधेच्या सखीप्रमाणेच, मीही हे गाणं ऐकताना निरुत्तर व्हायचो.अजूनही होतो. काय कमालीचं गूढ नातं आहे राधा कृष्णाचं. 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला' मधले शब्द आठवतात, 'सखे होतो आम्ही विषय विचारी, टाकुन गेला तो गिरिधारी' राधा-कृष्णाबद्दल विचार करताना ते 'विषयविचार' आम्हाला सोडत नाहीत, आणि तो गिरिधारी मात्र आम्हाला टाकून जातो.
मग समोर नसलेला तो गिरिधारी सुखात असेल ना? त्याला कुणाची दृष्ट तर लागणार नाही ना? ही काळजी!
काढु दे दृष्ट गोविंदा,
कुरवाळी मुख हरि माता,
गाईन गानछंदा, पाहुनी नेत्रसुखकंदा |
दिनभरी खोड्या किति करिसी,
लाविसी वेड सकळांसी,
बघु दे तुझ्या वदनारविंदा | काढु दे दृष्ट गोविंदा |
रवि-शशी टकमका मुख पाहती,
सुंदरा, बघुनी तुज दिपती,
हासशी किती मंद-मंद,
काढु दे दृष्ट गोविंदा |
आपल्या लेकराची दृष्ट काढणं हे काम आईचं. त्यामुळेच, आपल्या आराध्य देवाला दृष्ट लागू नये म्हणून येणारी ही अशी कवनं म्हणजे 'श्रवण-कीर्तन-स्मरणादि नवविधा भक्तीपेक्षाही कितीतरी श्रेष्ठ वाटतात.
मग सगळी पूजा यथासांग झाली, की त्या सर्वव्यापी देवाची आरती !
आरति कशी करू गोपाला? ज्याने व्यापियले जगताला?
नीरांजन, दिप कर्पुरवात, तुम्हीच झाला राधाकांत |
तुम्हीच दाता, तुम्हीच त्राता,करुनि अ-कर्ता, जगनिर्मियता |
आता देउन मी-पण, मन्मति,दास करितो मंगल आरति |
आरती संपायची, आरतीच्या वेळी वाजणार्‍या घंटेचा नाद वातावरणात घुमत असायचा, आणि त्या नादाबरोबरच,
'पांडुरंग हरी, वासुदेव हरी, बोला पंढरिनाथ महाराज की जय.
गोपालकृष्णमहाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ' असे जयजयकार उमटायचे!!
हे सगळं होईपर्यंत सात-साडे सात वाजून गेलेले असायचे. मग प्रसाद!
त्या प्रसादाची गोडी अजून जिभेवर रेंगाळते. साधीच खिचडी, मुगाच्या डाळीची. पण आहाहा! ब्रह्मानंद. मग देवाचं खास आवडीचं लोणी, साय-साखर, दही-पोहे हे आलंच.हे सगळंच्या सगळं आई तिच्या 'या' कृष्णाला द्यायची.
खाऊन झालं की मग बाकीचे दिवाळीच्या सुट्टीतले उद्योग सुरू.
गेले ते दिन गेले! आता फक्त त्या प्रतिमा मनाच्या एका हळव्या कोपर्‍यात जपून आहेत.
कुठे कुणाच्या बोलण्यात/ लिखाणात 'कृष्ण' हा नुसता शब्द जरी आला, तरी त्या सगळ्या प्रतिमांचा एक मोरपिशी रंग मनावर चढतो. त्या रंगात कुठे चमक असते, कुठे हळुवारपणा असतो, तर कुठे थोडा काळेपणाही....!
'उगाच मोठे झालो' असं वाटायला लागतं. पण डोळे पाणावायच्या आत लक्ष दुसरीकडे वळवावंच लागतं.
कारण चुकून कुणी बघितलंच, तर त्यांना काय सांगायचं? कुठला कॄष्ण दाखवायचा?

1 comment:

  1. माझ्या आजेसाबा सुद्धा अशी सुंदर सुंदर पदे म्हणायच्या. आम्ही त्या एकत्र करायचा प्रयत्न करत आहोत.

    ReplyDelete